অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बांबू

बांबू

(सं. वंश, वेणू, कीचक इ.). गवतांपैकी काही लहान किंवा मोठ्या, वृक्षासारख्या, काष्ठमय, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) झाडांना हे सामान्य इंग्रजी नाव दिले जाते. त्या सर्वांचा समावेश वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने सु. ३३वंश (जे.सी.विलिस यांच्या मते सु. ४५ वंश) व ५॰॰ जातींत केला असून ए.बी. रेंडेल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे ते वंश बांबुसी (बांबुसॉइडी) या उपकुलात (कुल-ग्रॅमिनी व गण-ग्रॅमिनेलीझ) अंतर्भूत आहेत. काहींच्या मते सर्व बांबू फक्त पाच वंश व २८॰ जाती यांत समाविष्ट होतात. साधारणपणे उष्ण, उपोष्ण आणि सौम्य समशीतोष्ण प्रदेशांत समुद्रसपाटीपासून सु. ४,६५॰मी. उंचीपर्यंत त्यांचा प्रसार आहे. आशियातील उष्ण भागांत सर्वांत जास्त जाती, तर आफ्रिकेतील उष्ण भागांत सर्वात कमी जाती आढळतात. आशियातील त्यांच्या प्रसाराची मर्यादा जपानपर्यंत असून हिमालयात त्यांचा प्रसार ३,१॰॰ मी. उंचीपर्यंत आहे. दक्षिण अमेरिकेतील अँडीजमध्ये हिमरेरेषेपर्यंत (हिमाच्छादित प्रदेश निर्देशित करणाऱ्या रेषेपर्यंत) ते गेले आहेत. ऑस्ट्रेलियात फक्त दोन व मॅलॅगॅसीत (मादागास्करमध्ये) कित्येक जाती प्रदेशनिष्ठ (प्रदेशापुरत्या मर्यादित) आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत मूळच्या फक्त दोनच जाती आहेत (ॲरुंडिनॅरिया मॅक्रोस्पर्मा व ॲ. टेक्टा). तथापि फ्लॉरिडा, लुइझिॲना, द. कॅलिफोर्निया इ. प्रदेशांत अनेक विदेश जातींची लागवड यशस्वी रीत्या केलेली आहे.

आकारविज्ञान

बांबूंची वाढ जलद (दर दिवशी सु. ७-८सेंमी. पर्यंत) होते. डेंड्रोकॅलॅमस जायगँटियस या जातीत ती प्रतिदिनी ४॰सेंमी.पर्यंतही असते. अशा जलद गतीने होणारी वाढ सु. एक महिन्यापर्यंतच होत असते. इतर गवतांप्रमाणे बांबूंच्या भूमिस्थित (जमिनीतील) खोडाच्या (मूलक्षोडाच्या) भरपूर वाढीमुळे त्यांची लहानमोठी बेटे बनतात आणि प्रत्येक बेटात सु १॰-१२ वायवी खोडे [⟶ खोड] बनतात. या खोडांवर पडलेल्या वर्तुळाकार कंगोऱ्यांमुळे फांडी व पेरी स्पष्ट [संधिक्षोड;⟶खोड] दिसतात. हे कंगोरे पानांच्या तळास असलेल्या आवरकामुळे (वेढणाऱ्या तळभागामुळे) पडतात. मुख्य खोडाच्या कोवळ्या कांडयाभोवती असलेले आवरक व पाने धारण करणाऱ्या लहान डहाळ्यांवरचे आवरक यांत फरक असतो. वायवी खोडे कधी फार लहान तर कधीकधी ३॰-३५ मी. पर्यंत उंच वाढतात व काहींचा व्यास २॰-३॰ सेंमी. इतका मोठा असतो. कांडी बव्हंशी पोकळ तर काही जातींत भरीव असतात. पेऱ्याच्या भागात जाड पडदा असतो. फांद्या भरपूर असून खोडे काष्ठमय असतात. पाने साधी, लांबट व अरुंद असून बहुधा पानांना बारीक देठ असतात [⟶ कळक]. फुलांचा मोसम जातीवर अवलंबून असतो. काहींत ती एक किंवा अधिक वर्षांनंतर येतात, तर काही जातींत ३॰-६॰वर्षांतून एकदा फुले येतात व फुलल्यानंतर लवकरच वनस्पतींची जीवनयात्रा संपते. फुलांच्या तळाशी तीन खवले व फुलात तीन लहान तुसे (लघुतुष), बहुधा सहा केसरदले, किंजमंडल स्तंभासारखे व त्यावर १,२,३ किंवा क्वचित अधिक किंजल्क असतात [⟶ फूल]. फळ बहुधा शुष्क (कपाली), मेलोकॅना या वंशात मृदुफळ असते. इतर गवतांशी तुलना केल्यास [⟶ ग्रॅमिनेलीझ; ग्रॅमिनी; गवते] बांबूंची काही शारीरिक लक्षणे प्रारंभिक आहेत. काही बांबू काटेरी असतात (उदा. कळक).

लागवड

फळांच्या व बियांच्या दुर्मिळतेमुळे नवीन लागवड शाकीय पद्धतीने [मूलक्षोड, अधश्चर (मुनवे), कलमे इ. लावून] करतात. सकस व दमट जमीन, भरपूर पाणीपुरवठा, वाऱ्यापासून संरक्षण आणि पहिली एकदोन वर्षे बुंध्याजवळच्या जमिनीस आच्छादनाने संरक्षण इत्यादींची आवश्यकता असते. मुळे न दुखविता पुनर्लागण करावी लागते.<

उपयोग

फार प्राचीन काळापासून बांबूंचा उपयोग मनुष्य हरप्रकारे करीत आला आहे, त्या दृष्टीने त्यांची तुलना फक्त नारळाशीच करता येईल. पूर्वेकडील देशांत तर विविध हस्तव्यवसायांत बांबूचा प्रवेश झाला आहे. गरीब व मध्यम थरांतील लोकांची घरबांधणी आजही बांबूशिवाय होत नाही. घरे, बागा, शेते व लहान वस्त्या यांच्याभोवती काटेरी बांबूचे कुंपण करतात. बांबूंच्या प्रशंसनीय गुणांची दखल चित्रकला व काव्य यांतही घेतलेली आढळते. कित्येक शतकांपूर्वीपासून चिनी कारागिरांनी बांबूंची सुयोग्यता कागद व हत्यारे बनविण्यास अनुभवली आहे. कागदाचा शोध लागण्यापूर्वी चीनमध्ये बांबूपासूनच सर्व लेखन-साहित्य बनवीत असत. तिसऱ्या शतकातील काही लेख बांबूच्या पाट्यांवर लिहिलेले आहेत, असे नमूद आहे. अधिक संशोधनाने आज त्यांच्या वैशिष्ट्यांचा भिन्न प्रकारे उपयोग केला जात आहे. यूरोप, आफ्रिका, ब्रिटिश बेटे व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या प्रदेशांत आयात केलेल्या बांबूंच्या जातींचा उपयोग शोभा, मासेमारीच्या काठ्या, बागेतील खुंट, मेखा, कुंपणे, हस्तव्यवसाय, घरे आतून-बाहेरून सुशोभित करणे इत्यादींसाठी केला गेला आहे. बांबूच्या पेऱ्यात आढळणारा सिलिकायुक्त पदार्थ – वंशलोचन (तबशीर)- पूर्वीपासून औषधात वापरला जातो. काही विशिष्ट रासायनिक विक्रियांत उत्प्रेरक (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणारा पदार्थ) म्हणून तो चांगला उपयुक्त आहे. चिनी बांबूच्या कोवळ्या पोळक खोडांच्या बाह्य पृष्ठभागावर मोठया प्रमाणावर तयार होणाऱ्या पांढऱ्या चूर्णापासून अनेक रासायनिक पदार्थ अलग करण्यात आलेले आहेत. बांबूच्या प्ररोहांपासून (कोंबांपासून) न्यूक्लिएज व डी-ॲमिनेज ही एंझाइमे (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणारी प्रथिने) काढली आहेत. तसेच प्ररोहाच्या पाण्यात काढलेल्या अर्काचा उपयोग काही रोगकारक सूक्ष्मजंतूंच्या कृत्रिम संवर्धनाकरिता माध्यम म्हणून केला जात आहे. प्ररोहांच्या रसातून ग्लुकुरॉनिक अम्ल व L-झायलोज ही संयुगे स्फटिकरूपात अलग करण्यात आलेली आहेत. हे कोवळे प्ररोह फार पूर्वीपासून खाण्यात आहेत. उष्ण कटिबंधातील कित्येक बांबूच्या जातींच्या कोवळ्या प्ररोहात मारक इतक्या प्रमाणात खाल्ल्यामुळे काही वेळा गुरे मेल्याचे आढळले आहे. शिजविताना ही बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) संयुगे निघून जात असल्याने शिजविलेले कोंब खाण्यात माणसाला धोका नसतो. बांबूच्या काही जातींच्या बियाही खाद्य आहेत. मत्स्य-तेल गंधहीन करण्यासाठी सुक्या पानांचा उपयोग होतो. बांबूचा पाला गुरांना वैरणीकरिता बरेच वर्षे उपयोगात आहे. जमिनीची धूप थांबविण्यासाठी बांबूची लागवड करतात. बांबूमुळे वनसंपत्ती समृद्ध होते.आरंभी दिलेली संस्कृत नावे ऋग्वेदसंहितेतील वेणूचा व वंशाचा उल्लेख यज्ञीय कर्मासंबधाने आला असून त्यावरून बांबूच्या भारतातील उपयोगाचे प्राचीनत्व स्पष्ट होते. द्राविड वाङ्मयात (इ.स.चौथ्या व पाचव्या शतकांतील) तमिळ भाषेतील ग्रंथात वंशाचे (बांबूचे) आठ प्रकार सांगितले असून त्यांचे अन्न, औषधे, कुंपण इत्यादींकरिता उपयोगही सांगितले आहेत. महाभारत, चरकसंहिता, कौटिलीय अर्थशास्त्र इ. संस्कृत ग्रंथांतही बांबूच्या उपयोगांसंबंधी उल्लेख आलेले आहेत. भारतात फार पूर्वीपासून बांबूच्या अनेक जातींचा उपयोग केला जात आहे; उदा.,⇨कळक,⇨चिवरी,⇨वासा, उधा इत्यादी. औषधे, इमारत बांधणी, सजावटी सामान, फर्निचर, नावेतील डोलकाठ्या, धनुष्यबाण, पूलबांधणी, सभामंडप, बैलगाड्या, बादल्या, स्वयंपाकाची भांडी, कणगी, पाट्या, सुपे, करंडे, टोपल्या, कागदाचा रांधा व लगदा, दोऱ्या, तट्टे, चटया, छप्परे, काठ्या, लाठ्या इ. विविध बाबींसाठी बांबूंचा उपयोग, विशेषत: ग्रामीण भागात, आजही चालू आहे. तसेच द्राक्षवेली, टोमॅटो,, पानवेली, वेलभाज्या इत्यादींना आधार देण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. बारीक पोकळी असलेल्या बाबूंपासून हुक्क्यांच्या नळ्या व लांब कांड्याच्या पण बारीक बाबूंपासून छत्रीचे दांडे, काही वाद्यांस (उदा., बासरी) लागणाऱ्या नळ्या इ. वस्तू बनवितात. लाखचे रोगण चढविलेली ब्रह्मदेशातील भांडी बांबूंपासूनच करतात. पाण्यात दीर्घकाल भिजून वाळलेला बांबू व कोवळ्यापेक्षा जून बांबू अधिक टिकाऊ असतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate