অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिंच

चिंच

चिंच

(हिं. अमली, इमली; गु. आमली; क. अमला अमलिके, हुणिसे; सं. तिंतिण, अम्लिका, तिंतिडिका; इं. टॅमॅरिंड; लॅ. टॅमॅरिंडस इंडिका ; कुल-लेग्युमिनोजी). हा प्रसिद्ध शिंबावंत (शेंगा येणारा) व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारा) वृक्ष मूळचा ॲबिसिनियातील आणि मध्ये आफ्रिकेतील असून उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो. भारतात विशेषेकरून कोकण व उ. कारवार येथील जंगलात दिसतो. पंजाब व उत्तरेकडील भागात त्याला फुले व फळे येत नाहीत. याची लागवड इतरत्र शेतांच्या कडेने व रस्त्याच्या दुतर्फा बरीच केली जाते. ⇨अशोक आणि ⇨वाकेरीप्रमाणे टॅमॅरिंडस वंशातील ही एकच जाती आहे. ⇨अंजन, अशोक, ⇨वाहवा यांच्या कुलातील आणि उपकुलातील [→ लेग्युमिनोजी; सीसॅल्पिनिऑइडी] हा वृक्ष असल्याने याची काही शारीरिक लक्षणे त्यांच्यासारखीच आहेत.

उंची १२ ते १८मी. असून साल जाड, खरबरीत आणि आडव्या उभ्या रेषांनी भेगाळलेली दिसते. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी; दले १०–२० जोड्या, गर्द हिरवी पण कोवळेपणी प्रथम लालसर, नंतर पिवळट; विरळ मंजिऱ्यांवर पिवळी लहान फुले मे-जूनमध्ये येतात;  संदले ४, संवर्तनलिका भोवऱ्यासारखी; पाकळ्या तीन, पिवळ्या व त्यांवर तांबूस शिरा असतात; केसरदले ३, कार्यक्षम व जुळलेली; यांशिवाय २ पाकळ्या व ७ वंध्य केसरदले ऱ्हसित (ऱ्हास पावलेली) व फारच लहान [→ फूल], शिंबा (शेंग) चिंच याच नावाने ओळखण्यात येत असून ती जाड, किंचित वाकडी, मांसल, न तडकणारी, साधारण चपटी व पिंगट असते; बिया (चिंचोके) ३–१२, साधारण चापट, टणक, लालसर, चकचकीत असतात. पिंगट व लाल रंगी चिंचा येणारे असे दोन प्रकार ओळखतात. लाल चिंच अधिक चांगली व खाद्य समजतात.

हे झाड फार उपयुक्त समजले जाते. लाकूड जड, जांभळट, पिंगट टिकाऊ व टणक असल्याने इमारतीस आणि अनेक किरकोळ वस्तूंकरिता (गाड्यांची चाके, कणे, आरे, नांगर, मुसळे, हत्यारांचे दांडे इत्यादींकरिता) वापरात आहे. बियांची खळ चिकटविण्यास, गिरणीत कापडास लावण्यास व सणगर लोक घोंगड्यांस ताठपणा आणण्याकरिता वापरतात. टॅनिनामुळे साल कातडी कमाविण्यास उपयुक्त असते. साल, पाने, फुले व बिया औषधी आहेत. शिजविलेल्या बियांचे व पानांचे पोटीस सूज आल्यास लावतात. फळातील मगज (गर) स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारा), सारक, वायुनाशी व पित्तापासून होणाऱ्या तक्रारीवर उपयुक्त असतो. खोडाची साल स्तंभक व पौष्टिक असते. पाने पाण्यात कुसकरून ते पाणी पित्तज्वर व जळजळणाऱ्या लघवीच्या तक्रारीवर पोटात घेतात. खवखवणाऱ्या घशावर चिंचेचे (मगजाचे) पाणी गुळण्यांकरिता वापरतात.

चिंचेच्या मगजाचा त्याच्यामधील आंबटपणामुळे भारतीय स्वयंपाकात-विशेषतः चटणीत व आमटीत – बराच वापर केला जातो. त्यामध्ये टार्टारिक अम्ल (१२·५–१५ टक्के) तसेच अ, ब, क ही जीवनसत्त्वे असतात. चिंचेचा वापर विशेषतः आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ इ. दक्षिण भारतातील प्रदेशांत जास्त केला जातो. दक्षिण भारतातील लोकांच्या जेवणात चिंचेचे सार (रसम्) बहुतेक नेहमी असते. दारू, भांग इ. मादक पदार्थांमुळे चढलेला कैफ उतरविण्याकरिता चिंचेचे सरबत पाजतात. या झाडाची अंतर्साल जाळून केलेली राख ओकारी आणि पोटशूळ शमविते. फुलांचा गुलकंद पित्तशामक असतो. तांब्यापितळेची भांडी चिंचेने घासल्यास त्यांना चकाकी येते.

चिंचेच्या झाडाला सर्व प्रकारचे हवामान चालते. पण त्यातल्या त्यात काहीसे उष्ण हवामान जास्त मानवते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे झाड वाढू शकते. त्याच्या जोपासनेसाठी विशेष खटपट करावी लागत नाही. ही झाडे पक्ष्यांनी टाकलेल्या बियांपासून अनेक ठिकाणी आपोआप उगवलेली आढळतात.

मे-जून महिन्यांत फुलांमधून आलेल्या चिंचा वाढत जाऊन पुढील वर्षांच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये पक्व होतात. चिंचा कोवळ्या असताना चवीला तुरट असतात. पुढे तुरटपणा जाऊन त्यांच्यामध्ये आंबटपणा येतो. पक्व झालेल्या चिंचा काठीने झोडपून झाडावरून पाडतात. नंतर गोळा करून त्यांच्यावरील टरफले आणि मगजातील बिया काढून मगज विकतात. काही ठिकाणी मगजाचे गोळे करून विकतात. चांगल्या वाढलेल्या एका मोठ्या झाडापासून अंदाजे १४० ते १८५ किग्रॅ. पर्यंत चिंचेचे उत्पन्न मिळते.

 

संदर्भ : McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.

लेखक: परांडेकर, शं. आ./सहस्रबुद्धे, कृ. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate