हेमंत पवार
गावातील सर्व घरांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा
- वीजबिलात झाली बचत
- भारनियमनाची समस्या केली कमी
घर तेथे गांडूळ खत प्रकल्प, घर तेथे मुऱ्हा म्हैस, घर तेथे शौचालय, प्राथमिक शाळेत पहिलीपासून इंटरनेटची सुविधा आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील एका गावाने आपली विशेष ओळख तयार केली आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी असे त्याचे नाव आहे. नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून गावातील प्रत्येक घरात प्रकाश मिळविण्याची संकल्पना या गावातील प्रत्येक घरात सत्यात उतरण्यात आली आहे. गावातील घराघरांत सौरऊर्जेवरील वीजपुरवठ्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यातून घरगुती बिलात सुमारे 60 ते 70 टक्क्यांची बचत झाली आहे. त्यातून गावातील नागरिकांचे वीजबिल वाचण्यास मदत झाली आहे. त्या माध्यमातून मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले "सोलर व्हिलेज' बनले असण्याची शक्यता आहे.
ढेबेवाडी खोऱ्यातील वांग नदीकाठच्या मालदन गावच्या उत्तरेला मान्याचीवाडी हे वसले आहे. गाव छोटे असल्यामुळे गावात कोणतीही योजना यशस्वीपणे राबविण्यात यश येते. त्याला गावची एकी हेही एक कारण आहे. गावामध्ये स्थापनेपासून एकी आहे. गावात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची निवडणूक झालेली नसून, सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. गावातील सरपंच (कै.) तात्यासाहेब माने विज्ञानाचे शिक्षक असल्याने त्यांच्याकडे ऊर्जा बचतीचा असलेला दृष्टिकोन गावाला फायदेशीर ठरला. त्याचबरोबर त्यांना सौरऊर्जेविषयी आकर्षणही होते. त्यातूनच त्यांनी सर्वांच्या सहकार्यातून गावाला सौरग्राम (सोलर व्हिलेज) बनविण्याचा संकल्प केला. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने या गोष्टीला विलंब लागला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती यू. टी. माने, उपसरपंच रवींद्र माने, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजाळकर, बबन माने, शांताबाई माने, तंटामुक्तीचे अध्यक्ष अधिकराव माने, शिक्षण समितीचे अध्यक्ष सर्जेराव माने आदींनी गावचा कारभार सुरू ठेवला आहे. त्या माध्यमातून सोलर व्हिलेजचे स्वप्न सत्यात उतरले आहे.
...असे झाले सोलर व्हिलेज
ऊर्जा बचतीबरोबरच भारनियमनापासून मुक्ती मिळविण्यासाठी गावाला सोलर व्हिलेज करण्याची संकल्पना ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आली. त्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते गावातील प्रत्येक घरात सौरयंत्र बसवण्याचे ठरविण्यात आले. गावात सौर पथदिवे तर अगोदरच बसविण्यात आले आहेत. त्यातून ग्रामस्थांना सौरऊर्जेची कल्पना आली होतीच. त्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद कशी करायची असा प्रश्न समोर आला. गावामध्ये कोणतेही विकासकाम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहण्याबरोबर पैसेही वाचत असल्याचे आढळले होते. विकासकामांतून उरलेल्या पैशांतून प्रत्येक कुटुंबाला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आणि उर्वरित पैसे गावातील दहा महिला बचत गटांकडे झालेल्या बचतीतून उभे करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी सौरऊर्जेवरील यंत्रणेची, दिव्यांची माहिती घेतली. त्यानंतर गावातर्फे पुण्यातील एका कंपनीला सोलर यंत्रे बसविण्याचे काम देण्यात आले. त्यासाठी कंपनीच्यावतीने गावचे सर्वेक्षण केले. त्यानंतर गावातील सर्वच्या सर्व म्हणजे शंभर कुटुंबांच्या घरांवर सौरऊर्जेवरील वीजपुरवठ्याची यंत्रणा बसवून घेतली. त्याअंतर्गत घरावर सोलर पॅनेल आणि घरामध्ये वीस वॉटचे दोन बल्ब, बॅटरी आणि अन्य यंत्रणा असे या वीजयंत्रणेचे स्वरूप आहे. दिवसभरात सौरऊर्जेवर बॅटरी चार्ज होत असल्याने ग्रामस्थांना मोफतच वीज मिळत आहे. केवळ मिक्सर, टीव्ही, आणि फ्रिजच्या वापरासाठीच त्यांना वीज कंपनीचा "स्वीच' ऑन करावा लागत आहे. या यंत्रणेमुळे वीज बिलांमध्ये मोठी बचत होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
खर्च फक्त पाच हजार 700
सोलरचे एक युनिट घरावर बसविण्यासाठी सुमारे पाच हजार 700 रुपयांचा खर्च येतो. मान्याचीवाडीतील नागरिकांसाठी तो खर्च न सोसणारा होता. हा प्रश्न सोडवणे तर आवश्यक होते. त्यावर ग्रामपंचायतीने एक हजार, महिला आणि पुरुषांच्या बचत गटांनी तीन हजार आणि प्रत्येक कुटुंबाचे एक हजार 700 रुपये, अशी रक्कम जमा करून तेथे प्रत्येक घरी युनिट उभारली.
नो लोड शेडिंग, नो फॉल्ट
लोड शेडिंग, फॉल्ट आहे, दुरुस्ती सुरू आहे अशी नेहमीची वाक्ये अनेकदा वीज गायब झाल्यावर वीज कंपनीकडून ग्राहकांना ऐकायला मिळतात. वीज गेल्यावर अनेक गावांतून वीज कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दूरध्वनी जातात. मात्र मान्याचीवाडी त्याला अपवाद आहे. सौर ऊर्जेवरील वीजयंत्रणा कायमस्वरूपी वापरात असल्याने तेथील गावकऱ्यांचे कंपनीच्या विजेकडे फारसे लक्षच नसते. त्याबाबत आम्ही "नो टेन्शन' असल्याचे गावकरी सांगत आहेत.
सर्वच बाबतीत गाव आघाडीवर
ज्या वेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू झाले त्या वेळी पहिल्याच वर्षी मान्याच्यावडीने बाजी मारून गाव तंटामुक्त केले. स्थानिक पातळीवरील बिनविरोध निवडणुकीची परंपरा गावाने कायम ठेवली आहे. ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध झाली आहे. स्वच्छता अभियानापुरती स्वच्छता आणि अन्य उपक्रम असे धोरण ठेवता मान्याचीवाडीने स्वच्छता हा संस्कार म्हणून जपला आहे.
गाव पाहण्यास सहली
मन्याचीवाडीत शासनाच्या सर्व योजना यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर सौरऊर्जेचे गाव म्हणूनही त्या गावाने ख्याती मिळवली आहे. त्याची जसजशी माहिती होईल तशी माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणच्या सहली तेथे जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी तर ते गाव सहलींचे ठिकाण झाले आहे.
-------------------------------------------------------
सौर यंत्रणा बसविण्यापूर्वी गावाचे मिळून घरगुती वापराच्या विजेचे सुमारे 32 हजार रुपये बिल महिन्याला येत होते. आता ते दहा हजार रुपयांवर आले आहे. महिन्याला दीडशे रुपये बिल येणाऱ्या अनेक ग्राहकांना 40 ते 50 रुपयेच नाममात्र बिल येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ या योजनेवर बेहद्द खूष आहेत. वीज बिलात 60 ते 70 टक्के बचत झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याशिवाय गावात सौरऊर्जेवरील पथदिव्यांची यंत्रणाही यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवरील वीजबिलाचा ताणही कमी झाला आहे. घराघरांवर बसविलेल्या सोलर यंत्रणेसाठी संबंधित कंपनीने पाच वर्षांची हमी दिली आहे. कंपनीचे प्रतिनिधीही वरचेवर तपासणीस येऊन माहिती घेत आहेत. वीजबिलातील बचतीची रक्कम ग्रामस्थांना अन्य कौटुंबिक खर्चासाठी वापरणे शक्य झाले आहे. यापुढच्या काळातही नवनवीन उपक्रमांद्वारे हे गाव वेगळी वाट चोखाळत समाजासमोर नवे आदर्श ठेवणार आहे.
- रवींद्र माने,
उपसरपंच, मान्याचीवाडी (मो. नं. 7588685556)
-------------------------------------------------------
""ग्रामीण भागात विजेचा मोठा प्रश्न आहे. अनेकदा भारनियमनाचा त्रास होतो. त्यासाठी गावातील सर्वांच्या संमतीनुसार गावात सौरऊर्जा यंत्रणेचा प्रकल्प राबविला आहे. त्यासाठी आमच्या महिलांच्या बचत गटांनीही आर्थिक हातभार लावला आहे. हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्या माध्यमातून घरच्या विजेच्या बिलात मोठी बचत झाली असून ते पैसे आम्हाला घरखर्चाला वापरणे शक्य होऊ लागले आहेत.''
- सौ. सुवर्णा माने
गृहिणी, मान्याचीवाडी
-------------------------------------------------------
ग्रामस्थांना आम्ही सौरऊर्जेची पद्धत समजावून सांगितली. त्यांना त्याचे महत्त्व पटल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीचा तसा ठराव घेऊन सर्वांच्या संमत्तीने ही योजना राबवली. आमच्या गावात भारनियमनामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची मोठी गैरसोय होत होती. ती या यंत्रणेमुळे दूर झाली आहे. त्याचबरोबर विजेच्या वापरातही बचत झाली आहे.
- दिलीप गुंजाळकर, ग्रामपंचायत सदस्य
-------------------------------------------------------
स्त्रोत : अॅग्रोवन