অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सहदेवी

सहदेवी

सहदेवी : म.,गु.,हिं.सदोदी; गु.सेदरडी; क.,सं.सहदेवी; सं. दंडोत्पला, देविका; इं. अ‍ॅश कलर्ड फ्लीबेन, पर्पल फ्लीबेन; लॅ. व्हर्नोनिया सिनेरिया; कुल-कंपॉझिटी (अ‍ॅस्टरेसी)]. फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग काहीशी शाखायुक्त, वर्षायू ( सु.एक वर्षभरजगणारी ) ओषधी ( लहान व नरम वनस्पती ) भारतात सर्वत्र तणाप्रमाणे आढळते. शिवाय ती पाकिस्तानात (सिंध), आफिका, आशियातील उष्णप्रदेश व ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणी आढळते. व्हर्नोनिया ह्या तिच्या प्रजातीत सु. १,००० जाती असून

सहदेवी (व्हर्नोनिया सिनेरिया ) : (१) फांदीचा भाग, (२) फुलोरा ( स्तबक), (३) फूल, (४) फळ ( अर्धे कापलेले ), (५) फळ ( उभा छेद ).भारतात सु. ४५ जाती (काहींच्या मते ५८) आढळतात. व्ह. मोनॉसिस हा एक लहान वृक्ष असून तो फुलांनी बहरला असता फार आकर्षक दिसतो. व्ह.अ‍ॅन्थेल्मिंटिका ही उपयुक्त ओषधी ‘ कडू जिरे ’या परिचीत नावाने ओळखली जाते जिरे. सहदेवीची उंची सु. १५-७५ सेंमी., क्वचित अधिक असून हिमालयात ती स.स.पासून सु. १,८०० मी. उंचीपर्यंत, खासी टेकड्यांत व इतर डोंगराळ भागांतही पसरली आहे. तिची साधी व एकाआड एक पाने २.५- ५ × १.८-३.८ सेंमी. आकाराची, रूंदट दीर्घवृत्ताकृती किंवा भाल्यासारखी, अनियमित व एकंदरीने विविध आकारांची, काहीशी लवदार व कमी-जास्त दातेरी असतात. खोडाच्या किंवा फांदयांच्या टोकांजवळची पाने सर्वांत लहान असतात.

हिला गुलाबी जांभळट व फार लहान, द्विलिंगी व नियमित फुलांचे स्तबक प्रकारचे लहान फुलोरे मोठया गुलुच्छाप्रमाणे पुष्पबंध] वनस्पतीच्या शेंडयांकडे जानेवारी ते फेबुवारीत येतात. स्तबकाच्या तळाशी छदे (उपांगे) व पुष्पासनावर नलिकाकृती अनेक पुष्पके येतात. कृत्स्न फळे (शुष्क, एकबीजी व न तडकणारी फळे) शूलाकृती, सु. १.२५ मिमी. लांब, आयताकार व तळाशी निमुळती असतात; त्यांवर सपाट केसाची बारीक लव असून टोकांस पांढऱ्या   लांबट केसांचा झुबका ( संवर्त ) असतो. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे कंपॉझिटी ( अ‍ॅस्टरेसी ) कुलात ( सूर्यफूल कुलात ) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वनस्पतीत अनेक औषधी गुण आहेत. वनस्पतीचा रस मुलांना असंयमित लघवीकरिता देतात. मूत्राशयाच्या संकोचावर व अश्मरीवर ही वनस्पती गुणकारी आहे; तिच्या अंगरसामुळे लघवीची तिडीक कमी होते; तिचा रस मूळव्याधीवर व मूळ जलोदरावर उपयुक्त असते; ते कडू, कृमिघ्न व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते; वनस्पतीचा काढा तापात घाम येण्यास देतात; हिवतापात ( मलेरियात ) वनस्पतीचा फांट (चहाच्या कृतीप्रमाणे परंतु न उकळता काढलेला अर्क) कोयनेलाबरोबर देतात. हस्तिपाद रोगांवर पानांचा रस तेलात उकळून वापरतात. अमीबाजन्य विकारांवर ताज्या पानांचा रस पोटात घेण्यास देतात. पानांचे पोटीस ओलसर पुरळ, इसब व गजकर्ण यांकरिता आणि नारू (कृमी) बाहेर काढण्यास देतात.

मुळांचा काढा अतिसारावर देतात; तो दीपक (भूक वाढविणारा) असतो. मुळांचा रस खोकला व शूल यांवर उपयुक्त असतो. संधिवात, डोळे येणे आणि ताप यांवर फुलांचा उपयोग करतात. बिया सामान्यपणे कृमिघ्न व विषशामक; जंत व सूत्रकृमी यांवर त्या परिणामकारक असून कफ, उदरवायू, आंत्रशूल, मूत्रकृच्छ, कोड, कंडू व इतर हट्टी त्वचारोग इत्यादींवर वापरतात, त्यांचा लेप (लिंबाच्या रसातून काढलेला) उवांच्या नाशाकरिता डोक्यात लावतात. घोडयांना दिलेल्या मसाल्यात बिया घालतात; त्यात सु. ३८% स्थिर तेल असते. सुश्रूतसंहिते त ह्या वनस्पतीचा उल्लेख वृश्चिक दंशावर उतारा म्हणून आला आहे; परंतु त्याला प्रायोगिक दुजोरा मिळालेला नाही.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

2. Gazetteer of The Bombay State, Vol. General A, Botany, Part 1–Medicinal Plants, Bombay, 1953.

3.  Kirtikar,  K.  R.;  Basu,  B.  D.  Indian  Medicinal Plants, Vol. II, New Delhi, 1975.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate