অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉलिकिटा

पॉलिकिटा

पॉलिकिटा

पॉलिकिटा (बहुरोमी) हा ⇨अनेलिडा (वलयी) संघातील सर्वांत मोठा वर्ग आहे. काही प्रणिशास्त्रज्ञ पॉलिकिटाला स्वतंत्र वर्गाचे स्थान देत नाहीत. त्यांच्या मताने ⇨कीटोपोडा हा अनेलिडा संघातील वर्ग असून पॉलिकिटा आणि ⇨ऑलिगोकीटा हे त्या वर्गातील गण आहेत. पॉलिकिटा वर्गात ६४ कुले असून त्यांत सु.१,६०० वंश व १०,००० पेक्षा जास्त जाती आहेत त्यांचा सर्व जगभर प्रसार झालेला आहे. पॉलिकिट प्रणि समुद्रात राहणारे आहेत; पण थोडे गोड्या किंवा मचूळ पाण्यात आढळतात. पॉलिकीटाचे एरॅन्शिया (मुक्त संचलन करणारे) आणि सेडेंटेरिया (बिळे अथवा नलिकांत राहणारे) असे दोन गण पाडलेले आहेत.

पॉलिकीटांचे शरिर लांब, दंडगोलाकार आणि पुष्कळ खंड असलेले वा अखूड, आटोपशीर व खंडांची मर्यादित संख्या असलेले असते. खंडांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त ७७६ असते. प्रौढांची लांबी काही थोडे मिमी. ते ९० सेमी. असते. शरिराचे डोके किंवा अभिमुख (तोंडाच्या आधीच्या खंडरहित डोक्याचा भाग) आणि धड असे भाग असतात. धडाचे पुष्कळ खंड असून त्याच्या पुढच्या भागाला वक्ष व मागच्या भागाला उदर म्हणतात. तोंड पुढच्या टोकाला खालच्या बाजूस असते. ते पहिल्या खंडात असून त्या खंडाला परिमुख म्हणतात. गुदद्वार मागच्या टोकाला वरच्या बाजूवर असते. बहुतेक खंडांवर पार्श्वपादांची (बाजूच्या पायांची) एक जोडी असते. प्रत्येक पार्श्वपादावर थोडे किंवा पुष्कळ कायटिनी रोम [कायटिन या कोर्बोहायड्रेटाचे बनलेले राठ केस;⟶कायटिन], आकडे, काटे किंवा शूक असतात. यावरूनच पॉलिकीटा हे नाव पडले आहे. पार्श्वपादांच्या भागांचे अतिशय परिवर्तन होणे शक्य असते.

एरॅन्शियांचे अभिमुख अनाच्छादित असून साधे असते किंवा त्यावर डोळे, शृंगिका (संधेयुक्त स्पर्शेंद्रिये), संस्पर्शक किंवा अन्य संवेदी (संवेदनाशील) इंद्रिये असतात. सेडेंटेरियांचे अभिमुख कहिसे झाकलेले असते किंवा पुढच्या खंडांच्या आत ओढून घेता येते. एरॅन्शियांचे पार्श्वपाद सामान्यात: मोठे व मांसल असून संचलनासाठी (चचलनवलनासाठी) उपयोगी पडतात, तर सेडेंटेरियांचे पार्श्वपाद लहान व अस्पष्ट असून त्यांची कार्ये वेगवेगळी असतात. एरॅन्शिया भक्ष्य मिळविण्याकरिता सारखे भटकत असतात. ते शाकाहारी किंवा सर्वभक्षक असून खादाड असतात. पुष्कळ प्राणि आपली ग्रसनी (घसा) बाहेर काढून तिच्यावरील जंभांनी(जबड्यांनी‍‍‍) भक्ष्य पकडून त्यांचे तुकडे करतात. सेडेंटेरिया संस्पर्शकांनी भक्ष्य पकडतात. ते प्लवकांवर (पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणार्‍या सुक्ष्म वनस्पतींवर वा प्राण्यांवर) किंवा पाण्यातील अन्नकणांवर उदरनिर्वाह करतात.

मेंदू (पृष्ठीय शीर्षस्थ गुच्छिका) अधर अनुदैर्ध्य (उभ्या) तंत्रिका रज्जूला (मज्जारज्जूला) परिग्रसिका संयोजकाने (घशाभोवतालच्या जोडणार्‍या मज्जातंतूच्या गुडग्याने) जोडलेला असतो. प्रत्याक खंडात गुच्छिकांची (ज्यांपासून मज्जातंतू निघतात अशा मज्जापेशींच्या समूहांची) एक जोडी व पार्श्व तंत्रिका (मज्जा असतात. श्वसन क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) द्वेरे होते. क्लोम सामान्यत: पार्श्वपादांच्या वरच्या पृष्ठावर उत्पन्न होतात अथवा नलिकांत रहाणार्‍या पॉलिकीटांत ते कधीकधी शीर्षप्रदेशात उत्पन्न होतात.क्लोम शरीराच्या पृष्ठभागाच्या द्वारे होणार्‍या श्वसनकार्याला मदत करतात. अभिसरण तंत्रात (रक्ताभिसरण संस्थेत) मुख्यत: शरीराच्या वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक मध्य अनुदैर्घ्य वाहिनी असते. या वाहिन्या अग्र आणि पश्च टोकांकडे अखंड असतात. प्रत्येक खंडात अनुप्रस्थ (आडव्या) वाहिन्यांनी त्या जोडलेल्या असतात. पृष्ठीय (वरच्या बाजूच्या) वाहिनीच्या स्पंदनाने तिच्यात रक्त पुढच्या बाजूकडे वाहत जाते आणि अधर वाहिनीत ते पुढून मागच्या बाजूकडे जाते. पृष्ठीय वाहिनीच्या एका भागापासून स्पंदनाला सुरूवात होते. या भागाचे रूपांतर ऋदयात होणे शक्य असते. पुष्कळ सेडेंटेरियांत एक स्नयुयुक्त संरचना-ऋद्-काय-असते. तिच्यामुळे रक्ताच्या वहान्याचा वेग काढतो.पुष्कळ एरॅन्शियांत रक्त वाहिन्यांच्या अपकर्षाने (र्‍हासाने) एक अनावृत (उघडे) अभिसरण तंत्र निर्माण होते व त्यामुळे रक्त आणि देहगुहा-द्रव (वक्ष व उदर यांतील पोकळीतील द्रव) रूधिर गुहिकेत एकत्रित होतात. रक्त रंगहीन, लाल, हिरवे, निळसर किंवा पिवळसर असते.

उत्सर्जन (निरूपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे कार्य) वृक्ककांच्या (नळीसारख्या अवयवांच्या) द्वारे होते. वृक्ककांच्या जोड्या असतात. त्यांच्या योगाने देहगुहा बाहेर उघडते. पुष्कळ एरॅन्शियांमध्ये वृक्ककांची आतली टोके बंद असतात आणि त्या ठिकाणी लहान नाल-कोशिकांचे (शाखित वाढी असलेल्या पोकळ पेशीयुक्त उत्सर्जक अवयवांचे) समूह असतात. बहुतेक सेडेंटेरिया आणि एरॅन्शियांमध्ये वृक्कक विशेष विकास पावलेले असून त्यांच्या आतल्या टोकांवर पक्ष्माभिकायुत (हालचालीस उपयुक्त द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करणार्‍या पेशींपासून निघालेल्या केसांसारख्या वाढींनी युक्त) नसराळी असून नलिका सर्पिल किंवा पिळवटलेल्या असतात. अशा वृक्ककांचा उपयोग जनन ग्रंथींचे उत्पाद बाहेर नेण्याकडे होतो.

जनन तंत्र (प्रजोत्पादन संस्था) साधे किंवा गुंतागुंतीचे असते. साध्या प्रकारात लिंगे भिन्न असतात आणि जननकोशिका देहगुहाभित्तीपासून उत्पन्न होतात. त्या देहगुहेत पडतात आणि तेथे पक्व होतात. या वेळी शरीराच्या आकारात आणि रचनेत बरेच बदल होतात. अंडी आणि शुक्राणू विशिष्ट युग्मकवाहिन्यांतून अथवा परिवर्तित वृक्ककांतून अथवा देहभित्ती फूटून बाहेर पडतात. निषेचन (फलन) समुद्राच्या पाण्यात होते. निषेचित अंड्यापासून एक लहान, वाटोळा,पक्ष्माभियुक्त डिंभ (भ्रुणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यत: क्रियाशिल पूर्व अवस्था) बाहेर पडतो, याला ट्रोकोफोर म्हणतात. तो सामान्यत: समुद्रतील प्लवकांमध्ये राहतो आणि त्याचे आयुष्य काही तास ते काही महिन्यापर्यंत असते. याचे मेटॅट्रॉक डिंभात [⟶डिंभ] रूपांतर होते. याच्या शरीराचे थोडे खंड पडलेले असतात. याच्यापासून सरळ किंवा रूपांतरणाने (डिंभावस्थेपासून प्रौढावस्था तयार होत असताना रूप व संरचना यांत होणार्‍या बदलाने) कृमी उत्पन्न होतो.

प्रजोत्पादन अलिंगी पध्दतीनेही-मुकुलन, अनुप्रस्थ विभाजन अथवा विखंडन–होते. अनिषेकजनन, उभयलिंगता, पूर्वपुंपक्वता यांच्यासारख्या घटना देखील दिसून येतात [⟶ प्रजोत्पादन].

तुटलेल्या भागांच्या जागी नवे भाग, उत्पन्न करण्याची शक्ती पॉलिकीटांच्या अंगी असते. पुष्कळदा इजा झालेले अवयव अथवा भाग तोडून टाकून पॉलिकीट त्यांच्या जागी नवे भाग उत्पन्न करतात. काही सिरॅट्युलिड प्राणी तर एका खंडापासून सबंध कृमी उत्पन्न करू शकतात.

 

पहा : अनेलिडा; ऑलिगोकीटा; कीटोपोडा; नलिकाकृमि; नीरीज.

कर्वे, ज. नी.;

जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate