खेचर हा एक पाळीव व संकरित प्राणी असून घोडी आणि गाढव (नर) यांच्या संकरातून तो निपजतो. तसेच घोडा आणि गाढवी यांच्या संकरातून निपजणार्या प्राण्याला ‘हिनी’ म्हणतात. खेचरांच्या तुलनेत हिनीची निपज करणे अवघड असते. हिनी खेचरापेक्षा लहान आणि कनिष्ठ प्रतीचा असतो.
खेचरे १.३ मी. ते १.९ मी. उंचीची आणि २७५ ते ७५० किग्रॅ. वजनाची असतात. ती तांबूस वा काळपट तपकिरी रंगाची असतात. त्यांचे ओरडणे काहीसे गाढवांच्या ओरडण्यासारखे असते. ती दीर्घकाळ तहानभूक सहन करू शकतात.
खेचरात घोडी आणि गाढव या दोघांची लक्षणे आढळतात. शरीराच्या ठेवणीत उंची, मानेचा व नितंबांचा (पुठ्ठ्याचा) आकार आणि शरीरावरील केस यांबाबतीत खेचर मातेसारखे (घोडी) असते. आखूड डोके, लांब कान, आखूड आयाळ, बारीक पाय, लहानसर खूर, घोट्याच्या आतील बाजूला शृंगीचा अभाव तसेच शेपटाच्या बुडाजवळ थोडे केस यांबाबतीत ते पित्यासारखे (गाढवासारखे) दिसते. वेग, जोम व शक्ती हे गुण मातेकडून आणि कणखरपणा, सोशिकता, चिकाटी, रुक्षता व दृढपादता हे गुण पित्याकडून (गाढवाकडून) त्याला मिळत असतात.
वेळप्रसंगी खेचरांना निकृष्ट प्रतीचे किंवा अपुरे अन्नही चालते. हवामानातील बदल ती समर्थपणे सहन करतात. विशेषत: अति-उष्ण हवामानाचा त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होत नाही. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ती भारवाहू कामासाठी वापरली जातात. पाचव्या वर्षापासून ती अवघड कामेही करू लागतात.
खेचरे उत्तमपणे पोहू शकतात. त्यामुळे नद्या-नाले ओलांडण्यास आणि डोंगराच्या चढणीवर किंवा अरुंद रस्त्यावरून सामान वाहून नेण्यासाठी त्यांच्यासारखे दुसरे उपयुक्त जनावर नाही. शेतीच्या आणि खाणीवरच्या कामांसाठी खेचरांचा वापर होत असतो. डोंगराळ भागात सैन्यामध्येसुद्धा खेचरे उपयोगी पडतात. भारतीय सैन्यात खेचरांना महत्त्वाचे स्थान आहे. दुर्गम भागात तोफा आणि इतर अवजड सामान वाहून नेण्यासाठी अत्यंत मजबूत खेचरांची गरज असते. हरकामी खेचर सु. ७५ किग्रॅ., तर भारतीय सैन्यातील मजबूत खेचर सु. १५० किग्रॅ. वजन वाहून नेते.
सैन्याला खेचरे पुरविण्यासाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि बाबूगढ येथे लष्करी पैदास केंद्रे कार्यरत होती. १९७० नंतर हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि भारताचा पूर्व भाग या ठिकाणी आणखी पैदास केंद्रे सुरू केल्यामुळे खेचरांची संख्या सातत्याने वाढत आहे.
नर खेचर किंवा नर हिनी प्रजननक्षम असल्याच्या नोंदी नाहीत, परंतु त्यांच्यात सामान्य लैंगिक आकर्षण असू शकते. काही थोडी मादी खेचरे किंवा मादी हिनी माजावर येऊन त्यांना नर गाढव किंवा नर घोड्यांपासून गर्भधारणा होऊन पिल्ले झाल्याचे आढळते.
घोड्यांमध्ये ६४(३२ जोड्या), गाढवांमध्ये ६२(३१ जोड्या) आणि खेचर व हिनीत ६३ गुणसूत्रे असतात. खेचरांमध्ये ६३ गुणसूत्रे असल्यामुळे त्यांचे अर्धसूत्री विभाजन नेहमीप्रमाणे घडून येत नाही. परिणामी गुणसूत्रांचा समान संख्येच्या जोड्या तयार होत नाहीत आणि फलनयोग्य युग्मके होत नाहीत. बहुतांशी खेचरे वांझ असल्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण मानले जाते.
स्त्रोत - कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अश्वपालकांनी केलेल्या विनंत्या मान्य करून घोडेवर्...