विसर्पण-कलेचा उपयोग हवेतून संथपणे घसरत जाण्याकरिता होतो. यांच्या जमिनीवरील किंवा झाडांवरील हालचाली सामान्य खारीपेक्षा फारशा निराळ्या नसतात. पण एखाद्या दूरच्या फांदीवर किंवा झाडावर जावयाचे असेल तर ही खार झाडाच्या उंच फांदीवर चढते आणि हातपाय ताणून, विसर्पण-कला पसरून सूर मारते व हवेतून घसरत इच्छित स्थळी जाते. कलेचा ताण आणि शेपटीचा ढाळ (उतार) बदलून तिला विसर्पणाच्या दिशेवर ताबा ठेवता येतो. इच्छित जागी उतरण्याच्या थोड्या आधी ती आपली शेपटी वर वळवते; यामुळे गतीला अडथळा होतो व ती योग्य ठिकाणी उतरते. विसर्पण उंच जागेवरून कमी उंचीच्या ठिकाणाकडे होते. पेटॉरिस्टा वंशातील काही जाती अशा रीतीने ४,५०० मी. अंतरापर्यंत जाऊ शकतात.
या खारी दाट अरण्यात राहणाऱ्या आणि वृक्षवासी असल्यामुळे जरूर असली तरच जमिनीवर उतरतात. यांची घरे झाडांच्या ढोलीत किंवा बिळात असतात. या रात्रिंचर आहेत. दिवसा अंगाचे मुटकुळे करून झाडाच्या ढोलीत त्या झोपतात व तिन्हीसांजांच्या सुमारास बाहेर पडतात. या एकेकट्या हिंडतात किंवा यांची जोडपी अथवा कौटुंबिक समूह असतात.
फळे, कठीण कवचाची फळे, कोवळ्या डहाळ्या, कोंब, पाने आणि क्वचित कीटक हे यांचे भक्ष्य होय. यांच्या प्रजोत्पादनाविषयी काही माहिती नाही. मादीला एका वेळी एक किंवा दोन पिल्ले होतात असे म्हणतात.
भारतातील उडणाऱ्या खारींचे आकारमानाप्रमाणे मोठ्या व लहान असे दोन गट पडतात. मोठ्या खारींच्या शरीराची (डोक्यासकट) लांबी ४५ सेंमी. आणि शेपटीची ६० सेंमी. किंवा जास्त असते. लहान खारींची लांबी २५-३० सेंमी. असते. मोठ्या जातींपैकी ‘उडणारी प्रचंड खार’ ही एक आहे. हिचे शास्त्रीय नावपेटॉरिस्टा पेटॉरिस्टा आहे. हिच्या दोन प्रजाती आहेत : एक ‘उडणारी तपकिरी खार’ ही गंगानदीच्या दक्षिणेस सगळ्या मोठ्या अरण्यांत असते. दुसरी ‘उडणारी तांबडी खार’ ही गंगानदीच्या उत्तरेस पश्चिम हिमालयात सापडते. लहान उडणाऱ्या खारी मुख्यतः हिमालय आणि आसामच्या डोगरांच्या रांगांत आढळतात. यांशिवाय, आणखी पाचसहा जातींच्या उडणाऱ्या खारी भारतात आहेत. त्यांपैकी ‘उडणारी त्रावणकोरी खार’ त्रावणकोरमध्ये आणि ‘उडणारी काश्मीरी खार’ काश्मीरमध्ये आढळते.
पहा : खार.
भट, नलिनी
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020