(साकळवेल, करकंडीचा वेल; हिं. रायधानी; क.कुरियड्डी; लॅ. व्हेंटिलॅगो कॅलिक्युलेटा; कुल - ऱ्हॅम्नेसी). ही वेल [→ महालता] भारताच्या उष्ण भागातील पानझडी जंगलात सापडते. शिवाय कुमाऊँ, नेपाळ ते भुतान, सिल्हेट, जावा इ. ठिकाणीही तिचा प्रसार आहे.
पाने मध्यम आकाराची (५ - १३ x २.५ - ७ सेमी.), दंतुर; कोवळी पाने विशेषत: खालून लवदार; फुलोरा परिमंजरीय वल्लरी [→ पुष्पबंध] व त्यावर दुर्गंधी, हिरवट, लहान व असंख्य फुले; किंजपुट लोमश [→फूल]; फळ एकबीजी, सपक्ष, तळाशी संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरच्या मंडलाने) अर्धे वेढलेले, कपाली (शुष्क, कठीण व आपोआप न फुटणारे फळ) व त्यात एक कप्पा.
इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ऱ्हॅम्नेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; साल व कोवळ्या प्ररोहांचा (कोंबांचा) रस हिवतापात होणाऱ्या अंगदुखीवर लावतात.
लेखक: रा ना जोशी
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/27/2019