(हिं. अपांग, लालजिरी; गु. आघेडी क. उत्तरनिगिड; सं. अपामार्ग; इं. प्रिकली चॅफ् फ्लॉवर; लॅ. अँचिरँथ अॅस्पेरा; कुल– अँमरँटेसी). ही लहान ओषधी मोकळ्या पडीत जागी किंवा कचऱ्याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे सर्वत्र (९३० मी.उंचीपर्यंत) असून आशिया, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका येथील उष्ण भागांत आढळते. पाने थोडी, समोरासमोर, लंबगोल किंवा वर्तुळाकृती असून त्यावर मागे मऊ लव असते. फुले हिरवट पांढरी व अनेक असून फांद्यांच्या टोकास लांब कणिश फुलोऱ्यावर [पुष्पबंध] नोव्हेंबर – जानेवारीत येतात. परिदले ४–५ शुष्क व सतत राहाणारी असून शुष्क छदांनी व छदकांनी वेढलेली असतात; केसरदले पाच व त्यांमध्ये फणीसारखे खवले असतात [फूल] फळे लहान, शुष्क व एक बीजी असून ती परिदले छदे व छदके यांनी वेष्टिलेली असतात. बी एक, लहान व पिंगट असते. सर्वच भाग लालसर असलेला आघाड्याचा एक प्रकार आढळतो [ अँमरँटेसी].
मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा ); पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त; बिया वांतिकारक व जलद्धेषावर (पिसाळ रोगावर) गुणकारी; वनस्पती तिखट, रेचक, मूत्रल (मूत्रवर्धक) असून जलसंचय, मुळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल (पोटातील तीव्र वेदना) इत्यादींवर देतात. वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त; तसेच रंगकामात व कपडे धुण्य़ास ती वापरतात. आघाड्याची राख मिसळलेले तिळाचे तेल (अपामार्ग–तेल) कानदुखीवर फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात. ऋषीपंचमीस हिंदू लोक दंतधावनास काटक्यांचा उपयोग करतात. श्रीगणपतीपूजनास पाने व ‘समिंधां’ करिता वाळलेल्या जाड फांद्या वापरतात.
लेखक : ज. वि. जमदाडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/1/2020
दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात
टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ...
गुंज : वेल भारतात सर्वत्र आढळते.
ज्येष्ठमध : (ज्येष्ठमध, ज्येष्ठीमध; हिं. मुल्हट्टी...