অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’

‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’

शैक्षणिक आणि सांस्कृतिक पंढरी असलेल्या अमरावती शहराच्या पूर्वेकडे विद्यापीठापासून मार्डी रस्ता लागतो. या रस्त्याने प्रवास करताना अवघ्या पाच-सात किलोमीटरनंतर उजवीकडे सातपुडा पर्वताच्या उपरांगा नजरेस पडतात. या पर्वतरांगेतील हिरवीगार वनश्री येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनावला सुखावून जाते. तेथील वृक्षलतांमधून भरारी मारणारे पक्षी लक्ष वेधतात. मोराचे केकारणे ऐकू येते. वृक्षराजीतून फेरटका मारला तर निलगाई, चितळ तर कधी-कधी बिबटसुध्दा नजरेत पडतो.
पुढे काही अंतरावर ‘परसोडा’ गावच्या अलीकडे उजव्या बाजूला पर्वतराजीच्या निसर्गरम्य कुशीत एक वास्तूशिल्प लक्ष वेधून घेते. ‘ग्रीन सर्कल’ हे या विज्ञानशिल्पाचे नाव. या अष्टकोनी वास्तूच्या गर्भातून निघालेला षटकोनी आकारातील पन्नास डायमिटरचा प्रचंड लोखंडी ‘डोम’ मनाला आकर्षित करतो. बाजूलाच दर महिन्याला 500 युनिटची ऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा, मुख्य इमारतीवर सौर ऊर्जेचे सौर पट्टे दिसतात. दोनशे व्यक्तींची क्षमता असलेला सेमिनार हॉल, योग हॉल, वाय-फाय यंत्रणा, संशोधन लॅब इ.संशोधनासाठी आवश्यक अशी येथे व्यवस्था आहे. जास्तीत जास्त निसर्गतत्वांचा उपयोग करुन अतिशय कौशल्याने या वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. या अनोख्या वास्तूशिल्पाचे शिल्पकार आहेत अमरावतीचे सुप्रसिध्द संशोधक डॉ.विजय इंगोले. ‘ग्रीस’ देशातील अशाच एका संशोधन शाळेपासून प्रेरणा घेवून त्यांनी ‘ग्रीन सर्कल’ ची स्थापना केली आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, कला इ. क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींच्या, त्यांच्यातील निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेले हे ‘ग्रीन सर्कल’ नावाचे अनोखे ‘विज्ञानशिल्प’ आहे. संशोधकांसाठी संशोधनाचे कार्य, जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदान, साधना, निसर्गप्रेमींसाठी जंगल ट्रेक इ.महत्त्वाचे कार्य या संशोधन केंद्रात होणार आहे. या प्रकल्पात सोलर सिस्टीम वीज निर्मिती, पवनउर्जा निर्मिती, जलशुध्दीकरण प्रकल्प (सिवरेज वाटर ट्रीटमेंट), रेन वॉटर हार्वेस्टींग, प्लॅस्टीक पिशव्यांची विल्हेवाट लावण्याकरिता पॅराबोलिक सोलर वॉटर हिटर इ. प्रकल्प अस्तित्वात आहे. यासर्व प्रकल्पांचा फायदा या नावाच्या संपूर्ण परिसराला होत आहे. म्हणूनच ते केवळ एक वास्तूशिल्प नसून एक ‘विज्ञानशिल्प’ बनले आहे. अवकाश संशोधन, वन आणि वन्यजीवांविषयी तळमळ असणाऱ्यांसाठी, कलेची साधना करणाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. संशोधनाची कास धरणाऱ्यांसाठी अमरावतीच्या निसर्गकुशीत ‘ग्रीन सर्कल’ आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. येथे राहणाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आहे.
निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत आहे. परंतु हा अंत लांबविता कसा येईल यासाठी प्रयत्न करण्याची धडपड म्हणजेच जीवन. आयुष्यभर केवळ संपत्ती जमा करणे व निवृत्तीनंतर त्या संपत्तीसह केवळ मुलाबांळामध्ये अडकून राहणे हा जीवनाचा उद्देश नसून आयुष्याचा दृष्टीकोन म्हणजे आपल्याला समाजाने जे दिले त्यातून उतराई होणे होय. त्यासाठी जी धडपड करायची त्याचे उत्तर ‘ग्रीन सर्कल’ या तंत्रशिल्पात मिळते.
125 कोटी लोकसंख्येच्या भारत देशात तरुणांच्या संख्येचे प्रमाण भरपूर असणारच. परंतु देशातील ज्ञानाची कास धरणाऱ्या ज्या जिद्दी तरुणांमध्ये आणि काही संशोधनाची उर्मी असणाऱ्या व्यक्तींमधील निर्मिती क्षमता अनेक कारणांमुळे कुंठली. अशा व्यक्तींसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कला, इ. क्षेत्रात संशोधनाचे नवे दालन महाराष्ट्रातील अमरावती येथे डॉ. व्ही. टी. इंगोले नावाच्या सत्तरीतील संशोधकाने उघडले आहे. बालवयापासून आर्थिक परिस्थितीवर मात करीत या अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधकाने जवळपास चार दशकांपूर्वी अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर अमरावतीहून आपल्या सहधर्मचारिणीसोबत केवळ एक ‘टिनपेटी’ घेवून संसार थाटण्यास मुंबई गाठली. डॉ.इंगोले यांच्या नावे आतापर्यंत थोडेथोडके नव्हेतर 22 पेटंट आहेत. त्यांच्या मते केवळ इस्टेटची माया जमविणे म्हणजे जीवनाची कमाई नाही तर आपल्या जन्मात आपण जगाला काय देतो ? हे महत्त्वाचे आहे. लवकरच सरांच्या पेटंटची संख्या 25 वर जाईल, यादृष्टीने आजही त्यांची वाटचाल सुरुच आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मला ‘निसर्ग’ ऊर्जा देतो आणि म्हणूनच डॉ. इंगोले त्यांच्या इतर पाच निसर्गवेड्यांच्या चमूसोबत वेळोवेळी ‘जंगल भ्रमण’ करत असतात. आपल्याला ज्या परिस्थितीतून जावे लागले ती वेळ इतर संशोधकांवर येऊ नये म्हणून अमरावतीच्या या निसर्गवेड्या संशोधकाने आणि तेही निसर्गकुशीत ‘ग्रीन सर्कल’ नावाचे एक ‘विज्ञानशिल्प’ उभारले. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, हा यामागील सामाजिक उद्देश.
-प्र.सु.हिरुरकर
अमरावती

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate