অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नावळी

नावळी

नावळी

(नदीशाक; हिं. कल्मिसाग, नाली; गु. नालानी भाजी; सं. कलंबिका; लॅ. आयपोमिया अँक्कॅटिका, आ. रेप्टॅन्स; कुल - कॉन्‌व्हॉलव्ह्युलेसी). ह्या एक वर्ष किंवा दोन वर्षे (क्वचित अनेक वर्षे) जगणाऱ्या ⇨ ओषधीचा प्रसार भारतात सर्वत्र, शिवाय श्रीलंका, उष्ण कटिबंधीय आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे आहे. हिचे लांबच लांब खोड जाड, पोकळ व आडवे, ओलसर जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर पसरत वाढणारे असून त्याच्या पेऱ्यापासून अनेक आगंतुक मुळे फुटतात. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती, लांबट व टोकदार असतात.

फुले सु. २·५ – ५ सेंमी. लांब, फिकट जांभळी व नरसाळ्यासारखी असून १ – ५ च्या झुबक्यांनी नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये येतात. फुलाच्या तळात गर्द जांभळा ठिपका असतो. फळ (बोंड) अंडाकृती, ०·८ सेंमी. लांब गुळगुळीत असून त्यात २ – ४ लवदार बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॉन्‌व्हॉल्‌व्हुलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. दुभती गुरे आणि डुकरे यांना ह्या वनस्पतीचा चारा चांगला मानवतो; ती उत्तम मत्स्यखाद्यही आहे. मुळे गोडसर लागतात त्यामुळे दुष्काळात लोक खातात; कोवळ्या पाल्याची भाजी करतात.

तमिळनाडूत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात भाजीकरिता पिकवितात; लागवडीकरीता छाट कलमे वापरतात; काही आठवड्यांतच भरपूर पीक येते. खोड व पाने थंडावा देणारी असून पानांचा रस वांतिकारक (ओकाऱ्या करणारा) व रेचक असतो; तो अफू व आर्सेनिक यांमुळे झालेल्या विषबाधेवर उतारा म्हणून उपयुक्त आहे. स्त्रियांच्या मानसिक आणि सर्वसाधारण दौर्बल्यावर ही वनस्पती उपयुक्त आहे; आसामात ती मूळव्याधीवर देतात. कंबोडियात ताप चढून उन्माद वायू झाल्यास या वनस्पतीचे पोटीस लावतात; नायट्यावर कळ्यांचा उपयोग करतात. ताज्या पानात जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सर्व वनस्पतीत ०·७६% पेक्टीन असते व सुके द्रव्य ६·९%, प्रथिने १९·६%, मेद ३·४%, कार्बोहायड्रेटे ४१·१%, चोथा २०·४% व राख १५·५% असतात.

 

लेखक- जमदाडे, ज. वि.; परांडेकर, शं. आ

स्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate