অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्षिनिरीक्षण एक अनुभव

पक्षिनिरीक्षण एक अनुभव

'दूर जंगलातल्या पक्ष्यांच्या कौतुकाच्या नादात आपल्या आसपासच्या पक्ष्यांना आपण विसरत चाललो आहोत. जग जवळ आलंय, पण हे जवळचे पक्षी मात्र दूर चाललेत... विकासाच्या रेट्यात नामशेष होत चाललेत. असे पुढे न व्हावे यासाठी माझी आणि इथल्या पक्ष्यांची जवळीक प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यापुढे मांडत आहे. अशीच जवळीक इतर सोसायट्यांमध्ये निर्माण झाल्यास या पक्ष्यांचे संवर्धन सहजशक्य होईल'

‘श्री राजयोग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे’ हा पत्ता जितका माझा आहे, तितकाच इथं असणार्‍या पशुपक्ष्यांचासुद्धा आहे. तेही पाळीव नाही, वन्य! आता तुम्ही म्हणाल, वन्यजीव आणि तेही सोसायटीच्या भागात? ते कुठून आले, वगैरे वगैरे. ते थोडं विस्तारानं सांगायच्या आधी एक वास्तव लक्षात घ्या. हे पक्षिप्राणी कुठून आलेले नाहीत. आपणच आलो आहोत त्यांच्या क्षेत्रात! आणि वरती दादागिरीही करतो आपणच.

असो! तर या सोसायटीमध्ये गेली काही वर्षं मी राहतो. माझ्या फ्लॅटसमोर एक मोकळा प्लॉट आहे. फक्त मानवी दृष्टीकोनातून. वास्तविक, तिथली जैविक विविधता पाहिली; तर राहती इमारतसुद्धा मोकळी वाटेल त्याच्या तुलनेत. विविध प्रकारची गवतं, पाचदहा झाडे, मुंगसं, खारी, साप, बेडूक, फूलपाखरे, इतर कीटक आणि रंगीबेरंगी पक्षी असा भला मोठा खजिनाच आहे या मोकळ्या जागेत. माझ्या फ्लॅटची गॅलरी आणि हा मोकळा प्लॉट अगदी आमनेसामने आहेत. पहाट झाली की जाग येते ती इथल्या पाखरांच्या किलबिलाटानं. हे तितकेच वन्य आहेत, जितके एखाद्या घनदाट जंगलातले पक्षी असावेत. मानवी वस्तीशी संलग्न असल्यानं काही सवयींचं अनुकूलन (Behavioural Adaptation) त्यांच्यात नक्कीच झालेले आहे; पण तो बदल इतकाही नाही की, ते जंगलातल्या पक्ष्यांपेक्षा निराळे ठरावेत. दूर जंगलातल्या पक्ष्यांच्या कौतुकाच्या नादात आपल्या आसपासच्या पक्ष्यांना आपण विसरत चाललो आहोत. जग जवळ आले, पण हे जवळचे पक्षी मात्र दूर चाललेत... विकासाच्या रेट्यात नामशेष होत चाललेत.असे पुढे न व्हावे  यासाठी माझी आणि इथल्या पक्ष्यांची जवळीक प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यापुढे मांडत आहे. तशीच जवळीक इतर सोसायट्यांमध्ये निर्माण झाल्यास या पक्ष्यांचे संवर्धन सहज शक्य होईल.

माझ्या गॅलरीतून जे-जे पक्षी दिसतील, त्यांची नोंद एक पक्षिअभ्यासक म्हणून तर मी ठेवतोच; पण अभ्यासापलीकडे जाऊन या पक्ष्यांशी माझे काही ऋणानुबंधही निर्माण झालेले आहेत. अशा ऋणानुबंधांचं असणं हे जीवनाला एक नवा आयाम देणारे आहे, जीवन समृद्ध बनवणारे आहे. इथे साधारण तीसेक प्रकारचे पक्षी दिसतात. त्यामध्ये कोकिळा (Asian Koel), लालबुड्या बुलबुल (Red-vented Bulbul), शिपाई बुलबुल (Red-whiskered Bulbul), नाचण (Fantail), शिंपी पक्षी (Tailor bird), राखी वटवट्या (Ashy Prinia), जांभळा शिंजीर (Purple Sunbird), चाळशा (चष्मेवाला) (Oriental White-eye), दयाळ (Oriental Magpie Robin) हे अगदी सहज आणि रोज दिसणारे. आकाशात घार (Black Kite), बगळे (Egrets), पाणकावळे (छोटा पाणकावळा) (Little Cormorant), खंड्या (पांढर्‍या छातीचा धीवर) (White-throated Kingfisher), वंचक (ढोकरी) (Indian Pond Heron), चित्रबलाक (रंगीत करकोचा) (Painted Stork) अशांचेही दर्शन घडत राहते.

इथे ‘पिंगळा’ या प्रकारच्या घुबडाची एक जोडी (a pair of Spotted Owlet) कडुनिंबाच्या झाडावर राहते.त्यांचा चीत्कार म्हणजे रात्र झाल्याची वर्दीच जणू! माझा दिवस संपतो आणि त्यांचा सुरू होतो असेच काहीसे हे गणित आहे. पुन्हा पहाट झाली की ते जोरजोरात चीत्कार करत आपल्या ढोलीत गायब होतात. कधीकधी वाटतं की, अशी झाडं किती काळ राहतील पुण्यासारख्या शहरात. मग या पिंगळ्याच्या पुढच्या पिढ्यांनी कुठं जायचं? या जागेचा विकास होईल आणि पिंगळ्याचे आयुष्य मात्र भकास. आत्ताही मध्यरात्री हा लेख लिहीत असताना त्यांच्या चीत्काराची गूढ सोबत आहेच. विकास हा शब्द फक्त माणसाच्याच भावी पिढ्यांसाठी का असावा? वन्यजिवांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार यात का होत नाही? हे कोडं मलातरी अजून सुटलेले नाही.

परवाच एका ‘शिंजीर’ (Purple-rumped Sunbird) पक्ष्याने  एक सुंदर घरटे बांधायला घेतले, गॅलरीलगतच्याच बोराच्या झाडावर. सर्वांत नाजूक घरट्यांपैकी एक म्हणजे शिंजिराचं घरटे. अगदी नाजूक अशा फांदीवर असे लोंबकळणारे घरटे (Pendulum nest) ते बांधतात. बोराचीच छोटी पाने, काही काड्या आणि कोळ्याची जाळी असं एकत्र जोडून हे घरटे घडवले जाते. साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीच्या या उभ्या घरट्याला एका बाजूला एक छोटासा दरवाजाही केलेला असतो, ज्यातून फक्त शिंजीरच ये-जा करू शकेल. येणारे पुढचे काही आठवडे त्या घरट्यात लगबग चालू राहील. आपल्या दैनंदिन आयुष्याच्या लगबगीत शिंजिराची लगबग मात्र आपल्या दृष्टीलाही पडत नाही.

खरं तर बहुतांश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम आता संपत आला. त्यांची पिले आता स्वतःच्या पंखांवर उभीही राहिलीत! ह्या शिंजिरानं घरटं बांधायला तसा उशीरच केला म्हणायचा! पण अजूनही पाऊस त्याला साथ देतोय. हिवाळा अजून सुरू व्हायचाय. तरून जाईल कसातरी. एक सर्वसाधारण गैरसमज असा असतो की, पक्षी हे नेहमीच घरट्यात राहतात; जसं की आपण घरात राहतो. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, पक्षी फक्त विणीच्या हंगामापुरतंच घरटं बांधतात. एकदा का अंड्यांतून पिलं बाहेर आली आणि उडण्यास योग्य (उडती?) झाली की ही घरटी सोडली जातात. काही मोजकेच पक्षी जुने घरटे पुढच्या विणीच्या हंगामात वापरतात. अन्यथा, दर हंगामात नवीन घरटे बांधले जाते. जुने घरटे पावसाच्या-वार्‍याच्या तडाख्यात मोडून जाऊन निसर्गात एकरूप होऊन जाते. बाकी या शिंजिराच्या घरट्यातून पिलांची डोकी कधी वर येतील याकडे  दुर्बिणीतून माझे लक्ष असेलच!

एकदा इथल्या गवतात राहणारी एक ‘लावरी’ (Quail) घराच्या खिडकीतून चुकून आत आली. कोंबडीसारखी दिसणारी ही लावरी कॉटच्या खाली धडपडत राहिली. जरा वेळानं तिची धडपड शांत झाल्यावर मी तिला बाहेर काढले. थोडं पाणी पाजले; आणि मग काय, पुढच्याच क्षणाला ती त्याच खिडकीतून भुर्रर्र उडून बाहेर.अशा शेजार्‍यांची गंमत वाटते. थोडा वेळ भेटीला येतात आणि पुन्हा कुठे जातात काही पत्ता लागत नाही.

जसा उन्हाळा सुरू होतो, तसे सोसायटीच्या कुंपणाच्या भिंतीवर/तारांवर बसून नर ‘दयाळ’ पक्ष्याच्या ताना सुरू होतात. हा इतके सुंदर गातो की, त्यानं एकंदर वातावरणच बदलून जाते. ऐन उन्हाळ्यात हे गाणे अगदी पहाटे चार वाजतासुद्धा ऐकायला येतं. प्रेमाराधनेत कोणतीही कसर सोडली जात नाही. जोडीदारीण एकदा का भेटली (खरे तर पटली!) की मग याचाही घरटे, अंडी, पिलं हा प्रपंच सुरू होतो. तिकडे ‘कोकीळ’ पक्ष्याच्याही लांबच लांब ताना चालू असतात. इथल्या दोनचार झाडांवर अगदी दहाअकरा कोकीळ एकमेकांना आव्हान देताना मी याच उन्हाळ्यात पाहिलेले आहेत. गाणारा कोकीळ असतो, कोकिळा नाही! सर्वच प्रकारच्या पक्ष्यांमध्ये गाणारा किंवा रंगीबेरंगी असणारा सामान्यतः नर पक्षीच असतो. कोकिळा मात्र गाण्याची मैफल ऐकत इकडून तिकडे उडत राहते. याच झाडांवर कोकिळाच्या जातीतला ‘पावशा’ (Common Hawk Cuckoo) आणि ‘कारुण्य कोकिळा’ही (Grey-bellied Cuckoo) दिसून येतात. यांच्यामध्ये जोड्या तयार झाल्यावर घरटंबिरटं बांधण्याचा प्रकार नाही. नरमादीच्या समागमानंतर चोरपोलिसाचा जणू एक खेळ सुरू होतो, दुसर्‍या पक्ष्याला फसवून त्याच्या घरट्यात अंडी घालण्यासाठी. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते हे आपण ऐकलेलं आहेच. तसेच इतरही पक्षी आहेत, ज्यांच्या घरट्यात पावशा आणि कारुण्य कोकिळा अंडी घालतात. यात ज्या पक्ष्याचं घरटं आहे, त्याला न कळू देता बेमालूमपणे अंडी घालावी लागतात. पुढे त्या अंड्यांतून बाहेर येणार्‍या पिलांचं संगोपन दत्तक पालकच (Foster Parents) करतात. याच ककू (Cuckoo) गटातील असा एक पक्षी आहे, जो छोट्या आकाराच्या पक्ष्यांचा कर्दनकाळ आहे. ‘कुंभार कावळा’ किंवा ‘भारद्वाज’ (Greater Coucal). हे नाव तर आपल्या परिचयाचं आहेच. हा आकाराने तसा मोठा पक्षी बहुतेक करून जमिनीलगतच दिसून येतो. त्यामागं कारण आहे. बहुतेक छोट्या आकाराच्या पक्ष्यांची घरटी ही जमिनीपासून साधारणपणे मीटरभर उंचीवर असतात. भारद्वाज नेमका याच घरट्यांना लक्ष्य करतो. ती घरटी उद्ध्वस्त करून त्यातली अंडी अथवा पिलं जे काही मिळेल ते तो खाऊन टाकतो. जेव्हा कधी हा भारद्वाज मला इथे दिसतो, तेव्हा मी अशा छोट्या घरट्यांसाठी प्रार्थना करतो. शिकार आणि शिकारी हा निसर्गनियमाचाच एक भाग जरी असला, तरी मानवी मन नाही म्हटलं तरी हळवं होतंच.

याच हंगामात आणखी एक सुंदर पक्षी दिवसभर शीळ घालत राहतो. हा पक्षी दिसायलाही अगदी सुरेख आहे. याचं नाव ‘सुभग’ (Common Iora). या पक्ष्याला नुसतं पाहत बसावं असं वाटतं. तो अनुभव म्हणजे नुसता विरंगुळा नाही. आज शास्त्राच्या आधारे हे सिद्ध झालं आहे की, असं पक्षिनिरीक्षण हा तणाव-निर्मूलन (Stress Buster) करण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे.

इथंच शंकासुराचं (शंखासुराचं) एक झुडूप आहे. त्याची लाललाल मोहक फुलं लगेच लक्ष वेधून घेतात. याच्या हिरव्यागार शेंगा खायला  ‘लालकंठी पोपट’ (Rose-ringed Parakeet) या पक्ष्यांच्या झुंडी त्यावर उतरतात. शेंगा खाण्याच्या नादात ते इतके गुंग असतात की, त्यांचं आसपास ध्यानच राहत नाही. मी आपलं गॅलरीत उभं राहून त्यांचे मनसोक्त फोटो घेत राहतो. खाण्याच्या नादात या पोपटांची फुलांभोवती उलटंसुलटं होत जणू कसरतच चाललेली असते. हे असं मोहक दृश्य पाहण्यासाठी दिलेला वेळ एखाद्या मोबाइल गेमसाठी किंवा टीव्हीसाठी दिलेल्या वेळेपेक्षा नक्कीच सार्थकी लागणारा आहे. लाखो वर्षांत निसर्गात उत्क्रांत झालेल्या अशा मोहक गोष्टी सोडून आज आपली नजर गॅजेट्सवर खिळलेली असणं यासारखं दुर्दैव ते काय!

हळद्या (Indian Golden Oriole), निखार (छोटा गोमेट) (Small Minivet), फुलटोचा (Flowerpecker), सुतारपक्षी (Woodpeckers), वेडा राघू (Green Bee-eater), खाटीक (Long-tailed Shrike) या आणि अशा कितीतरी पक्ष्यांचंही येणंजाणं इथं चालूच असतं.  पहाटेच्या वेळी इथं अगदी रंगीबेरंगी असा रंगमंच उभा राहिलेला असतो. कावळाचिमणीच्या पलीकडेही काही पक्षी आपल्या आसपास आहेत हे आपल्या ध्यानीमनीही नसतं.

चिमणीसारखाच पण जरासा रंगीत असा एक पक्षी आहे, ज्याला म्हणतात ‘मुनिया’ (ठिपकेवाली मनोली) (Scaly-breasted Munia). इथल्या जागेत वाढणार्‍या गवताचं एकएक पातं आपल्या चोचीतून नेऊन हा आपलं घरटं बनवतो. या घडीला हे घरटं बांधणं चालू आहे. त्या एका पात्याचं वजन हे त्या पाखरांच्या एकतृतीयांश तरी भरेल; म्हणजे 60 किलो वजनाच्या माणसानं पळत असताना 20 किलोचं वजन वाहून नेण्यासारखं हे आहे, आणि तेही दर मिनटाला! काय गंमत आहे, ज्या शहरात माणसासाठी गवताचं मूल्य शून्य आहे; त्याच शहरात असे पक्षी आहेत, ज्यांचं संपूर्ण आयुष्य याच गवताच्या काही पात्यांवर बेतलेलं आहे!

गवतच कशाला? इथं असणारी साधी मातीसुद्धा या पक्ष्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. अंघोळ हा आपल्या आयुष्याचा जसा एक सोपस्कार आहे, तसाच पक्ष्याच्याही जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. आता दर वेळी एखादा झरा किंवा एखादं डबकं त्यांना भेटेलच असं नाही, ज्यात ते डुबकी मारू शकतील. आणि शहरात तर अशा जागा मिळणं महाकठीण. अशा वेळी हे पक्षी नुसत्या कोरड्या मातीतही न्हातात. संध्याकाळच्या वेळी जिथे कुठे माती असेल, अशा ठिकाणी हे पक्षी लोळण घेत जणू संध्यास्नानच करत असतात. होतं असं की, मातीत लोळण घेतल्यामुळं त्यांच्या पंखांच्या पिसापिसांत मातीचे कण जाऊन बसतात. पंखांमधल्या या अशा जागा आहेत, जिथे परजीवी किडेही लपलेले असतात. एकदा का पंख झाडले की मातीच्या कणांबरोबर ते किडेही बाहेर निघून येतात. अंघोळ यापेक्षा वेगळी काय असते? पण पक्ष्यांचं हे संध्यास्नान बहुतांश लोकांना माहीतही नसतं. किंबहुना, ते पाहायला वेळच नसतो आपल्याकडे आणि त्यासाठी वेळ काढेपर्यंत आपल्या आयुष्याच्या संध्याच्छाया दाटून आलेल्या असतात. मानवी आयुष्याची ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

इथल्या आणखी एका पक्ष्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. तो पक्षी इथल्या जागेतल्या चिखलाचे गोळे करून त्यात लाळ मिसळून आपले घरटे बांधतो. त्याचं नाव ‘पाकोळी’ (धूसर कडा पंकोळी)(Dusky Crag Martin). संध्याकाळी उंच आकाशात वेगाने उडणार्‍या त्याच ह्या पाकोळ्या. त्यात वेगवेगळ्या जातीही आहेत. होऽ पक्ष्यांतही जाती असतात. फक्त ते त्या मिरवत नाहीत इतकंच! पहिला पाऊस झाला की थोडाफार चिखल सगळीकडे झालेला असतो. नेमका त्याच काळात या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. चिखलाचे गोळे एकमेकाला चिकटवून अर्ध्या वाटीच्या आकारचे ठिसूळ असे घरटे बांधले जाते. त्या घरट्यात पिसांची आणि काड्यांची मिळून मऊशी गादी ते बनवतात आणि त्यावर अंडी घातली जातात. अशी घरटी या सोसायटीच्या भिंतींना चिकटून उंचावर बनवलेली आहेत, जिथे मांजर किंवा इतर शिकारी सहजी पोहोचू शकणार नाही.

कधीकधी एखादा साप आला किंवा मांजर इथं आलं की मग याच पक्षिजगतात हाहाकार माजतो. जोपर्यंत तो शिकारी या भागातून जात नाही, तोपर्यंत पक्ष्यांचा आरडाओरडा चालू राहतो. जे पक्षी इतर वेळेला खाण्यापिण्यासाठी स्पर्धा करतात, तेच अशा वेळी एकजुटीने शत्रूच्या विरुद्ध आवाज उठवतात. पक्ष्यांचाही एक समाज असतो हे तेव्हा कळतं. या समाजाचेही काही नियम असतात आणि त्यांनुसार तो चालतो. दुःख, आनंद, प्रेम, विरह, मिलन, स्पर्धा हे सर्व भाव पक्षिसमाजाचाही भाग आहेत. मानवी समाजात असलेले हाव, तिरस्कार, मत्सर, छल-कपट हे भाव मात्र तिकडे नाहीत. दोन भिन्न जीव, दोन भिन्न समाज; पण किती विरोधी गुण! सहजीवन (Co-existence) म्हणजे काय ते आपल्याला शिकावं लागेल हे नक्की. किंबहुना, फक्त आठवावं लागेल. ते आपल्या संस्कृतीत तर आधीपासूनच होतं.

हे सर्व पक्षी आणि या घटना हे फक्त एका छोट्याशा गॅलरीतून दिसणारं छोटंसं जग मी इथं मांडलंय, तेही संपूर्ण नाही. अजून या वर्षीचे हिवाळी पाहुणेपक्षी अवतरायचे आहेत. ते येतील, तेव्हा आणखीन वेगळाच माहोल असेल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दर वर्षी ते या ठिकाणी येतात. मला भेटायलाच येतात असं मी मानतो. एक नातं आहे कसलंतरी. ही गॅलरी वेगळी नाही, पण दृष्टी वेगळी नक्कीच आहे. खरं तर दृष्टीही तितकी निराळी नाही, तीही प्रत्येकाकडे आहेच; पण ती कुठेतरी आत दबून राहिलेली आहे. तिला वाट मोकळी करून द्यावी लागेल. ती वाहती असू दे... जिवंत असू दे... मग जग बदलायला कितीसा वेळ लागेल...?

( सदर लेख ऋतुमानानुसार आढळणार्‍या पक्ष्यांवर ... या कालावधीत लिहिलेला आहे.)

धर्मराज पाटील, वन्यजीव संशोधक, पुणे, संपर्क: 9881 1863 99

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate