অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांबर

सांबर

स्तनी वर्गाच्या आर्टिओडॅक्टिला गणाच्या (पायांच्या खुरांची सम संख्या असलेल्या) सर्व्हिडी कुलात याचा समावेश होतो. या कुलातील मृगांच्या सर्व जातींमध्ये सांबर हा सर्वांत मोठा मृग असून त्याची शिंगे डौलदार असतात. सांबराची सर्व्हस युनिकलर ही जाती भारतातील घनदाट जंगलांत, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया व फिलिपीन्स येथे आढळते. स. युनिकलर निगर ही जाती फक्त भारतात आढळते. स. युनिकलर इक्विनस ही जाती आसामपासून पूर्वेकडील काही भागांत आढळते.सांबराची खांद्यापर्यंतची उंची सु. १५० सेंमी. असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन २२५–३२० किग्रॅ. असते. त्याचा रंग काळपट तपकिरी वा राखाडी असतो. त्याची त्वचा खरबरीत असते. अंगावरचे केस लांब व राठ असतात. उन्हाळ्यात बरेच केस गळून जातात. मादीचा रंग नराच्या तुलनेत फिकट असून पोटाकडील बाजूचा रंग पांढरा असतो. वाढत्या वयानुसार त्वचेचा रंग गडद होत जातो व शेवटी जवळजवळ काळा होतो. नराच्या मानेवर व गळ्याखाली आयाळीसारखे लांब केस असतात. फक्त नरालाच शिंगे असतात.

मध्य प्रदेशातील तापी व नर्मदा नद्यांच्या आसपास वास्तव्य करणाऱ्या सांबरांची शिंगे सुंदर असून ११०–१२५ सेंमी. लांब असतात, तर उत्तर व दक्षिण भारतातील सांबरांची शिंगे ८५–९० सेंमी. लांबीची असतात.सांबराची शिंगे हाडांची बनलेली असून भरीव व जाड असतात. पूर्ण वाढ झालेली शिंगे उन्हाळ्याच्या सुरुवातीस गळून पडतात. ती गळून पडावीत यासाठी नर झाडावर शिंगे घासतो. शिंगे गळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने नर जास्त काळ लपून राहतो. उन्हाळ्याच्या अखेरीस (मे महिन्यात) शिंगे पुन्हा फुटू लागतात. शिंगे वाढत असताना बाहेरील बाजूस मखमली आवरण असते.शिंगांची पूर्ण वाढ झाल्यावर मखमली आवरण निघून जाते. शिंगाला अनेक शाखा फुटतात. टोकाला दोन सारख्या लांबीच्या शाखा असतात. चार वर्षांपर्यंत शिंगांना जास्तीत जास्त शाखा फुटतात. त्यानंतर दरवर्षी शिंगे गळून नवीन आलेल्या शिंगांना तेवढ्याच शाखा असतात.सांबर डोंगराळ भागातील दाट झाडीच्या प्रदेशांत व शेतांत आढळतात. त्यांना कडक ऊन सहन होत नसल्याने ते दिवसा दाट झाडी असलेल्या भागांत विश्रांती घेतात. संध्याकाळी ते अन्नासाठी बाहेर पडतात. ते रात्रभर चरत राहतात व पहाट होताच पुन्हा दाट जंगलांत जातात. गवत, झाडपाला व रानटी फळे हे त्यांचे खाद्य आहे. त्यांची घाणेंद्रिये व कान अतिशय तीक्ष्ण असतात.

धोक्याची जाणीव झाल्यावर ते दाट झाडीच्या भागात विलक्षण वेगाने पळ काढतात. वाघ व रानकुत्री हे त्यांचे मुख्य शत्रू आहेत. संकट आल्यावर ते पूखऽऽपूख असा आवाज काढते.सांबर पाण्यात पोहू शकते. पाण्यात असताना त्यांचे सबंध शरीर पाण्याखाली व शिंगे आणि डोके तेवढे पाण्याबाहेर दिसते. आपल्या आवडीच्या व भरपूर अन्न असलेल्या प्रदेशावर हक्क मिळविण्यासाठी नरांमध्ये भांडणे होतात. विजयी नराला त्या प्रदेशातील माद्यांचा ताबा मिळतो.नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नर माजावर येतात. ते मादीशी जोडी जमवितात. मीलन काळापुरते नर कळपात राहतात. माज संपल्यावर नर कळप सोडून दूर जातात व एकांतात जीवन जगतात. मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस मादी एका वेळी एका पिलास जन्म देते. मादी व पिलांचे कळप असतात. कळपाचे नेतृत्व प्रौढ मादीकडे असते. ८–१० मादी सांबरांचा कळप तयार होतो.सांबराचे मांस चोथट असते. सांबराच्या शिंगांचा औषधी वापर व भरपूर मांस यांमुळे त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सांबरांना संरक्षण देण्यासाठी भारतात त्यांच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे.

 

 

संदर्भ : 1. Prater, S. H. The Book of Indian Animals, Bombay, 1988.

२. ग्रब, शैलजा रॉबर्ट, महाराष्ट्रातील वन्यप्राणी, मुंबई, १९७८.

लेखक - चंद्रकांत प. पाटील

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate