অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूर्यप्रकाशाच्या संपर्काने स्वच्छ होणारे कपडे

सूर्यप्रकाशाच्या संपर्काने स्वच्छ होणारे कपडे

कपडे धुणे, वाळत टाकणे, इस्त्री करणे यासारख्या अनेक गोष्टी लवकरच बाजूला पडणार आहेत. केवळ सूर्यप्रकाशात वाळत टाकल्यास कपडे स्वच्छ होण्याविषयीचे तंत्रज्ञान विकसित झाले असून, कपडे धुण्याची गरजच राहणार नाही.

चीनमधील संशोधकांनी कापसाच्या धाग्यांना टिटॅनियम ऑक्‍साईड आणि नायट्रोजनच्या अति सूक्ष्म कणांचा थर दिला आहे, त्यामुळे या कापडाचे धागे हे आपोआप साफ होणार असून, मळ आणि सूक्ष्म जिवाणूंना दूर करणार आहेत. हे संशोधन "ऍप्लाइड मटेरिअल ऍण्ड इंटरफेसेस' या "एसीएस'च्या संशोधनपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.

प्रत्येक माणसाला दरवेळी नवे कपडे वापरणे शक्‍य नसते. कपडे मळतात, खराब होतात; मग कपडे धुण्यावाचून गत्यंतर नसते. त्यासाठी अनेक प्रकारचे डिटर्जंट, साबण वापरून पडलेले डाग घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; मात्र अति सूक्ष्म कणांच्या (नॅनो पार्टिकल्स) वापरामुळे कपडे धुण्याची गरजच राहणार नाही.

केवळ सूर्यप्रकाशात कपडे वाळत घालायचे, कपडे आपोआप स्वच्छ होणार आहेत. हे शक्‍य करण्यासाठी कापसापासून बनवण्यात आलेल्या धाग्यांना टिटॅनियम डाय- ऑक्‍साईडचा थर देण्यात आला आहे. हा पांढराशुभ्र धातू असून, रंग उद्योग आणि अन्न उद्योगासह सन स्क्रीन लोशनसारख्या प्रसाधनांमध्ये वापरला जातो.

हा धातू सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास मळांचे विघटन करून दूर करण्यासह सूक्ष्म जिवाणूंना नष्ट करतो, त्यामुळे आपोआप स्वच्छ होणाऱ्या खिडक्‍या, स्वयंपाकघर व बाथरूममधील फरशा, दुर्गंधरहित पायमोजे यासारख्या उत्पादनांत हा धातू वापरण्यात येतो. 
या पूर्वीही असे कपडे बनवण्याचे प्रयत्न झाले आहेत, त्याविषयी बोलताना संशोधक मिंगसे लॉंग आणि डेयांग वू यांनी सांगितले, की आपोआप स्वच्छ होणाऱ्या कपड्यांसाठी पूर्वी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर केला जात होता; मात्र नव्याने विकसित केलेल्या कपड्यांमध्ये वापरलेल्या टिटॅनियम ऑक्‍साईडमुळे साध्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कातही कपडे स्वच्छ होऊ शकतात.

या तंत्रामध्ये कापसाच्या धाग्यांना टिटॅनियम ऑक्‍साईड आणि नायट्रोजनच्या अतिसूक्ष्म कणांचा (नॅनो पार्टिकल्स) थर दिलेला आहे. या थरावर पाण्यात कपडे भिजले अथवा धुतले तरीही काहीही फरक पडत नाही. या संशोधनासाठी चीनमधील डोंगूहा विद्यापीठ आणि राष्ट्रीय नैसर्गिक विज्ञान फाउंडेशनने अर्थसाह्य केले होते.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate