অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खनिज तैलाशयांचे समन्वेषण

समन्वेषण म्हणजे शोध घेण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक पाहणी करणे होय. वर उल्लेख केल्यासारख्या पृष्ठीय लक्षणांवरून खोल जागी असलेल्या तैलाशयाचा शोध लागणे शक्य असते व तसा तो कित्येकदा लागलेलाही आहे.परंतु तैलाशय शोधून काढण्यासाठी अशा लक्षणांचा उपयोग आता सामान्यत: होत नाही.पृष्ठीय लक्षणांवरून ज्यांचा मागमूस लागणे शक्य आहे असे साठे आता फारसे उरलेले नाहीत. आणखी असे की, पृष्ठभागी कोणतीच लक्षणे नसतानाही खोल जागी तैलाशय व काही वेळा मोठा तैलाशयही असणे शक्य असते. म्हणून आता भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पद्धती वापरून तैलाशयांचा शोध केला जातो

एखाद्या प्रदेशात तैलाशय आहे की काय हे पहावयाचे असेल, तर त्या प्रदेशात सर्वत्र हिंडून तेथल्या खडकांची व त्यांच्या संरचनांची काळजीपूर्वक पाहणी केली जाते व त्या प्रदेशाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करण्यात येतो. अशा माहितीवरून त्या प्रदेशात तैलाशय असण्याचा संभव आहे की नाही हे कळते. अशा म्हणजे केवळ भूवैज्ञानिक पाहणीवरून त्या प्रदेशातल्या खडकांचे प्रकार व त्यांच्या संरचनांचे स्थूल स्वरूप ही कळून येतात. अशा माहितीवरूनही कधीकधी तैलाशयाचा शोध लागण्याची शक्यता असते, पण अधिक निश्चित माहिती मिळविण्यासाठी अधिक खोल जागेतल्या संरचनांची पाहणी करावी लागते. प्रारंभिक पाहणीवरून एखाद्या क्षेत्रात तेलाचा साठा निर्माण होण्यास अनुकूल संरचना आहे असे आढळून  आल्यास तेथे विहीर खणावी लागते. एखाद्या ठिकाणी तेल आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष विहीर खणण्याशिवाय सध्या तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. खनिज तेलाचे शास्त्रीय पद्धतींनी समन्वेषण करण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात: (१) अनुकूल उद्‍गम शैल, आशय शैल, सापळे, द्रवगतिक (द्रवाची गतीसंबंधीची) अवस्था इ. ज्यांमध्ये आहेत, असे प्रदेश निश्चित करावे लागतात; (२) खनिज तेलाचे सापळे निर्माण होऊ शकतील अशा संरचना उदा., घड्या, विभंग इ. शोधाव्या लागतात; (३) अशा ठिकाणी खनिज तेल आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी विहिरी खणाव्या लागतात व (४) तेलाच्या साठ्याचा शोध लागल्याबरोबर त्याचा विस्तार, तेलाचे गुणधर्म इत्यादींबद्दल निश्चित माहिती मिळवावी लागते.खनिज तेलाच्या शोधासाठी करण्यात येणाऱ्या समन्वेषणाचे भूवैज्ञानिक व भूभौतिक असे दोन विभाग स्थूलमानाने पडतात, परंतु कित्येकदा त्यांत काटेकोर फरक करणे शक्य होत नाही.

भूवैज्ञानिक पद्धती

यांत पृष्ठीय भूविज्ञान, प्रयोगशाळांतील अध्ययन, छायाचित्रण व प्रादेशिक भूविज्ञान यांचा समावेश होतो.

पृष्ठीय भूविज्ञान

जेथे समन्वेषण करावयाचे असेल त्या प्रदेशाचा प्रथम आधारभूत नकाशा तयार करतात. तेथील खडकांच्या दृश्यांशांची (पृष्ठावर उघड्या पडलेल्या भागांची) पाहणी व अभ्यास करून आणि आधारभूत नकाशा वापरून भूवैज्ञानिक नकाशा तयार करतात. या कामांमध्ये थरांच्या खडकांचे स्तंभ, भूवैज्ञानिक अनुप्रस्थ (आडवे) छेद इ. तयार करावे लागतात. ही सर्व पाहणी केल्यामुळे त्या प्रदेशात उद्‍गम शैल, आशय शैल, सापळे इ. आहेत किंवा नाहीत याची माहिती मिळते.खडकांची पाहणी करीत असतानाच या प्रदेशात खनिज तेलाचे पाझर आहेत किंवा नाहीत, हेही पहावे लागते.

प्रयोगशाळांतील अध्ययन

पृष्ठीय आणि अध:पृष्ठीय भूविज्ञानाचा अभ्यास करताना गोळा केलेल्या खडकांचे प्रयोगशाळांत सविस्तर विश्लेषण करतात. त्यामुळे खडकांचे गुणधर्म, खनिजे, जीवाश्म, खडकांची सच्छिद्रता, पार्यता, जलसंतृप्ती (पाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण सामावलेले असणे), तैलसंतृप्ती इत्यादींबद्दल माहती मिळते.याचा उपयोग नवीन विहिरींच्या जागा ठरविणे, समन्वेषणासाठी नवीन प्रदेश निवडणे यांसाठी होतो.

छायाचित्रण

या पद्धतीत विमानातून काढलेल्या भूपृष्ठाच्या छायाचित्रांचा अभ्यास केला जातो. एखादा प्रदेश अत्यंत दुर्गम असला, परंतु त्यात उत्कृष्ट दर्जाचे दृश्यांश असले, तर त्या प्रदेशाचे हवाई छायाचित्रण करून त्या प्रदेशाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे शक्य होते. अशा छायाचित्रांमध्ये विस्तीर्ण प्रदेशाचे सम्यक् दर्शन घडते. दृश्यांश तितक्या चांगल्या प्रतीचे नसले तरी तेथील वनस्पती, घड्या, विभंग यांसारख्या संरचना, मृदेचे गुणधर्म इत्यादींच्या आधारे तेथील भू-आकारविज्ञान व पर्यायाने संरचना यांच्याविषयी अप्रत्यक्ष अनुमान करता येते. सध्या हवाई छायाचित्रणामध्ये खूप प्रगती झालेली आहे. या कामी सूक्ष्मतरंग व अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील प्रारणांच्या) तंत्राचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. या तंत्रास दूर संवेदना तंत्र म्हणतात. तसेच कृत्रिम उपग्रहांद्वारा काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग करूनही प्रादेशिक भूविज्ञानाबद्दल महत्त्वाची माहिती मिळवितात.

प्रादेशिक भूविज्ञान

खनिज तेलाच्या पूर्वेक्षणासाठी पृष्ठीय भूविज्ञान, अंध:पृष्ठीय भूविज्ञान, भूभौतिकी इ. भिन्न मार्गांनी मिळविलेली माहिती एकत्र केल्यास तेथील प्रादेशिक भूविज्ञानाची कल्पना येते. खडकांचे व त्यांत आढळणाऱ्या प्रवाही पदार्थांचे गुणधर्म समजले म्हणजे तेलाचे साठे साधारणपणे कोठे मिळू शकतील, याचे स्थूल अनुमान काढणे शक्य होते.

भूभौतिकी पद्धती

भूकवचामध्ये जमिनीखाली खोल जागी असणाऱ्या खडकांच्या भिन्न प्रकारांमुळे आणि त्यांच्यात असणाऱ्या निरनिराळ्या संरचनांमुळे  भौतिक गुणधर्मांत फरक पडतात. भूभौतिक पद्धतीत भूकवचातील भौतिक गुणधर्मांमधील फरकांची पाहणी व मोजणी करतात. या माहितीवरून भूपृष्ठाखालील खडकांचे स्वरूप, त्यांच्या प्रकारांतील फरक, त्यांच्यातील संरचना इत्यादींबद्दल अप्रत्यक्ष रीतीने आणि स्थूलमानाने अंदाज बांधता येतात.खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्यासाठी भूभौतिक पद्धती १९३० सालापासून प्रामुख्याने वापरात येऊ लागल्या. या पद्धतीचे (१) गुरुत्वाकर्षण, (२) चुंबकीय, (३) विद्युत्, (४) भूकंपीय व (५) किरणोत्सर्गी हे प्रकार आहेत.खंडांच्या किनाऱ्यालगत व उथळ समुद्राच्या तळाखाली असलेल्या प्रदेशातील खडकांविषयी तसेच खोल सागराच्या तळाखाली असलेल्या प्रेदशातील खडकांविषयी माहिती मिळविण्यासाठीही भूभौतिक पद्धतींचा उपयोग करतात. यांपैकी भूकंपीय पद्धत विशेष प्रभावी ठरते. मात्र ती खर्चाची असल्यामुळे तिचा वापर मर्यादित क्षेत्रातच करणे योग्य असते. म्हणून कमी खर्चाच्या गुरुत्वाकर्षण व चुंबकीय पद्धती सामान्यत: प्रथम वापरून नंतरच सापेक्षत: अधिक निश्चित व मर्यादित जागांमध्ये भूकंपीय पद्धतीने समन्वेषण करतात [ खनिज पूर्वेक्षण]. भूभौतिक पद्धतींत आशय शैलांचे गुणधर्म, त्यांचा विस्तार आणि आकार इत्यादींचे मूल्यमापन करावे लागते. तेलाचे काही साठे विसंगतीची पातळी, संलक्षणी (खडकाच्या व त्यातील प्राण्यांच्या वैशिष्ट्यांतील) बदल, खडकांची सच्छिद्रता आणि पार्यता यांच्यात होणारे बदल इ. भिन्न कारणांनी उत्पन्न झालेले असतात. अशा प्रकारचे स्तरित साठे शोधून काढण्यास भूभौतिक पद्धती फारशा उपयुक्त ठरत नाहीत. मात्र या पद्धतींच्या आधारे एखाद्या ठिकाणी तेलाचे साठे निर्माण होण्यास अनुकूल अशा संरचना आहेत किंवा नाहीत, हे समजू शकते. मात्र अशा संरचनांत खनिज तेल निश्चितपणे आहे किंवा नाही हे समजण्यासाठी विहीरच खणावी लागते.

भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पद्धतींनी एखाद्या जागी तेलाचा साठा हमखास सापडेल असे सांगता येत नसले, तरी त्यांच्या साहाय्याने केलेली भाकिते बऱ्याच वेळा खरी ठरतात.कोणताच वैज्ञानिक सल्ला न घेता तेलासाठी ज्या विहिरी खणण्यात आल्या त्यांच्यापैकी शेकडा चारातही तेल आढळले नाही. उलट वर उल्लेख केल्यासारख्या वैज्ञानिक पद्धती वापरून ज्यांच्या जागा निवडल्या होत्या अशा विहिरींपैकी शेकडा साठ विहिरींत तेल आढळले. म्हणून आता वैज्ञानिकांचा सल्ला घेतल्याशिवाय तेलासाठी विहिरी खणीत नाहीत.

छिद्रण

भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पाहणीवरून एखाद्या क्षेत्रात तेल असण्याचा संभव आहे, असे दिसून आल्यावर त्या क्षेत्रातील एखाद्या जागी नळासारखे भोक पाडून तेल मिळते की नाही ते पाहतात. भोक पाडण्याच्या या क्रियेला छिद्रण म्हणतात.तेलाच्या विहिरीसाठी पाडलेली भोके ५ ते ३० सेंमी. व्यासाची आणि काही हजार मीटरांइतकी खोल असू शकतात व या भोकांनाच विहिरी म्हणतात.अ१९२० सालापूर्वी खणलेल्या विहिरी क्वचितच १,२२० मी. पेक्षा अधिक खोल असत. त्यानंतर विहिरी खणण्याच्या यंत्रात अधिकाधिक सुधारणा होत गेल्या. १९५० साली कॅलिफोर्नियातील पालोमा क्षेत्रातील सर्वांत खोल विहिरीची खोली ६,५४८ मी. होती.१९५८ साली टेक्ससमधील पेकस काउंटीमध्ये फिलिप्स पेट्रोलियम कंपनीने खणलेली विहीर ८,००० मी. खोलीची आहे. अशी भोके पाडण्यासाठी आता सामान्यत: चक्रीय छिद्रण पद्धती वापरली जाते [ वेधन व छिद्रण].

मोठ्या व्यासाच्या भोकाला वेध व लहान व्यासाच्या भोकाला छिद्र म्हणतात. चक्रीय छिद्रणाच्या सामग्रीत एक उंचसा लोखंडी मनोरा असतो. त्याच्या तळाच्या मजबूत मंचावर एंजिन, चलित्र (मोटर) वगैरे चालक यंत्रणा, पंप इ. साहाय्यक यंत्रे असतात. मनोऱ्याच्या टोकाशी खालच्या बाजूला कप्प्यांचा एक संच असून त्याच्या खालच्या ठोकळ्याला एका भोवरकडीद्वारे छिद्रकमालिका जोडलेली असते. या मालिकेत सुरुवातीला एक मजबूत, जाड व चौरस छेदाचा पोकळ पोलादी केली (नळ) असतो. तो १०–१५ मी. लांब असून एका मोठ्या आडव्या दंतचक्राच्या मध्यातून जातो. हा केली चक्राबरोबर गोलगोल फिरतो व त्याच वेळी वरखालीही होऊ शकतो. केलीच्या खालच्या टोकाला दुसऱ्या नळांचे तुकडे जरूरीप्रमाणे जोडता येतात. शेवटच्या नळाच्या टोकाला छिद्रक आट्यांनी बसविलेला असतो. याप्रमाणे छिद्रकमालिकेत केली, नळ व छिद्रक येताना आणि भोक पाडताना सबंध मालिका फिरत असते.छिद्रक फिरताना तो त्यावरील नळांच्या वजनाने खालीखाली कापत जातो आणि भोक अधिक खोल होत जाते. छिद्रक निरनिराळ्या प्रकारचे असतात, पण हल्ली औद्योगिक हिरे (आकारमानाने लहान असलेले व काही अशुद्ध पदार्थांनी युक्त असलेले हिरे) बसविलेले छिद्रकच जास्त करून वापरतात.

छिद्रण चालू असताना पाणी व चिखल ही सतत नळातून भोकात सोडावी लागतात. द्रवाबरोबर येणारा खडकांचा भुगा तपासून त्यावरून काही अनुमाने बांधता येतात. तसेच खडक लागल्यास कधीकधी त्याचे वरवंट्यासारखे लांब तुकडेही (आंतरक) परीक्षेसाठी वर काढता येतात.

छिद्रण अव्याहत चालू ठेवून काम लवकर संपवता येते. छिद्रणाचे काम वाटते तितके सोपे नसते. त्यात निरनिरळ्या अडचणी येतात. छिद्रण तुटणे, नळ भोकात अडकणे, भोक वाकडे जाणे व भोकातून वायू, तेल किंवा पाणी न आवरता येण्याइतक्या जोराने एकदम बाहेर येऊ लागणे या छिद्रणातील मुख्य अडचणी होत.

तेलासाठी विहिरी खणण्याचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार आहेत

(१) उथळ भागातील छिद्रण, (२) चाचणी छिद्रण व (३) विकास छिद्रण. हल्ली पाण्याखाली विहिरी खणण्याचा अपतटी (किनाऱ्यापासून दूर) छिद्रणाचा चौथा प्रकार वापरण्यात येत आहे. उथळ छिद्रण केवळ अध:पृष्ठीय भूवैज्ञानिक माहिती मिळविण्यासाठी करतात.खणण्याचे काम चालू असताना आत आढळणाऱ्या खडकांचे आंतरक सतत काढले जातात. या कामासाठी ट्रकवर बसविलेली छिद्रण यंत्रे वापरतात. सु. ५–१० सेंमी.व्यासाच्या १०० ते ३०० मी. खोल विहिरी खणून त्यांत मिळणारे शैलकण, आंतरक इत्यादींची पाहणी करून स्तरवैज्ञानिक व संरचनात्मक माहिती मिळविता येते. शास्त्रीय पूर्वेक्षणाशिवाय केवळ अंदाजाने म्हणजे ज्याप्रमाणे जुगार खेळतात त्याप्रमाणे प्रसंगी धोका पत्करून कोठेतरी खणलेल्या विहिरींचा चाचणी छिद्रण प्रकारात समावेश होतो. एखाद्या ठिकाणी तेलाचे साठे आहेत वा नाही हे पाहण्यासाठी भूवैज्ञानिक व भूभौतिक माहितीच्या आधारे खणलेल्या विहिरीस समन्वेषण विहीर म्हणतात. विहिरी खणत असताना (१) त्यांतून निघणाऱ्या शैलकणांचे व आंतरकांचे परीक्षण करण्यासाठी, (२) त्या विहिरींत खनिज तेल मिळाले, तर त्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आणि (३) छिद्रणाचे काम निर्विघ्नपणे व सुरळीत चालू राहण्यास मदत करण्यासाठी छिद्रणाच्या जागी तज्ञ व अनुभवी भूवैज्ञानिक २४ तास उपस्थित असणे आवश्यक असते.छिद्रण चालू असताना जमिनीखालील विविध थरांचा दाब व छिद्रणाच्या चिखलामुळे निर्माण होणारा दाब हे संतुलित ठेवावे लागतात. नाहीतर कित्येक वेळा अपघात होतात, तसेच हा चिखल आशय शैलात घुसून दुष्परिणाम होतात. विहिरीतून बाहेर पडणारे शैलकण, आंतरक व चिखल यांच्यामध्ये तेलाचा अंश आहे किंवा नाही, यांवर सारखे लक्ष ठेवावे लागते. वेळोवेळी विहिरीतील खडकांचे व त्यांच्या गुणधर्मांचे कूप –अभिलेखन (क्रमवार नोंदणी) करून थरांचे गुणधर्म, त्यांतून खनिज तेलाच्या प्राप्तीची शक्यता इत्यादींबद्दल माहिती मिळवावी लागते.तेलाच्या साठ्याचा शोध लागल्यानंतर जेव्हा त्यातून उत्पादन सुरू होते, तेव्हा तेलाचे जास्तीत जास्त व किफायतशीरपणे उत्पादन करण्यासाठी काही अधिक विहिरी खणाव्या लागतात. अशा कामासाठी केलेल्या छिद्रणास विकास छिद्रण असे म्हणतात.

अपतटी समन्वेषण

जमिनीवरील तेलाचे साठे सापडणे जसजसे कठीण होऊ लागले आणि तेलाची मागणी वाढू लागली तसतसे समुद्र किनाऱ्याजवळच्या पाण्याखालील प्रदेशांत समन्वेषण करण्याचे कार्य वाढू लागले.समुद्राच्या पाण्याखाली असणाऱ्या तेलाचा शोध लावण्यासाठी प्रथम कॅलिफोर्नियात विहिरी खणण्यात आल्या. या विहिरी सरळ उभ्या दिशेत न खणता वक्र दिशेत खणाव्या लागल्या. अशा प्रकारात जेव्हा विहीर खणण्याचे काम पूर्ण होते, तेव्हा विहिरीचा तळ खणण्याच्या मूळ जागेपासून समुद्रात दूर अंतरावर व समुद्राच्या पाण्याखाली असणाऱ्या आशय शैलात जाऊन पोहोचलेला असतो. समुद्रातील उथळ पाण्यामध्ये पहिली विहीर १९४५ साली अमेरिकेतील लुइझिअ‍ॅना राज्यालगतच्या समुद्रात छिद्रण यंत्र उभारून खणण्यात आली. नंतर व्हेनेझुएलातील मराकायबो तळे, इराणचे आखात, कॅस्पियन समुद्रालगतचे बाकू क्षेत्र इ.ठिकाणी अशा विहिरी खणण्यात आल्या.१९७१ सालापर्यंत जगभर सु. ७५ देशांत ३०० मी. खोल पाणी असणाऱ्या सु. २·०५ कोटी चौ. किमी. प्रदेशात खनिज तेलासाठी समन्वेषण करण्यात आले. १९७० च्या सुमारास अंटार्क्टिका खंड सोडून जगातील इतर सर्व खंडांत समुद्राच्या पाण्यात तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्याचे काम सुरू झालेले होते.

समुद्राच्या किनाऱ्याकडील खंडीय निधायाच्या (किनाऱ्याजवळील कमी उताराच्या समुद्रातील भागाच्या) सु.दीड कोटी चौ. किमी. प्रदेशात पाण्याखालील जमिनीत खनिज तेलाचे साठे सापडतील असा अंदाज आहे. १९६८ साली जगात झालेल्या खनिज तेलाच्या एकूण उत्पादनांपैकी सु. १५ टक्के उत्पादन अपतटीय प्रदेशातील होते. जगातील एकूण तेलसाठ्यांपैकी १९ टक्के तेलसाठे अपतटीय भागात आहेत. यांपैकी २० टक्के क्षेत्रांची छिद्रण करून पाहणी करण्यात आली आहे. या सर्व प्रदेशांचे भूभौतिक समन्वेषण होण्यास शंभराहून अधिक वर्षे लागतील असा अंदाज आहे. सध्या उत्तर समुद्र, फ्रान्सलगतची ब्रिटिश खाडी, ईजिप्तच्या बाजूचा तांबडा समुद्र, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर, पश्चिम व दक्षिण भागांतील समुद्र, सुमात्रा लगतचा समुद्र, अमेरिकेचा गल्फ किनारा, अलास्काच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र, इराणचे आखात, मध्य व दक्षिण अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील समुद्र, नायजेरिया व उत्तर आफ्रिका यांच्या आसपासचा समुद्र या भागांत अपतटी छिद्रण चालू आहे व काही भागांत ते चालू करण्याच्या योजना आहेत. यांशिवाय बाल्टिक समुद्र, चिनी समुद्र, थायलंडची खाडी, आयरिश समुद्र, आर्क्टिक महासागर आणि आर्क्टिक बेटे या भागांतही अपतटी समन्वेषणाचे काम चालू आहे. वर उल्लेख केलेल्या प्रदेशांपैकी (१) लुइझिअ‍ॅनाजवळील गल्फ, (२) उत्तर समुद्र, (३) ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस असलेली बास सामुद्रधुनी, (४) अलास्कामधील कुक इन्लेट (खाडी), (५) नायजेरियाजवळील समुद्र व (६) इराणचे आखात या भागांत तेलाचे व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे सापडले आहेत. १९६७-६८ च्या सुमारापासून भारतीय तंत्रज्ञांनी रशियन तंत्रज्ञांच्या व जहाजांच्या मदतीने भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीची प्राथमिक पाहणी केली. मुंबईजवळील समुद्रामध्ये ‘बाँबे हाय’ नावाच्या भागात अशा छिद्रणाचे काम चालू आहे. १९७५ च्या मध्यापर्यंत तेथे पाच विहिरी खोदण्यात आल्या असून त्यांच्यात तेल लागले आहे. या भागातून किती तेल मिळू शकेल आणि ते कोणत्या प्रकारचे असेल, यांविषयीचे संशोधन चालू आहे.

अपतटी छिद्रण

समुद्राच्या तळाखालील तेल शोधणे व त्यासाठी छिद्रण करणे हे भूपृष्ठावरील कामापेक्षा फार अवघड असते. त्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.कारण छिद्रण पाण्यातून करावे लागते. छिद्रणाची यंत्रणा जमिनीवर वापरताना जमिनीचा पक्का आधार मिळतो. त्यामुळे यंत्रणा पक्की बसविता येते. समुद्रात छिद्रण करताना यंत्रणा पाण्यावर तरंगणाऱ्या मोठ्या मंचावर किंवा जहाजावर केलेली असते. समुद्राच्या लाटा, वादळे इत्यादींमुळे मंच व त्यावरील यंत्रणा यांना हेलकावे बसतात व त्यामुळे त्या अस्थिर असतात. यासाठी छिद्रण यंत्र ज्या मंचावर किंवा जहाजावर उभारायचे ते स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याशिवाय समुद्रातील प्रवाह, लाटांचा जोर, त्यांची भरती व ओहोटी, तळावरील वाळूची हालचाल यांच्या परिणामांचा विचार करावा लागतो.समुद्राच्या पाण्यात पुष्कळ प्रकारची लवणे विरघळलेली असतात. या पाण्यामुळे छिद्रण यंत्राच्या धातूच्या भागांवर रासायनिक क्रिया होऊन त्यांची फुटतूट होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. वरील सर्व अडचणींना तोंड देऊ शकेल अशी यंत्रणा तयार करण्यासाठी मोठाल्या कारखान्यांचे व शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत.

अपतटी छिद्रणाचे कार्य प्रथम सुरू झाले त्या काळी छिद्रण यंत्र जहाजाला बांधून छिद्रण करावयाच्या जागी नेत आणि तेथे मंच शक्य तितका पक्का बसवीत.अशा प्रकाराने बसविलेल्या छिद्रण मंचास अचल मंच म्हणतात.पुढे या पद्धतीत अनेक सुधारणा करण्यात आल्यामुळे छिद्रण यंत्र एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे व पाण्याची खोली जास्त असली, तरीही छिद्रण करणे शक्य झाले व चल छिद्रण मंच उपयोगात येऊ लागले.चल छिद्रण मंचाचे (१) स्वयंउत्थापक मंच, (२) पाण्याखाली संपूर्ण बुडणारा मंच, (३) पाण्याखाली अर्धवट बुडणारा मंच व (४) तरता मंच असे मुख्य प्रकार वापरात येऊ लागले. यांपैकी स्वयंउत्थापक मंच सर्वांत जास्त वापरला जातो. स्वयंउत्थापक मंच जहाजाला बांधून छिद्रणाच्या जागी नेण्यात येतो. त्याचे पाय समुद्राच्या तळावर टेकविले जातात व मंच लाटांच्या पातळीहून उंच जागी चढविला जातो. हा मंच नवीन जागी छिद्रण करण्यास उपयुक्त असतो तो वापरून सु. १०० मी. खोल पाण्यात छिद्रण करता येते. ‘बाँबे हाय’ येथील अपतटी छिद्रणासाठी वापरण्यात आलेला ’सागरसम्राट’ हा मंच या प्रकारचा असून तो जपानकडून विकत घेण्यात आला आहे. अपतटी छिद्रण मंचाची कल्पना आ. २ वरून येईल.

पाण्याची खोली जास्त असेल, तर तरता मंच वापरतात. असे मंच जहाजावर बसविलेले असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे सोपे असते. अशा मंचावरील यंत्रांच्या साहाय्याने सु. ३०० मी. पर्यंत खोल पाण्याखाली असणाऱ्या भागात छिद्रण करता येते. या कामात पूर्वरचित छिद्रण यंत्रांचाही वापर करण्यात येतो. अपतटी छिद्रण यंत्रावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांसाठी राहण्याची सोय मंचावरच करण्यात येते. मालाची व माणसांची वाहतूक हेलिकॉप्टरने किंवा लाँचने केली जाते. मंचावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोयही असते. तेलाचे उत्पादन सुरू झाल्यावर थोडेफार तेल साठविण्याची सोयही मंचावर केलेली असते.

अपतटी छिद्रणासाठी  ‘एल्फओशन’ या नावाची अगदी आधुनिक यंत्रसामग्री हल्ली वापरण्यात येऊ लागली आहे. हे एक फार मोठे नळकांडे असते. ते समुद्रतळावर पक्क्या केलेल्या चबुतऱ्याला घट्ट पकडून पायात सरळ उभे राहते. या नळकांड्याला पाण्याच्या पातळीखाली मोठाल्या फुगीर उत्प्लावक (तरंगणाऱ्या) टाक्या जोडलेल्या असतात. त्यामुळे ते सरळ उभे राहते. वादळ नसल्यास ते पूर्णपणे स्थिर राहते आणि वादळात त्यात सापेक्षत: कमी हेलकावे निर्माण होतात.या नळकांड्यांच्या वरच्या बाजूवर मंच बांधलेला असतो.

वर नमूद केलेल्या अपतटी छिद्रणात येणाऱ्या अडचणींशिवाय या कामात कधीकधी अपघात व धोकेही निर्माण होतात. उदा., विहिरीतून तेल व नैसर्गिक वायू प्रचंड फवाऱ्यासारखे बाहेर पडणे, आगी लागणे, छिद्रण मंच मोडणे इत्यादी. यांमुळे कित्येकदा छिद्रणाचे काम नुकसान सोसूनदेखील अर्धवट स्थितीत कायमचे सोडून द्यावे लागते.नैसर्गिक वायू व खनिज तेल सतत वाहत राहिल्यास इतरही दुष्परिणाम होतात. खनिज तेल पाण्यात फारसे विरघळत नसल्याने व ते पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे त्याचा तवंग पाण्यावर राहतो व दुसरे म्हणजे त्यामुळे पाण्यातील वनस्पती व प्राणी यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ती मरतात. अशा प्रकारे पर्यावरणीय प्रदूषण होते. वरील अडचणींना तोंड देण्यासाठी व गंभीर धोके टाळण्यासाठी प्रयत्न आणि संशोधन सतत चालू आहेत.

लेखक : र.पां.आगस्ते ; दि.रा.गाडेकर ; चं.स.टोणगावकर ;अ.ना.ठाकूर ; र.वि.जोशी, ;ह.कृ.जोशी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate