অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑयस्टर

ऑयस्टर

मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या बायव्हाल्व्हिया या वर्गात ऑयस्टरांचा समावेश होतो. हे एका जातीचे कालव आहे. ऑयस्टराचे शरीर मऊ असून कवचाने झाकलेले असते; कवचाची दोन पुटे असून ती बिजागरीने जोडलेली असतात. ऑयस्टर समुद्रात राहणारे असून उष्णकटिबंधांतील सर्व समुद्रांत आढळतात; ते समुद्र किनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या मधील क्षेत्रात आणि खाड्यांच्या उथळ पाण्यात आढळतात. वाढ झालेले ऑयस्टर समुद्रतळावर असतात किंवा त्यांच्या डाव्या पुटांनी (शिंपांनी) खडकांना अथवा पाण्यातील पदार्थांना चिकटलेले असतात. ऑयस्टरांना पाय नसल्यामुळे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत.

ऑयस्टरांचा ऑस्ट्रिइडी कुलात समावेश होतो. सगळे ऑयस्टर ऑस्ट्रिया या एकाच वंशातले आहेत अशी पूर्वी समजूत होती; पण कवचाची रचना, शरीर-रचना, जीवन-प्रणाली इत्यादींच्या अभ्यासाने त्यांचे ऑस्ट्रिया, क्रॅसॉस्ट्रिया आणि पिक्‍नोडोंटा असे तीन वंश असल्याचे दिसून आले आहे.

ऑस्ट्रिया वंशाची ऑस्ट्रिया एड्युलिस ही यूरोपात आढळणारी जाती असून तिचा खाण्याकरिता उपयोग करतात. ही जाती उभयलिंगी (नराची व मादीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारी) असून निषेचित (अंडे व शुक्राणू यांचा संयोग पावलेल्या) अंड्यांचा विकास क्लोमातील (कल्ल्यातील) भ्रूणकोष्ठांमध्ये (अंडी किंवा भ्रूण ठेवण्याच्या कप्प्यांमध्ये) होतो आणि अंड्यांतून डिंभ (अळीसारखी म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्व अवस्था) बाहेर पडतो. अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरऑस्ट्रिया ल्युरिडा ही जाती आढळते. ऑस्ट्रिया वंशाच्या जाती भारतात क्वचितच आढळतात. क्रॅसॉस्ट्रिया या वंशात पुष्कळ जाती आहेत. या जातींच्या कवचाचे डावे पुट खोल असते. लिंगे भिन्न असतात. हे ऑयस्टर अंडज (अंडी घालणारे) आहेत. मादी समुद्रात अंडी घालते आणि तेथेच त्यांचे निषेचन होऊन विकास होतो. या वंशाची व्हर्जिनिका ही जाती उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर, अँग्युलेटा ही यूरोपच्या पश्चिम किनाऱ्यावर, गायगॅस ही जपानमध्ये आणि कमर्शिअ‍ॅलिस ही ऑस्ट्रेलियात आढळते. भारतात क्रॅसॉस्ट्रिया वंशाच्या मद्रासेन्सिस, ग्रिफॉयडीज, क्युक्युलेटा आणि डिस्कॉयडिया या जाती आढळतात. यांशिवाय खाण्यायोग्य ऑयस्टरांच्या आणखीही चारपाच जाती भारतात आढळतात पण त्या महत्त्वाच्या नाहीत. पिक्‍नोडोंटा वंशाच्या जाती ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर आढळतात. यांचे कवच मोठे आणि जड असते. हा वंश भारतात आढळत नाही.

क्रॅसॉस्ट्रिया मद्रासेन्सिस ही जाती सगळ्या पूर्व किनाऱ्यावर आणि पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिण भागात खाड्यांमध्ये आढळते.पाण्याचा कमीअधिक खारेपणा हिला बाधक होत नसल्यामुळे तिचे संवर्धन सहज करता येते. सामान्यतः दोन वर्षांत या जातीचे ऑयस्टर बाजारात विक्रिसाठी पाठविण्याजोगे मोठे होतात. यांची पुटे साधारपणपणे पातळ व पानांसारखी असतात. पुटांची आतली कडा आणि स्‍नायूंचे ठसे जांभळ्या रंगाचे असतात. बिजागरी असलेला भाग अरुंद आणि कधीकधी उंच असतो.

क्रॅसॉस्ट्रिया ग्रिफॉयडीज ही जाती भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कच्छ, द्वारका, पोरबंदर, मुंबई,अलिबाग, रत्‍नागिरी, जैतपूर, मालवण, वेंगुर्ले, कारवार, होनावर या ठिकाणी आणि यांच्या आसपास चिखलट खाड्यांतून आणि उपसागरात आढळते. पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दोआब प्रदेशातही ही आढळते. कवच मोठे, लांब व मजबूत असून पुढे अरुंद व मागे साधारणपणे रुंद असते. या ऑयस्टराची तीनचार वर्षांत पूर्ण वाढ होते.

क्रॅसॉस्ट्रिया क्युक्युलेटा ही जाती भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर अंतरावेलीय (भरती आणि आहोटी यांच्या खुणांच्या मधल्या जागेतील)खडकाळ भागात आढळणारी सामान्य जाती होय. ही अंडाकार अथवा त्रिकोणी असते. पुटे जाड आणि काठाशी किंचित सूक्ष्मदंती अथवा चुणीदार असतात. त्यांच्या आतल्या कडा दंतुरित असून बिजागरी साधारण लांब असते.

क्रॅसॉस्ट्रिया डिस्कॉयडिया ही जाती पश्चिम किनाऱ्यावरील द्वारका, मुंबई आणि जैतपूर येथील समुद्रतटीय (समुद्रकिनाऱ्याजवळच्या) खोल पाण्यात मुबलक आढळते. ही चपटी असून आकार वाटोळा असतो. क्रॅसॉस्ट्रियाच्या या चारही जातींचा खाण्याकरिता उपयोग करतात.

ऑयस्टरांची संरचना

शरीर मऊ असून कवचाने पूर्णपणे झाकलेले असते. पुटे जोडणारी बिजागरी अरुंद भागात असते; हे पृष्ठीय टोक होय. अधर बाजूकडे पुटे रुंद आणि गोलसर असून जोडलेली नसतात. पुटांच्या आत असणाऱ्या पातळ प्रावारांच्या (त्वचेच्या बाहेरच्या मऊ घड्यांच्या) स्रावापासून कवच तयार होते. काँकिओलिनाच्या (शंखद्रव्याच्या) अतिशय पातळ स्तरांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटाचे थर बसून ते तयार होते.

प्रावाराचे एकमेकांना जोडलेले दोन झोल असून त्यांनी शरीराचा अग्र आणि पृष्ठीय भाग झाकलेला असतो पण खालची बाजू मोकळी असते. प्रावाराच्या मोकळ्या काठांवर संवेदी संस्पर्शक (स्पर्शेंद्रिये) असतात. परिस्थितीत थोडासा जरी बदल झाला, तरी त्यांच्याद्वारे प्राण्याला तो कळतो आणि कवचाची पुटे मिटतात. शरीराच्या साधारण मध्यभागी एक मोठा अभिवर्तनी (एक भाग दुसऱ्या भागाजवळ आणणारा) स्‍नायू असतो. त्याच्यामुळे पुटांची उघडमीट होते. प्रावाराच्या खाली अधर बाजूकडे क्लोमांची एक जोडी असते. पाणी आत घेऊन अन्नाचा आणि ऑक्सिजनाचा शरीराला पुरवठा करणे हे क्लोमांचे कार्य होय. पाण्यातील सूक्ष्मजीव आणि शैवले हे ऑयस्टरांचे भक्ष्य होय.

आहारनाल (अन्नमार्ग), मुख, ग्रसिका (ग्रसनीपासून म्हणजे घशापासून जठरात उघडणारा आहारनालाचा नळीसारखा भाग), जठर व त्यापासून निघणारे अंधनाल (बाहेरच्या टोकाशी बंद असलेल्या नळ्या), मध्यांत्र (अंत:स्तराचे अस्तर असलेला आहारनालाचा भाग), आंत्र (आतडे) आणि मलाशय यांचा बनलेला असतो. मुख शरीराच्या अग्रपृष्ठीय (पुढच्या टोकाकडे वरच्या बाजूला) भागात असून ते तिकोनी स्पर्शकांच्या दोन जोड्यांनी वेढलेले असते. अन्नाची छाननी करून योग्य ते अन्न मुखात घालण्याचे काम स्पर्शक करतात. मलाशय गुदद्वाराने अवस्करात (ज्यात आंत्र, अंडे किंवा शुक्राणू वाहून नेणाऱ्या युग्मक-वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात असा समाईक कोष्ठ) उघडतो व अवस्करातून बाहेर पडणाऱ्या पाण्याबरोबर विष्ठा बाहेर जाते.

परिवहन तंत्रात (रुधिराभिसरण व्युहात) हृदय, रोहिण्या, कोटरे (खळगे अथवा पोकळ्या) आणि शिरा यांचा समावेश होतो. हृदय दोन अलिंद (अशुद्ध रक्ताचे कप्पे) आणि एक निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा) यांचे बनलेले असते. हृदयाच्या स्पंदनाने रक्त रोहिण्यांमधून ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांमध्ये) असलेल्या अनियमित कोटरांत जाते; नंतर तेथून ते शिरांत जाते आणि त्यांच्या मार्गाने हृदयात परत जाते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate