অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कासव

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सरीसृप वर्गाच्या कूर्म गणातील प्राणी. कासवे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. बहुसंख्य कासवे जलचर असून काही भूचरही आहेत. कासवांच्या सु. २२० जाती ज्ञात आहेत. सागरी कासव “टर्टल”, गोड्या पाण्यातील कासव “टेरॅपिन” तर भूचर कासव “टॉरटॉइज” अशा नावांनी इंग्रजी भाषेत ओळखली जातात. कासवांच्या आकारमानात विविधता आढळते. लेदर बॅक टर्टल नावाचे सागरी कासव सु. ३५० किग्रॅ. वजनाचे असते, तर लहान भूचर कासव सु. १०० ग्रॅम वजनाचे असते. भारतात ट्रायोनिक्स प्रजातीतील दोन-तीन जातींची कासवे आढळतात. गोड्या पाण्यातील कासव

कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार भाग पडतात. पाय चार असून ते धडाला जोडलेले असतात. भूचर कासवांची बोटे वेगवेगळी किंवा जुळलेली असतात व त्यावर नख्या असतात. गोड्या पाण्यातील कासवांच्या पायांची बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात. सागरी कासवांच्या पायांचे वल्ह्यासारख्या अवयवात रूपांतर झालेले असते. धड संरक्षक कवचाने झाकलेले असते. कवचाचा पृष्ठभाग सामान्यत: बहिर्गोल असतो, काहींमध्ये तो घुमटासारखा उंच असतो, तर काहींमध्ये तो सपाट असतो. धडाचा खालचा भाग सपाट किंवा अंतर्गोल असतो.

मान सामान्यत: लांब आणि लवचिक असते. बहुतेक कासवांना डोके आणि पाय कवचामध्ये आत ओढून घेता येतात. शरीराच्या उघड्या भागावरील त्वचेवर खवले असतात. कासवाच्या मुखात दात नसतात, पण जबड्यांच्या कडांवर शिंगासारखे धारदार पट्टांचे आवरण असते. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते. डोळ्यांना तिसरी पापणी (निमेषक पटल) असते. शेपटीच्या बुडाच्या खालच्या भागात अवस्कर (आतडे, मूत्रवाहिन्या व प्रजननवाहिन्या ज्यामध्ये उघडतात अशा शरीराच्या मागील टोकाशी असलेल्या समाईक कोष्ठाचे) छिद्र असते. कासवांमध्ये नर मादीपेक्षा लहान असतो.

सागरी कासव

कासवे सर्वभक्षक असतात. सागरी पाण्यातील कासवे पाणवनस्पती, गोगलगायी, शिंपले, झिंगे, खेकडे, जेलीफिश व मासे इत्यादींवर उपजीविका करतात. भूचर कासवे प्रामुख्याने शाकाहार करीत असली, तरी त्यांच्या अन्नात बारीकसारीक प्राणीही असतात. मुखातील धारदार शृंगी पट्टांचा उपयोग अन्नाचे बारीक तुकडे करण्याकरिता होतो.

श्वसन फुफ्फुसे, तोंडाची पोकळी आणि अवस्करात उघडणार्‍या दोन पिशव्यांद्वारे होते. फुफ्फुसे हवेतील ऑक्सिजन तर तोंडाची पोकळी व अवस्कराच्या पिशव्या पाण्यातील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडतात. सागरी कासवे वगळता सर्व इतर कासवे हिवाळ्यात शीतनिष्क्रियतेच्या आणि उन्हाळ्यात ग्रीष्मनिष्क्रियतेच्या अवस्थेचा अवलंब करतात.

कासवांचा प्रजननाचा काळ ठराविक नसतो. अंड्याचे फलन आंतरिक असते. मादी मागील पायांनी जमिनीत किंवा वाळून खोल खळगा खणून त्यात अंडी घालते आणि माती, वाळू किंवा वनस्पतींनी अंडी झाकून टाकते. अंडी वाटोळी असून त्यांचे कॅल्शियमचे कवच टणक असते. सागरी कासवाच्या अंड्यांचे कवच चर्मपत्रासारखे चिवट व लवचिक असते. सागरी कासवाची मादी एका वेळेस सु. ५०० अंडी घालते, तर भूचर कासवाची मादी फक्त ४-५ अंडी घालते. साधारणपणे २-३ महिन्यांत अंड्यांतून पिले बाहेर पडतात. कासवे १०० वर्षांपर्यंत जगतात.

प्राचीन काळापासून माणूस कासवाचे मांस व अंडी खात आलेला आहे. त्यामुळे कासवांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. पूर्वी भारतात कासवाच्या पाठीच्या ढाली तयार करीत असत. ओरिसाच्या पूर्व किनारपट्टीवर आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर अंडी गोळा करून बाजारात विकली जात असत. मात्र आता वन्य जीव संरक्षक कायद्यानुसार कासवे पकडणे, अंडी गोळा करणे, विणीच्या हंगामात किनारपट्टीवर वाळूचा उपसा करणे यांवर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे कासवांचे संरक्षण होते.

 

लेखक - मद्वाण्णा मोहन

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate