(जग्गम; हिं. पनि-आम्ला, तालिसपत्री; क. अब्लू; सं. तालिश; इं. पुनिआला प्लम; लॅ. फ्लॅकोर्टिया कॅटफ्रॅक्टा; कुल-फ्लॅकोर्टिएसी). हा लहान, पानझडी, मध्यम, मध्यम आकाराचा (९–१५ मी. उंच व ०·९-१·५ मी. घेराचा) वृक्ष ब्रह्मदेश, मलाया आणि सिंगापूर येथे आणि भारतात बहुतेक सर्वत्र जंगली अवस्थेत आढळतो.
कोकणात व उ. भारतात त्याची लागवडही करतात. खोडावर मोठे संयुक्त काटे असतात; फांद्या अनेक व कोवळेपणी बिनकाटेरी असून पाने साधी, लहान, अंडाकृती व टोकास निमुळती, दोन्ही बाजूंस चकचकीत असतात; ती उन्हाळ्यात गळतात. बारीक डहाळ्यांवर पाच ते दहा एकलिंगी फुले, विभक्त झाडांवर, जानेवारी- फेब्रुवारीत येतात; त्यांना पाकळ्या नसतात. मृदुफळ लांबट गोलसर, लिंबोणीएवढे, निळसर काळे व आंबट असून बिया दहा ते चौदा व चापट असतात.
पित्ताधिक्य व यकृताच्या विकारावर फळे चांगली; पाने स्वेदकारी (घाम आणणारी) आणि अतिसारावर उपयुक्त. सालीचा काढा पित्तविकारांवर देतात. लाकूड लालसर, कठीण, जड व ठिसूळ असून त्याला चांगली झिलई होते. विशेषेकरून त्यापासून शेतीची अवजारे बनवितात.
लेखक: जमदाडे, ज. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020