অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गजगा

गजगा

आ. १. गजगा : (१)फुलोऱ्यासह फांदी, (२) फुलोरा, (३) तडकलेली शिंबा, (४) बी.

गजगा: (सागरगोटा; हिं. कातकरंज, कातकलेजा; गु. काचका क. गज्जिगे सं. कुबेराक्षी, पूतिकरंज, काकचिक्का इं. फीव्हर नट, फिझिक नट, निकर ट्री, बोंड्यूस नट, मोल्यूका बीन लॅ. सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला कुल-लेग्युमिनोजी). ⇨अशोक, आपटा, बाहवा इत्यादींचा समावेश असलेल्या फुलझाडांच्या उपकुलांतील [सीसॅल्पिनिऑइडी→ लेग्युमिनोजी] ही मोठी आणि काटेरी शिंबावंत (शेंगा येणारी) वेल [→ महालता] कुंपणावर किंवा क्वचित दुसऱ्या मोठ्या झाडावर चढलेली आढळते.

हिचा प्रसार पाकिस्तान, भारत आणि उष्ण कटिबंधातील इतर प्रदेश इत्यादींत आहे. हिच्या बहुतेक सर्व भागांवर कठीण, सरळ किंवा वक्र व पिवळसर काटे असतात पाने संयुक्त, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), पिसासारखी, दोनदा विभागलेली (३०–६० सेंमी.) दले ६–८ जोड्या व दलके ६–९ जोड्या असतात. फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, जुलै–सप्टेंबरात मध्यम आकाराच्या पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या येतात.

संवर्त (पुष्पकोश) पिंगट; पाकळ्या पिवळ्या, पाच व सुट्या; केसरदले दहा व सुटी [→ फूल]. शिंबा लंबगोल (५–७·५ × ४·५ सेंमी.) फुगीर व काटेरी; बिया १-२, टणक, गुळगुळीत. गोलसर (सु. १·५ सेंमी. व्यासाच्या) व करड्या असतात. मुळाची साल, पाने, फुले आणि बिया औषधी आहेत. या झाडात बोंड्यूसीन नावाचे कटुद्रव्य असते.

आ. २. गजगा : शिंबा, एक तडकलेली शिंवा व बिया

मुळाची साल दमा, पाळीचा ताप व मोठ्या आतड्याचे विकार यांवर उपयुक्त असून ती स्तंभक (आकुंचन करणारी), कृमिनाशक व ज्वरनाशक असते. कोवळी पाने यकृताच्या विकारावर आणि तेल आचके व अर्धांगवायूवर गुणकारी कोवळी पाने एरंडेलात तळून सुजलेल्या व दुखणाऱ्या वृषणावर (पुं-जनन ग्रंथीवर) व मूळव्याधीवर लावल्यास वेदना कमी होतात. पाल्याच्या रसात आंबेहळद उगाळून व थोडी साखर घालून दिल्यास जंतविकार नाहीसा होतो.

फक्त पानांचा रस दातदुखीवर हिरडीस लावतात. बिया भाजून आणि कुटून पूड अंतर्गळावर पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त. तसेच कुष्ठरोग, दमा, क्षय इत्यादींवर गुणकारी; अग्निमांद्यावर पूड गरम ताकातून थोडा हिंग घालून देतात. तान्ह्या मुलास गजगा गुटीत उगाळून देतात.

चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यास बियांतील तेल लावतात, तेच तेल संधिवातावरही लावतात व कानातून पू वगैरे जात असल्यास त्याचे एकदोन थेंब टाकतात. पोटदुखीवर सुंठ, सैंधव, पादेलोण. भाजलेला हिंग व भाजलेल्या गजग्याची पूड गरम पाण्याबरोबर पिण्यास देतात.

 

लेखक - शं. आ.परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate