অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलपिंपळी

जलपिंपळी

(रातोलिया; गु. रातवेलिये; क. नीर-हिप्पली; सं. जल पिप्पली; लॅ. फायला(लिपिया)नोडिफ्लोरा; कुल-व्हर्बिनेसी). ही जमिनीवर पसरत वाढणारी ओषधी कालवे, पाण्याचे पाट व नद्यांच्या किनाऱ्यांवर, वालुकामय व गवताळ पण ओल्या जागी आढळते. तिचा प्रसार ९०० मी. उंचीपर्यंत भारतात सर्वत्र, शिवाय श्रीलंका, बलुचिस्तान, आफ्रिका इ. उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आहे. खोडावरील पेऱ्यांपासून मुळे फुटतात. पाने समोरासमोर, फार लहान देठाची, त्रिकोणी, चमच्यासारखी व टोकास दातेरी असतात.

फुले बिनदेठाची, लहान, पांढरी किंवा फिकट गुलाबी असून पानांच्या बगलेतल्या स्तबकासारख्या फुलोऱ्यात बहुतेक वर्षभर येतात [→ फूल]; फळ गोलसर, लांबट, लहान व शुष्क असते. इतर सामान्य लक्षणे साग कुलात [→ व्हर्बिनेसी] वर्णिल्याप्रमाणे. ही ओषधी शीतकर (थंडावा देणारी), ज्वरनाशी, मूत्रल (लघवी साफ करणारी) असून तिचे पोटिस गळवे पुवाळण्यास बांधतात. पानांचे आणि कोवळ्या देठांचे फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मुलांना अजीर्णावर व स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात.

या वनस्पतीपासून नोडिफ्लोरीन ए व बी ही ग्लुकोसायडीक रंगद्रव्ये मिळतात; पोटॅशियम नायट्रेटही त्यात असते. ईजिप्तमध्ये हिरवळीसाठी ही ओषधी लावतात. श्रीलंकेमध्ये हिची पाने खातात व फिलिपीन्समध्ये पाने भिजवून काढलेला रस चहाप्रमाणे पितात. भारतात परम्यावर शामक म्हणून वापरतात. कोकणात पानांची व फळांची चटणी आतील मूळव्याधीच्या वेदना थांबविण्यास वापरतात.

 

लेखक- जमदाडे ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate