অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टिकऊ या सागर संपदा!

टिकऊ या सागर संपदा!

समुद्राचं आकर्षण प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणासाठी असतं. मासेमारी, किनाऱ्यावरची भटकंती, सागरगर्भातील खनिजे, किनाऱ्याशी मनसोक्त खेळणाऱ्या अवखळ लाटा आणि या लाटांचे आव्हान पेलत होणारे जलतरण... सागर किनाऱ्यावर उभे राहून समोरचे सौंदर्य नजरेत साठविताना मधूनच पायाखाली किंवा सभोवती नजर गेली की या सौंदर्याला अस्वच्छतेची 'किनार' असल्याचे दिसते. मधूनच हातातले रॅपर किनाऱ्यावर टाकणारे पर्यटक दिसतात. अशा मानवी हस्तक्षेपामुळे कित्येकांच्या हृदयात विविध कारणांनी आनंदाच्या लाटा निर्माण करणारा समुद्र प्रदूषित होतो आहे...त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक सजिवांचे जीवन धोक्यात आले आहे...याची जाणीव 'आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लिनअप डे'च्या निमित्ताने होते.

समुद्र केवळ किनाऱ्यावरील नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त संपत्तीचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता का आवश्यक आहे, यामागचे कारण जाणून घेणे योग्य ठरेल. शनिवारी 31 वा 'सागरी तट स्वच्छता दिन' साजरा करण्यात येणार आहे. ‘अमेरिकन सेंटर फॉर मरीन कन्झर्वेशन’ने पुढाकार घेऊन 1986 मध्ये 'सागर तट स्वच्छता उपक्रमाचे' प्रथमच आयोजन केले होते. त्यात 2800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. तेव्हापासून नियमितपणे या दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे. या दिवसाचे आयोजन करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार निश्चित करण्यात आला आहे. समुद्राबरोबरच तलाव, झरे यांचादेखील समावेश अशा उपक्रमात केला जातो. जगभरातल्या 150 देशातील पाच लाखाहून अधिक नागरिक या उपक्रमात स्वत:हून सहभाग नोंदवितात.

इंटरनॅशनल कोस्टल क्लिनअपने केलेल्या सर्वेक्षणानुसार समुद्रतटावर आढळणाऱ्या 59 टक्के कचऱ्याचा मुख्य स्त्रोत तटाला लागून असलेला मुख्य भूभाग अथवा त्यावरील गावे असतात. पर्यटक समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक बॅग्ज, बाटल्या टाकतात. किनाऱ्यावर राहणारे नागरिक घरातील कचरा समुद्रात फेकतात. या कचऱ्यात सर्वाधिक प्रमाण सिगारेटचे तुकडे, बाटल्यांची झाकणे, बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन, स्ट्रॉ यांचे असते.

एका सर्वेक्षणानुसार समुद्री 59 टक्के पक्षांमध्ये आणि सर्व समुद्री कासवांमध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. दरवर्षी या प्रमाणात वाढ होत असल्याने समुद्री जीवसृष्टीच्यादृष्टीने ते घातक ठरते आहे. कचऱ्याच्या माध्यमातून विषारी पदार्थ शरीरात गेल्याने कित्येक सील, व्हेल, डॉल्फीन माशांचा जीव जातो. मासेमारीच्या जाळ्यांचे अवशेष किंवा प्लास्टीकमध्ये अडकून अनेक समुद्री पक्षी, मासे, कासव आदींना प्राण गमावावे लागतात. हे टाळण्यासाठी तसेच समुद्रतटाचे सौंदर्य आणि नैसर्गिक पर्यावरण कायम राखण्यासाठी सागरतटाची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.

सागरी स्वच्छता मोहिमेशी साडेअकरा दशलक्ष स्वयंसेवक जोडले गेले आहेत. सागरी स्वच्छतेसंदर्भात जागृती निर्माण होत आहे. यावर्षीच्या घोषवाक्यानुसार ‘प्लास्टिकच्या सागरात असणाऱ्या प्रमाणाएवढ्याच मोळ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे.’ या उपक्रमात सहभागी प्रथम दहा देशात भारताचा समावेश आहे हे विशेष. भारतात दरवर्षी 30 ते 35 हजार स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होतात. देशाच्या विस्तीर्ण किनाऱ्याच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत अल्प आहे.

''आपण तेवढे स्वच्छ रहावे l भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावे l

याने सुमंगलता कधी न पावे l तन, मन होई दूषित ll''

हे नागरिकांना समजाविल्याशिवाय स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा आनंद कुणालाही घेता येणार नाही आणि निसर्गाचे सर्वार्थाने रक्षणही करता येणार नाही.

हा उपक्रम केवळ सागरी स्वच्छतेबाबत मर्यादीत न ठेवता नदी आणि प्रत्येक पाण्याचा स्त्रोत प्रदूषणमुक्त राहिल, त्यात कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. हे वेळीच समजावून घेतले नाही तर जीवसृष्टीला मोठा धोका संभवतो. या धोक्याची जाणीव होऊन जलस्त्रोत स्वच्छतेसाठी प्रयत्न व्यापक व्हावेत यासाठीच हा दिवस आहे.

लेखक: डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate