অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नैसर्गिक वायु

नैसर्गिक वायु

भूपृष्ठाखाली खोल खडकात असणारा व सामान्यतः खनिज तेलाच्या साठ्यांच्या सान्निध्यात आढळणारा ज्वालाग्राही वायू. खनिज तेलाचे साठे निर्माण होण्यास ज्या प्रकारची भूवैज्ञानिक परिस्थिती आवश्यक असते, त्याच परिस्थितीमध्ये याची निर्मिती होते [→ खनिज तेल]. काही वेळा हा वायू त्यावर रासायनिक प्रक्रिया न करता वापरण्यात येतो, तथापि कित्येकदा या वायूत असणारी कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, गंधकयुक्त रसायने इ. अशुद्ध द्रव्ये काढून टाकून हा शुद्ध करण्यात येतो. एक आदर्श इंधन व रासायनिक उद्योगासाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून नैसर्गिक वायू वापरला जातो.

हा खनिज तेल व पाणी यांपेक्षा हलका असल्यामुळे (वि. गु. ०·६ ते ०·९) खनिज तेलाच्या साठ्याच्या सर्वोच्च भागात तो एकत्रित होतो. कित्येकदा अशा साठ्यांच्या आसमंतात भ्रंश अथवा विभंगामुळे भेगा पडतात व अशा भेगांतून खोल जागी असणारा वायू भूपृष्ठावर येतो. झरे, नद्या आणि विहिरीतील पाण्यामधून भूपृष्ठाखालून येणाऱ्या नैसर्गिक वायूचे बुडबुडे दिसू शकतात.

इतिहास

इ. स. पू. ६००० ते २००० वर्षांपासून इराणमध्ये नैसर्गिक वायूच्या अशा स्वरूपाच्या आढळांची माहिती उपलब्ध होती. इ. स. पू. ९०० वर्षांपासून याचा उपयोग चीनमध्ये केल्याचे उल्लेख सापडले आहेत. इ. स. ९०० ते १००० च्या सुमारास चीनमध्ये विहिरी खणण्यात येऊन हा वायू पोकळ बांबूच्या नळांतून वाहून नेत असत.

इंग्लंडमध्ये इ. स. १६५९ च्या सुमारास नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध लागला. १६७० मध्ये कोळशाचे उर्ध्वपातन (बंदिस्त जागेत जाळून घटक अलग करण्याची क्रिया) करून वायू निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. १७९० मध्ये अंतर्ज्वलन (ज्यातील सिलिंडरामध्येच इंधन जाळून कार्यकारी द्रव्याला उष्णता दिली जाते अशा) एंजिनाचा शोध लागल्यापासून हा वायू एंजिनात जास्त प्रमाणात वापरण्यात येऊ लागला. १८२१ मध्ये न्यूयॉर्कजवळील फ्रीडोनीया शहरात घरे आणि रस्ते प्रकाशित करण्यासाठी या वायूचा सर्वप्रथम उपयोग करण्यात आला. हा दूरवर वाहून नेण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करणे सु. १०० वर्षे शक्य झाले नाही. धातूच्या नळांतून वायुवहनाची पद्धत सु. १९२० मध्ये शोधून काढण्यात आली व त्यानंतर याच्या वापरात झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनास प्रंचड चालना मिळाली (कोष्टक क्र. १).

कोष्टक क्रं १. नैसर्गिक वायूच्या उत्पादनातील जागतिक वाढ

वर्ष

नैसर्गिक वायूचे जागतिक

उत्पादन X १०घ. मी.

जागतिक ऊर्जेचे

प्रतिशत प्रमाण

१९५०

२००

१२·०

१९६०

४७०

१४·६

१९८०

(संभाव्य)

१,६३०

१८·५

 

गुणधर्म

हा सामान्यतः मिथेन (CH4) व एथेन (C2H6) या दोन वायूंचे मिश्रण असतो. वातावरणीय परिस्थितीमध्ये ही दोन्ही हायड्रोकार्बने वायुरूप असतात. याव्यतिरिक्त नैसर्गिक वायूमध्ये प्रोपेन (C3H8), ब्युटेन (C4H10), पेंटेन (C5H12) इ. हायड्रोकार्बने आणि इतर द्रव पदार्थ असतात (कोष्टक क्र.२).

कोष्टक क्र. २. जगातील विविध क्षेत्रांतील नैसर्गिक वायूंचे

रासायनिक संघटन (%).

क्षेत्र

ह्यूगोटन, टेक्सास

टर्नर व्हॅली, कॅनडा

बाकू, रशिया

ग्रोनिंगेन, नेदर्लंड्स

मिथेन

७६·२

९२·६०

८८·००

८१·३०

एथेन

४·०

४·१०

२·२६

२·८४

प्रोपेन

२·६

२·५०

०·७०

०·४३

ब्युटेन

१·३

०·७०

०·७०

०·१४

पेंटेन व अधिक

रेणुभाराची हायड्रोकार्बने

०·६

०·१३

०·५०

०·१०

कार्बन डाय-ऑक्साइड

०·५

६·५०

०·८७

नायट्रोजन

१२·८

१४·३२

ऑक्सिजन

२·०

०·०१

 

यातील प्रोपेन आदी घटक वातावरणीय परिस्थितीत द्रवरूप असतात. तथापि भूपृष्ठांतर्गत परिस्थितीत ते वायुरूप असतात. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन व एथेन या वायूंव्यतिरिक्त भूपृष्ठांतर्गत परिस्थितीत नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड आणि अक्रिय (इतर मूलद्रव्यांबरोबर सहजासहजी ज्यांची रासायनिक विक्रिया होत नाही असे) वायू अशुद्ध स्वरूपात असतात. या अशुद्ध वायूंचे किफायतशीर उत्पादन करता येत नाही. तथापि नैसर्गिक वायूच्या कित्येक क्षेत्रांत हीलियम वायू ८% पर्यंत असतो. अशा क्षेत्रांतून नैसर्गिक वायूच्या उत्पादनाबरोबरच हीलियम वायूचे उत्पादन किफायतशीरपणे करता येते.

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate