অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निवडुंग

निवडुंग

हे नाव अनेक वनस्पतींना ​दिले जाते; त्यांपैकी काही सामान्य जाती पुढे वर्णिल्या आहेत.

वई निवडुंग

(​मिंगुट, ​मिंगत; ​हिं. सेहुंद, थोर; गु. थोर; क. येल्लिकळळी; सं. सीहुंड, स्नुही; लॅ. यूफोर्बिया ने​रिफो​लिया; कुल-यूफो​र्बिएसी). सु. सहा मी. पर्यंत उंच वाढणारा हा गुळगुळीत (पण काटेरी), मांसल, पानझडी, लहान जंगली वृक्ष पेगू, ब्रम्हदेश, पाकिस्तान, भारत इ. प्रदेशांत बहुतेक सर्वत्र पण रूक्ष ‌‌‌​ठिकाणी आढळतो. दख्खनच्या पठारावर खडकाळ जागी व प. ​किनाऱ्यावर हा सामान्य असून कुंपणाकरिता (वईक​रिता) ​विशेषेकरून लावतात.

फांद्या गोलसर ​किंवा काहीशा पंचकोनी, मांसल, संधियुक्त असून त्या मंड​लित ​किंवा ‌‌‌झुबक्यांनी येतात व त्यांवर उपपर्णी जोडकाटे उंचवट्यावर स​र्पिल रीत्या (मळसूत्राप्रमाणे) असतात. पाने साधी, मांसल १५–३० सेंमी. लांब, एकांत​रित (एकाआड एक), व्यस्त अंडाकृती (टोकास गोल व तळास ​निमुळती) असून फांद्यांच्या टोकांस येतात. फुले एक​लिंगी, फार लहान व चषकरूप (पेल्यासारखा) पुष्पबंधात असून ‌‌‌छदमंडल अर्धगोल, ​पिवळट व ​त्रिभागी असते. चषक पर्ण-​किणांवर (पानांच्या वणांवर) एका ​किंवा जोड वल्लरीत येतात [→फूल]. बोंड (फळ) लहान असून बी गुळगुळीत असते [→यूफोब्रिएसी]. ‌‌‌फुले व फळे मार्चमध्ये येतात. पाने ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये गळतात. नवीन पालवी पावसाळ्याच्या सुरूवातीस येते. पांढरा दुधी ⇨चीकजहाल, रेचक, चर्मरक्तकर(कातडी लाल करणारा) व कफोत्सारक (कफ पाडून टाकणारा) असतो. चामखीळ व कातडीवरील फोड नाहीसे करण्यासाठी तो उपयुक्त असतो. ‌‌‌कानदुखीवर तो वापरतात. काजळातून तो नेत्र​विकारात (डोळे आले असता) घालतात. गुजरातमध्ये ताड वृक्षावर ताडीक​रिता केलेल्या चऱ्यांवर लावतात. साखरेचा पाक व चीक यांचे समभाग ​मिश्रण दम्यावर गुणकारी आहे. मूळ जंतुध्न(जंतुनाशक) व मत्स्य​विष आहे. लाकूड सरपणास वापरतात. ‌‌‌झाडातील ​चिकापासून ⇨गटापर्चासारखा पदार्थ ​मिळतो.

त्रिधारी (किंवा चौधारी) निवडुंग

(​हिं. ​तिधारा सेहुंड; गु. ​तिंधारी सेंड; क. चदरकळळी; सं. वज्री, वज्रकंटक; इं. ट्रॅंग्युलर स्पर्ज; लॅ. यूफो​र्बिया अँटिकोरम; कुल-यूफो​र्बिएसी). सुमारे ४–९ मी. पर्यंत उंचीचे हे काटेरी झुडूप अथवा लहान वृक्ष श्रीलंकेत व भारताच्या उष्ण भागात व रूक्ष ​ठिकाणी (६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. खोड व ‌‌‌फांद्या सं​धियुक्त असून पेरी व कांडी स्पष्ट असतात. खोडावर व फांद्यांवर उभ्या खोबणी आ​णि ३–५ उभे, रूंद, दंतुर व जाड पंख असतात. पाने फार लहान, मांसल, अवृंत (​बिनदेठाची) व गलनशील (गळून पडणारी) आ​णि उपपर्णी; जोडकाटे आखूड, तीक्ष्ण, ​द्विखंड व दीर्घस्थायी (दीर्घकाल राहणारे) असतात. पुष्पबंध (फुलोरा) चषक रूप असतो [→यूफो​र्बिएसी; पानचेटी]. पुष्पबंधाक्ष (फुलोऱ्याचा दांडा) एक ​किंवा जोडीने वल्लरीप्रमाणे. फुले पिवळक व जून सप्टेंबरमध्ये येतात. एका चषकात अनेक केसरदले (पुं–पुष्पे) व तीन स्त्री–पुष्पे आढळतात. बोंड ​त्रिखंडी व लहान असते. लाकूड करडे, मऊ व हलके असून खेळणी वगैरे​​किरकोळ वस्तूंसाठी उपयुक्त असते. झाडाचे भाग रेचक, कडू, ​तिखट व पाचक असतात. खोडाचा काढा ​किंवा रस संधिवातावर देतात. चामखीळ व इतर चर्मरोगांवर लावण्यास हा रस लोक​प्रिय उपाय असून जलशोफ (पाणी साचून येणारी सूज) व तं​त्रिका ​विकारांवरही (मज्जातंतूच्या विकारांवरही) वापरतात. जखमेतील ​किडे मारण्यास चीक वापरतात. तो मत्स्य​विष आहे. दातदुखी, ब​हिरेपणा, गलगंड इ. ​विकारांवरही रस गुणकारी असतो. खोडाचा लवयुक्त अर्क प्र​तिजैव (अँ​टिबायॉ​टिक) ​क्रियाशील असल्याचे ​दिसून आले आहे.

फड्या ​निवडुंग

(इं. ​स्लिपर थॉर्न; लॅ. ऑप​न्शिया इलॅ​टियर, ऑ. नाय​ग्रिकॅन्स; कुल-कॅक्टेसी). ⇨ नागफण्याप्रमाणे या अमे​रिकी, काटेरी व प​रिचित क्षुपाचा (झुडपाचा) प्रवेश इ. स. १८०० च्या सुमारास भारतात झाला असून त्याचा विशेष प्रसार ‌‌‌प​श्चिम भारत व थोडाफार प्रसार आग्नेय पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओ​रिसा इ. प्रदेशांत झाला. नागफण्याची व⇨कॅक्टेसी कुलात (अथवा नागफणा कुलात) वर्णिलेली अनेक शारी​रिक लक्षणे ह्या वनस्पतीतही आढळतात. ‌‌‌तथा​पि काही फरक ​निश्चितपणे आढळतात. या मासंल वनस्पतीची पर्णकांडे (पानाचे कार्य करणारी चापड खोडे) सपाट व अंडाकृति-आयात असून त्यांवर २­–५ काट्यांचे पुंजके आढळतात. याला आलेली फुले प्रथम ​पिवळी परंतु नंतर गर्द लाल व पक्व फळे गर्द तांबडी किंवा लालसर जांभळी असतात ‌‌‌याचे बहुतेक उपयोग नागफण्याप्रमाणेच आहेत.⇨को​चिनियल कीटकांनी (डॅक्टिलो​पियस कॉक्टस) या क्षुपाच्या वाढीवर फारच नियंत्रण घातले आहे.

बिनकाट्याचा ​निवडुंग

(इ. स्पाइनलेस कॅक्टस, इं​डियन ​फिग; लॅ. ऑप​न्शिया फायकस-इं​डिका). निवडुंगाची ही जाती ऑप​न्शिया वंशातील फड्या निवडुंग व नागफणा यांसारखीच असून ​तिला नावाप्रमाणे काटे नसतात. ह्या लहान वृक्षाची पर्णकांडे लंबगोल ​किंवा आयत (३०­–५० सेंमी.) ‌‌‌​असून त्यांवर प्रथम ​पिवळी फुले आ​णि नंतर ५–­१० सेंमी. लांब लाल ​किंवा जांभळी फळे येतात. भारतात ​हिचा प्रवेश फार पूर्वी झाला असून ती फक्त लागवडीतच आढळते. मे​क्सिको आ​णि भूमध्य सामु​द्रिक प्रदेशांत ​तिची मोठी लागवड असून तीतून खाद्य व ​बिन​बियांच्या फळांचे उत्पादन होते. या जातीवर कोचिनियल कीटकांचा दुष्प​रिणाम होत नाही. हीची लागवड सोपी व फायद्याची असते. कारण ​हिचा उपयोग दुष्काळाच्या वेळी वैरणीक​रिता चांगला होतो. मात्र मोकाट जनावरे आ​णि ​डिप्लो​डिया व पिथियम या कवकांपासून (ह​रितद्रव्यर​हित बुरशीसारख्या वनस्पतीपासून) संरक्षण करावे लागते. याची रुचकर फळे खाद्य असुन ती खाल्ल्यावर लालसर लघवी होते. फळांपासून ​मिठाई व मद्ये तयार करतात. बिया पौष्टिक असून त्यांचे पीठ जनावरांना खाऊ घालतात. फुलांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) व काड्यांचा रस वेदनाहारक असतो. या वनस्पतीच्या रसावर काही महत्त्वाच्या कवकांचे (पेनिसिलियम, म्यूकर, अस्परजिलस) व सूक्ष्मजंतूंचे (लॅक्टोबॅसिलस) संवर्धन करता येते, असे आढळले आहे [ → नागफणा].

पाचकोनी ​निवडुंग

(क. कळ्ळी; सं. रा​त्रिप्रफुल्ल, महापुष्प; इं. नाइट ब्लू​मिंग कॅक्टस; लॅ. से​रियस ग्रॅं​डिफ्लोरस, सेले​निसे​रियस ग्रॅंडिफ्लोरस; कुल-कॅक्टेसी). हा सु. ३ मी. उंचीचा पेरेदार, मांसल, काटेरी आ​णि शाखायुक्त पण पर्णहीन वृक्ष मूळचा जमेकातील असून शोभेक​रिता व कुंपणासाठी इतर देशांत लावलेला आढळतो. पूर्वी याचा अंतर्भाव से​रिअस या वंशात करीत; पंरतु अ​लिकडे सेले​निसे​रियस या वंशात करतात. याच्याशी साधारण सादृश्य दर्श​विणाऱ्या यूफो​र्बिएसी कुलातील अनेक जाती असून त्यांचाही तसाच उपयोग केला जातो (उदा.,यूफो​र्बिया ​फिं​ब्रिॲटा, यू. ने​रिफो​लिया इ.) ‌‌‌समान परिस्थितीमुळे हे सादृश्य या ​भिन्न कुलांतील जातींत आलेले आढळते. पाचकोनी ​निवडुंग खडकाळ ज​मिनीत उघड्यावर चांगला वाढतो. ​हिरव्या खोडामुळे व त्यावरच्या ४−६ सपाट काटेरी धारांमुळे यातील पानांचा अभाव भरून ​निघतो. ‌‌‌जून झालेल्या खोडाच्या भागांवर वल्कयुक्त [→ वल्क] आच्छादन असते. धारांवर तीक्ष्ण व आखूड काट्यांचे पुंजके असतात. फांद्या लांबवर पण उंच वाढून त्यांची वाकडी कांडी जवळच्या आधारावर टेकतात. पावसाळ्यात सु. १५–­२० सेंमी. लांबीची सुंदर, काहीशी तुतारीसारखी, मोठी व सुगंधी फुले येतात. ती रात्रीच‌‌‌उमलतात आ​णि सूर्योदयापूर्वी ​मिटतात. फुलाची पुष्प-स्थली-न​लिका [→कॅक्टेसी] बाहेरून गर्द ​हिरवी, उदी व आत पिवळट पांढरी असते. संदले लांबट, हिरवी,पांढरट आ​णि पाकळ्या पांढऱ्या व लांबट, बाहेर वळलेली केसरदले अनेक; अध:स्थ ​किंजपुटापासून ​निघालेली ​किंजल व त्यावरचा दहा ​किरणांचा ​पिवळट ​किंजल्क उघड्या फुलात ताऱ्याप्रमाणे मध्यभागी ​दिसतो [→फूल]. फुले, ताजे आ​णि कोवळे दांडे यांपासून ९०% अल्कोहॉलात काढलेला अर्क ‌‌‌​औषधी असतो. त्याची ​क्रिया ​डिजिटॅ​लिसारखी [→ डिजिटॅ​लिस पुर्पुरिया] होते. ‌‌‌तो हृदयबल्य (हृदयास ताकद देणारा) व मूत्रजनक (लघवी सुरू करणारा) असून जलशोफ आ​णि गलगंड यांतही तो देतात.

खोडाचे तुकडे लावून नवीन लागवड करतात.

वेली निवडुंग

‌‌‌वेलीप्रमाणे दुसऱ्याच्या आधाराने वाढणाऱ्या कॅक्टेसी कुलातील बहुसंख्य जातींचा अंतर्भाव ए​पिफायलम (अथवा फायलोकॅक्टस) या वंशात केला जातो. पानासारख्या ​हिरव्या व पसरट खोडावर (पर्णकांडावर) फुले येण्याचे प्रमुख लक्षण यांच्यात आढळते आ​णि त्यावरून वरील लॅ​टिन नाव ​दिले आहे. ‌‌‌या वंशातील ​कित्येक जाती ⇨अ​पिवनस्पतीआहेत. ए​पिफायलममध्ये एकूण सु. २१ जाती असून त्यांपैकी सु. १६ द​क्षिण व मध्य अमे​रिकेत आ​णि काही वेस्ट इं​डिजमध्ये आढळतात. त्यांचे मुख्य खोड दंडाकृती व काष्ठमय असून फांद्या मात्र सपाट, पातळ व पानांसारख्या (क्व​चित ​त्रिपक्षी) व दातेरी असतात. ‌‌‌खरी पाने नसतात; तसेच कॅक्टेसी कुलाचे वै​शिष्ट्य असणारे काटे याला नसतात. कधीकधी कोवळ्या भागांवरच काटे असतात. फांद्यांच्या कडेने असलेल्या खाचांतून मोठी, पांढरी, ​पिवळी, लाल, सच्छद फुले येतात. काही जातींत ती फक्त रात्रीच उमलतात व काहींत ​दिवसा उमलतात; तसेच काहींना वास नसतो, तर काही फारच सुगंधी असतात. ‌‌‌फुलांत अनेक लांब केसरदले असतात. फळे गोलसर ​किंवा लंबगोल; लालसर ​किंवा जांभळट असून ती पक्व झाल्यावर एका बाजूवर तडकतात व त्यांतील ​किर​मिजी ​किंवा पांढऱ्या मगजातील (गरातील) काही बीजे उघडी पडतात. काहींची फळे खाद्य असतात; परंतु लागवडीत काहींना फळे येत नाहीत. ‌‌‌आकर्षक फुलांमुळे या वंशातील जाती बागेत लावण्याक​रिता लोक​प्रिय असून संकराने अनेक नवीन प्रकार व उपजाती उपलब्ध झाल्या आहेत.

एपिफायलम मॅकरोप्टेरमही जाती मूळची ब्राझीलमधील व याच वंशातील सु. ५ मी. उंचीची वेल असून ती भारतात सामान्यपणे बागेत लावलेली आढळते. पूर्ण उमललेले फूल कमळासारखे ​दिसत असल्याने ​हिला ‘चंद्रकमळ, ब्रम्हकमळ, शैवकमळ, पर्णकमळ’ इ. स्था​निक नावे पडली असावीत. पावसाळ्यात ​हिला लांबट (सु. २५ सेंमी.) ‌‌‌पुष्पस्थलीची मोठी, पांढरी, फार सुगंधी फुले फांद्यांच्या कडेने एकेकटी येतात, ती मध्यरात्री उमलतात व सूर्योदयापूर्वी कोमेजतात. फुलांच्या नळीचा व त्यांवरील खवल्यांचा आ​णि काही बाह्यप​रिदलांचा रंग लालसर तप​किरी असतो. आतील नाजूक लांबट पाकळ्या पांढऱ्या आ​णि अनेक असतात. फुलांचा व्यास सु. १५–२० सेंमी. असतो. ‌‌‌केसरदले असंख्य व त्यांचा एक दाट ​पिवळट झुबका काहीसा बाजूस असून फडीसारखा बाहेर आलेला ​दिसतो. ​किंजल्काची ​किरणे अनेक (१६−२०) व ताऱ्याप्रमाणे पसरलेली असतात. फळे सहसा आढळत नाहीत. नवीन लागवड खोडाचे तुकडे लावून करतात. ही वनस्पती अ​पिवनस्पतीप्रमाणेही वाढते.

 

लेखक- जमदाडे, ज. वि.,वर्तक, वा. द.
संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, New York, 1961.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.
3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Part II, Cambridge, 1963.
४. देसाई, वा. ग. औषधीसंग्रह, मुंबई, १९२७.

स्रोत- मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate