(नीरवंज; क. अणवू; लॅ नॉक्लिया मिसिओनिस, सार्कोसिफॅलस मिसिओनिस; कुल- रूबिएसी). हा लहान अथवा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष नद्यांच्या व ओहोळांच्या काठाने कोकण ते त्रावणकोर या पट्ट्यात आढळतो. याची पाने साधी, संमुख (समोरासमोर), मध्यम आकाराची, पातळ, लांबट व भाल्यासारखी, वरून चकचकीत आणि फार लहान देठाची असतात. उपपर्णे अंतरावृंतीय (दोन देठांमध्ये एक याप्रमाणे खोडाच्या दोन बाजूंस) त्रिकोणी व खाली जुळून वाढतात. फांद्यांच्या शेंड्याला किंवा पानांच्या बगलेत,जाड देठावर एप्रिल-मेमध्ये गुच्छासारखा गोलसर फुलोरा येतो. फुले पिवळट पांढरी, सुगंधी व लहान असतात. अनेक लहान फळे जुळून संयुक्त , फळ (फलपुंज) बनते. बी काळसर, अध्यावरणयुक्त, चपटे व कठीण असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे, रूबिएसीमध्ये (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. खोडाची साल संधिवात, बद्धकोष्ठता, चर्मरोग, कुष्ठरोग व व्रण यांवर उपयुक्त असते. लाकूड पिवळट, मध्यम कठीण पण हलके व खरबरीत असते; किरकोळ लाकडी वस्तूंकरिता ते उपयोगात आहे.
(देव फणस, क. अहनान; लॅ. निओनॉक्लिया पुर्पुरिया, नॉ. पुर्पुरिया). हा कदंब कुलातील लहान वृक्ष पूर्वी फुग्याच्या वंशात अंतर्भूत होता; नंतर दुसऱ्या वंशात (निओनॉक्लिया) घातला गेला आहे. तो भारतात द. द्विपकल्प भागात (९०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. याची साल करडी असते व सोलून तिचे खवल्यासारखे तुकडे निघतात. याची काही लक्षणे फुग्याप्रमाणे; फुलोरे मोठे, अग्रस्थ (टोकांवर) गुच्छासारखे व फुले लहान व जांभळी असून फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. फळांचे दोन कुड्यांसारखे भाग असून बीजे असंख्य व सूक्ष्म असतात. लाकूड पिवळट किंवा लालसर, मध्यम प्रतीचे कठीण व जड, तथापि किरकोळ सजावटी सामानास उत्तम असते.
संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.VIII, New Delhi, 1966.
2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.
लेखिका : कमला श्री. हर्डीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/14/2019