অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रीव्हर्स बोरिंग ‘इरादा’ चित्रपटाच्या निमित्ताने ...

रीव्हर्स बोरिंग ‘इरादा’ चित्रपटाच्या निमित्ताने ...

“‘रीव्हर्स बोरिंग’ हा प्रकार काही कुठल्या षड्यंत्राचा भाग नाही. ‘रीव्हर्स बोरिंग’ हे खरं तर नागरिकांच्या जीवनासंबंधी कंपन्या आणि सरकारी यंत्रणा किती उदासीन आणि निष्काळजी असू शकतात याचंच एक उदाहरण आहे. घनकचरा आणि द्रवकचरा हा भारताच्याच नव्हे, तर जगाच्याही वाढत्या लोकसंख्येसोबत एक जटिल आणि महाभयंकर प्रश्न होत चालला आहे ...”

सध्या प्रसिद्ध असलेल्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमांमधल्या अगदी पहिल्याच लेक्चरमध्ये ‘कंपनी’ या संकल्पनेविषयी सांगितलं जातं. ‘उत्पादन खर्च आणि विक्रीमूल्य यांमधली तफावत वाढवून जास्तीतजास्त नफा कमावणं’ हेच कुठल्याही कंपनीचं पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं उद्दिष्ट असतं हे विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. अर्थात व्यवस्थापनाच्या दृष्टीनं विचार करायचा, तर पुढच्या सगळ्या पायर्या साहजिकच ‘नफा’ या एकाच उद्दिष्टाभोवती घुटमळत राहतात. मग ती कारखानदारी असो, इतर उत्पादक उद्योग असोत किंवा मग सेवाक्षेत्रातले उद्योग असोत. उद्दिष्ट ठरवल्यावर जी मानसिकता तयार होते, आणि त्या मानसिकतेवर आधारित जी साखळी तयार होते; त्यांचा परिणाम त्या-त्या कंपनीच्या धोरणांवरती होतच असतो. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘इरादा’ हा चित्रपट जवळपास अशाच प्रकारच्या मानसिकतेवर भाष्य करतो.

नसीरुद्दीन शाह, अरशद वारसी आणि सागरिका घाटगे यांनी अभिनय केलेल्या ‘इरादा’ या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक अणुऊर्जा उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती चालवतेय, जी तिच्या नफ्यासमोर बाकी कशालाच महत्त्व देत नसते. अणुऊर्जेतून निर्माण होणार्या घातक रसायनांची रीतसर विल्हेवाट न लावताच ही कंपनी तो कचरा खोलवर ड्रिल करून जमिनीमध्ये सोडत असते. त्यामुळं तो प्रकल्प ज्या शहरात असतो, त्या शहरातल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आणि जमिनीत किरणोत्सर्जनामुळे प्रदूषण व्हायला लागतं. नसीरुद्दीन शाह एका निवृत्त सेनाधिकार्याच्या भूमिकेत दाखवले असून त्यांची मुलगी सैन्यात जाण्याची तयारी करत असते. मात्र पाण्यातल्या किरणोत्सर्गामुळे तिला कर्करोग होतो आणि ती मृत्युमुखी पडते. या प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेलं शाहांचं पात्र या कंपनीच्या कारभाराचं पितळ उघडं करण्याचा प्रयत्न करतं.

हा चित्रपट पटकथेच्या आणि दिग्दर्शनाच्या बाजूने चांगला असला, तरी तांत्रिकदृष्ट्या कमी बजेटमध्ये बनवलेला असल्यानं अर्थातच तो चालला नाही. तो चालला असता, तर माध्यमांसमोर आणि लोकांसमोर एक अशी समस्या चर्चेला आली असती, जी आजवर अतिशय दुर्लक्षित राहिलेली आहे आणि ती म्हणजे ‘रीव्हर्स बोरिंग.’ ‘बोरिंग’ प्रक्रियेत जमिनीत खोलवर ड्रिल मारून जमिनीतला पाणीसाठा वापरासाठी उपसून काढला जातो. मात्र  त्याच्या अगदी उलट ‘रीव्हर्स बोरिंग’ आहे. त्यात जमिनीमध्ये खोलवर ड्रिल करून औद्योगिक किंवा जैविक-रासायनिक गाळ आणि कचरा जमिनीच्या आत सोडला जातो.

‘रीव्हर्स बोरिंग’ हा प्रकार काही कुठल्या षड्यंत्राचा भाग नाही. ‘रीव्हर्स बोरिंग’ हे खरं तर नागरिकांच्या जीवनासंबंधी कंपन्या आणि सरकारी यंत्रणा किती उदासीन आणि निष्काळजी असू शकतात याचंच हे उदाहरण मात्र आहे. घनकचरा आणि द्रवकचरा हा भारताच्याच नव्हे, तर जगाच्याही वाढत्या लोकसंख्येसोबत एक जटिल आणि महाभयंकर प्रश्न होत चालला आहे. सात अब्ज लोक आज पृथ्वीवर एका अशा व्यवस्थेत राहतात, ज्या स्थितीत निसर्गातला कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उत्पादनप्रक्रियेद्वारा उपभोग्य वस्तूमध्ये रूपांतरित केला जातो. या उत्पादनाच्या विक्रीसाठी त्याच्या जाहिरातींचा मारा ग्राहकांवर केला जातो, त्या वस्तूच्या किमती कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि या सर्वांत हे सांगायचं टाळलं जातं की, ‘तुम्ही इतक्या वस्तूंचा उपभोग घेतला, तद्नंतर निर्माण झालेला कचरा गेला कुठं?’ कारण तो कचरा दृश्य ठेवलाच जात नाही.

हे ‘अदृश्य करून टाकणं’ हा आधुनिक प्रशासन व्यवस्थेच्या गाभ्याशी साम्य दर्शवणारा प्रकार आहे. नव्या जगात समस्या मूलभूत स्वरूपात सोडवल्या जात नाहीत, तर केवळ त्या तत्कालीन संदर्भात कुणाला दिसणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाते. कारण प्रशासन आणि नागरिक यांचे आंतरसंबंध फक्त दृश्य स्वरूपातल्या तथ्यांपुरते येतात. जसं की; भ्रष्टाचार होत आहे, तर तो खासगी आहे तोवर त्याचा परिणाम आत्ताच्या प्रशासनात असलेल्यांवर होत नाही. हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मात्र जनता त्यावर प्रतिक्रिया देते आणि कारवाईची मागणी करते. हे सर्व होतं ते दृश्य अशा सार्वजनिक अवकाशातच. प्रशासन म्हणून किंवा नागरिक म्हणून असलेल्या खासगी अवकाशात मात्र दोघंही त्या भ्रष्टाचारात मालूम-बेमालूमपणे सहभागी होत राहतात. नव्या अर्थव्यवस्थेत कचरा-व्यवस्थापन आणि मलनिस्सारण हा असाच भ्रष्टाचार आहे.

कचरा-व्यवस्थापन म्हणजे तरी काय? तर कचरा निर्माण होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी ‘व्यवस्थात्मक पातळीवर मूलभूत बदल करणं, कचर्याच्या विल्हेवाटीसाठी योग्य प्रणाली निर्माण करणं आणि कचरा निर्माण व्हायला कारणीभूत ठरणार्या पदार्थांवरती कठोर निर्बंध आणणं’. आपल्याकडचं कचरा व्यवस्थापन म्हणजे मॉल्स, रस्ते, थिएटर्स, बाजार, सोसायट्या इथं निर्माण होणारा कचरा लवकरात लवकर तिथून फक्त हलवणं; जेणेकरून सभ्य, सुशील आणि जबाबदार मतदार राजाला सकाळी उठल्यावर त्यानं काल केलेला कचरा दिसणार नाही आणि कोणत्याही नैतिक दडपणाखेरीज तो पुन्हा चंगळ करायला रिकामा. तो कचरा जातो कुठं, नेतं कोण, कसं, त्या कचर्याचं पुढं होतं काय, त्याचे भौतिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होतात का, होत असतील तर त्यासाठी चुकवावी लागणारी किंमत किती, यांच्याशी त्याला काहीच देणंघेणं नसतं.

अशा प्रकारच्या प्रशासनिक आणि नागरी व्यवस्थेत; दैनंदिन कचरा जर इतका दुर्लक्षित असेल, तर औद्योगिक कचरा तर कुणाच्या कल्पनेतही नसतो. उद्योगांमध्ये धातू, कच्चा माल, प्लास्टिक, वेगवेगळी रसायनं, पाणी आणि इतर कित्येक पदार्थ यांच्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचर्याचं व्यवस्थापन करणं ही त्या-त्या कंपन्यांची जबाबदारी असते. त्याचं व्यवस्थापन करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणं ही प्रक्रिया त्यांनी आपल्या उत्पादन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून करायची प्रक्रिया असते. मग अर्थातच त्यांच्या उत्पादनशुल्कात भर पडू शकते. मात्र नफा वाढवायच्या आणि किमती कमी करण्याच्या स्पर्धेत हे वाढलेलं उत्पादनशुल्क कुणालाच नको असतं. मग ते वाचवायचं कसं? तर तुम्ही तुमच्या उत्पादनप्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा जवळपासच्या एखाद्या ठिकाणी दडवून टाकायचा म्हणजे तो अदृश्य होतो. रसायनं आणि सांडपाणी या गोष्टी नदीत सोडल्या, तर कुणाला दिसणार आहेत? शहराबाहेर जमिनीच्या एका तुकड्यात कचरा दडवला की कुणाला दिसणार आहे? आणि दिसणारच नसेल, तर कुणाला फरक पडणार आहे?

माणसानं आपल्या उपभोगासाठी केलेलं उत्पादन हे जसं एक वास्तव आहे, तसंच त्यामुळे निर्माण होणारा कचरा हेही एक वास्तव आहे. कचरा कधीच अदृश्य होत नाही. कचरा-व्यवस्थापनाची जबाबदारी उत्पादकांना तर घ्यावी लागेलच; मात्र नागरिक म्हणून आणि उपभोगाच्या यंत्रणेतला ग्राहक म्हणून ही सर्वांचीच जबाबदारी असणार आहे. ‘रीव्हर्स बोरिंग’च्या माध्यमातून औद्योगिक आणि सार्वजनिक सांडपाणी जमिनीत सोडणं ही मानव म्हणून आपल्यासोबतच्या इतरांशी आणि येणार्या पिढ्यांशी केलेली प्रतारणा आहे. ‘रीव्हर्स बोरिंग’ ही बाब गंभीर आजार, शेकडो रोग, जमिनीचा नाश आणि अनेक धोक्यांची टांगती तलवार आत्ताच्या आणि येणार्या पिढ्यांसाठी मागं सोडते. मृदा आपल्या जीवनाच्या सर्वांत मूलभूत आधारांपैकी एक आहे. मृदा आपली घरं उभी करते, आपलं अन्न उगवते आणि आपल्या अस्तित्वाला सौंदर्य देते. मात्र आपण तिला गृहीत धरून तिची अपरिमित हानी करत राहतो हे लक्षात न घेता की, हे आपल्यालाच नुकसानकारक आहे.

सरतेशेवटी, असंही वाटेल की, ही काही इतकी गंभीर समस्या नाही. भविष्यात कधीतरी याकडं लक्ष देता येईल. मात्र असं वाटणं ही खूप मोठी चूक ठरेल. ‘रीव्हर्स बोरिंग’सारख्या धोकादायक प्रकारांमुळे आत्ताही अनेक जीव धोक्यात आले आहेत. आजचा अदृश्य कचरा हा उद्याची नौबत ठरणारच आहे. कानपूरमध्ये, लुधियानात आणि इतर अनेक शहरांमध्ये औद्योगिक कचरा आणि सांडपाणी या गोष्टी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात. यातून कर्करोग, क्षयरोग आणि मज्जासंस्थेचे आजार अशा अनेक भयावह समस्या निर्माण होत असतात. तेही फक्त नळाचं पाणी प्यायल्यामुळे. आता आपणच ठरवायचं आहे की, स्वतःच्या आयुष्याची किंमत आज अदृश्य आहे म्हणून दुर्लक्षित करायची की त्याची किंमत ओळखून आजच त्याबाबत जागरूक व्हायचं.

लेखक: प्रथमेश पाटील

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 7/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate