অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जाविरहित पाण्याचा पंप

प्रस्तावना

पाण्यासाठी वणवण मैलोन् मैल जाणा-या ग्रामीण भागातल्या महिलांना पाहिलं की, पाण्याच्या प्रश्नाचं गांभीर्य जाणवतं. शेतक-यांना व महिलांना भेडसावणा-या याच प्रश्नावर देवरूखच्या मातृमंदिर संस्थेने उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे हायड्रॅम वॉटर पंप. कोणत्याही पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जेशिवाय चालणारा हायड्रॅम वॉटर पंप ग्रामीण भागात विशेषत: जिथे पाणी लांबवरून आणावं लागतं अशा ठिकाणी देवदूत ठरू शकतो.

ग्रामीण भागात राहणा-या लोकांसाठी लांबवरून पाणी शेतजमिनीपर्यंत किंवा घरापर्यंत आणणं हे नेहमीचंच कष्ट. आज सोयीसुविधांचा जमाना आला असला तरी कित्येक गावांमध्ये दूरवर असलेल्या ओढे, विहिरी, नदीमधून पाणी आणलं जातं. शेती कसणा-यांचे तर यात खूपच हाल होतात. कारण शेतापर्यंत पाणी पोहोचवणं हा त्यांच्यापुढचा मोठा प्रश्न असतो. अशा वेळी वॉटर पंप लावून, पाइपलाइन्स टाकून पाणी खेचून आणण्याखेरीज पर्याय नसतो. परंतु हा पर्याय खूप खर्चिक असतो, शिवाय दिवसभर विजेवर चालणा-या पंपासाठी वीजबिलाचा महागडा भारही पडतो. याहूनही वाईट स्थिती खेडयापाडयात दूरवरून चालत जाऊन पाणी आणावं लागणा-या स्त्रियांची असते. गावात पाइपलाइन आलेली नसेल तर नदी-ओढयावरून असेल तिथून पाणी आणणं भाग असतं. तर काही गावांमध्ये पाइपलाइन टाकूनही फायदा नसतो, कारण तिथपर्यंत वीजच पोहोचलेली नसते. आणि वीज असली तरी ग्रामीण भागात लोडशेडिंगची समस्या मोठी आहे. शहरी भागापेक्षा जास्त काळ गावांमध्ये लोकांना भारनियमनाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे वॉटर पंप बंदच राहतात. म्हणजे पाण्याची व्यवस्था असली तरी ते घरापर्यंत वाहून आणण्याचा प्रश्न उरतोच.

गावागावांमधील ही परिस्थिती पाहून देवरूखच्या मातृमंदिर संस्थेने यावर उपाय शोधण्याचं ठरवलं. त्यात त्यांना जर्मनीच्या एडब्लूओ या एनजीओने व बोर्डा या तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करणा-या संस्थेने मदत केली. त्यांच्या साहाय्याने आणि साडवलीच्या इंदिरा म. बेहरे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातर्फे हायड्रॅम वॉटर पंपाची क्रांतिकारी निर्मिती करण्यात आली. क्रांतिकारी अशासाठी की, हा पाण्याचा पंप चालवण्यासाठी वारा, कोळसा, सूर्यप्रकाश अशा कोणत्याही पारंपरिक ऊर्जेची किंवा वीज, इंधन अशा अपारंपरिक ऊर्जा माध्यमांची गरज भासत नाही. कारण हा पंप फक्त हवेच्या दाबावर चालतो. म्हणजे पैशांची बचतच बचत. हायड्रॅमच्या उपयोगितेने प्रभावित झालेले बेहरे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य समीर हेगशेटय़े व इतर मंडळींनी हे तंत्रज्ञान देवरूख व आसपासच्या गावांच्या विकासासाठी वापरता यावं म्हणून प्रचार सुरू केला. बेहरे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या तज्ज्ञांनी जर्मन संस्थेच्या अभियंत्यांकडून या हायड्रॅम पंपाबाबतचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं. दोन वर्षातच त्यांनी जर्मन संस्थांच्या वतीने इतर गावांमध्ये हायड्रॅम बसवले.

हायड्रॅम म्हणजे नेमकं काय?

हायड्रॅम पंप हा पूर्णपणे हवेच्या दाबावर चालतो व त्याद्वारे पाणी वर खेचलं जातं. हवेचा दाब पंपात जेवढा वेळ राहील तेवढा वेळ पाणी पाइपमधून येत राहतं. हवेचा दाब संपला की तो पुन्हा निर्माण करता येतो. अशा प्रकारे पंप कितीही वेळ चालू राहू शकतो. यात कोणत्याही उपलब्ध ऊर्जा किंवा इंधनाशिवाय पाणी खालच्या पातळीवरून वरच्या पातळीपर्यंत पोहोचवलं जातं. यात वाहत्या पाण्यातील गतीज (कायनेटिक) ऊर्जेचा वापर करून पाणी खालून वर खेचण्यात येतं. हा पंप वॉटर हॅमर तत्त्वावर आधारित असून यामध्ये वाहत्या पाण्यातील नैसर्गिक ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.

या प्रयोगाला इतर गावांमधून हळूहळू चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देवरूखच्या मातृमंदिर संस्थेकडे हायड्रॅम बसवण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असून संस्था व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील तज्ज्ञ हायड्रॅमच्या उभारणीकरता आवश्यक तो तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन व्यावसायिक तत्त्वावर देतात. या कामी संस्थेला सिव्हिल इंजिनीयर संदीप मादुस्कर व गजानन गुरव यांची मदत होते. एखाद्या ठिकाणी हायड्रॅम बसवण्याआधी साधारण जानेवारी ते मार्च महिन्यात पाण्याची खालावलेली पातळी व पाण्याची उपलब्धता पाहिली जाते, जेणेकरून पंपाला किती दाबाची गरज लागेल याचा अंदाज येतो. हायड्रॅमसाठी शक्यतो खळाळणा-या व उंचावरून खाली येणा-या पाण्याची गरज असते. मात्र तशी परिस्थिती नसल्यास बंधारा घालूनही हायड्रॅम बसवता येतो. संथ पाण्याच्या ठिकाणी बंधारा उपयोगी पडतो. हा वॉटर पंप २० ते २५ वर्ष टिकू शकतो. आपल्याकडे पाणी मिळवण्यासाठी ज्या काही पद्धती अवलंबल्या जातात त्यापैकी हायड्रॅम हा भूगर्भातील जलस्तराला कोणतीही हानी न पोहोचवणारा सोपा पर्याय आहे. मातृमंदिर संस्थेने रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातलं ऐनघर, सुधागड तालुक्यातील घोटवडे, रत्नगिरी जिल्ह्यातील मोर्डे, साखरपा, आंबवली, परुळे-पाचल, निरूळ इथं हायड्रॅम बसवले आहेत. याखेरीज मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात अजगरछाप्रा या आदिवासी खेडयातही हायड्रॅम बसवलेला आहे. तिथं नर्मदा नदीतून दिवसाला अडीच लाख लिटर पाणी हा पंप उपसतो. आरोग्य व ग्रामीण विकास सेवेत रत्नागिरी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणा-या मातृमंदिर संस्थेनं कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रात कार्य करायला सुरुवात केली तेव्हा लांबवरून पाणी आणावं लागण्याच्या या मूलभूत समस्येकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. त्यांच्या संशोधनातून हायड्रॅमचं उत्तर सापडलं व हायड्रॅमच्या माध्यमातून ग्रामीण जीवन सुखकर व्हावं असा त्यांचा प्रयत्न आहे.

हायड्रॅमचं वैशिष्टय

देखरेखमुक्त (फक्त यातील रबर पॅड म्हणजे डिसचार्जिग व्हॉल्व हा पाण्याच्या सततच्या दाबामुळे झिजत असल्यामुळे काही काळाने बदलावा लागतो.)
इंधनमुक्त म्हणजे पैशांची व ऊर्जेची बचत
हवेचा दाब एकदा भरला की काही तास बघावं लागत नाही. त्यामुळे मनुष्यबळ व वेळ वाचतो.
लांबून पाणी आणण्याचे कष्ट वाचतात.
शेती किंवा घरगुती वापरासाठी १३० मीटर उंचीपर्यंत पाण्याचा उपसा शक्य.
प्रदूषणविरहित वातावरणात पाणी मिळतं.

पंपासाठीचा खर्च व कीट

पंप ३, ४, ६ व ८ इंचात उपलब्ध आहे.
याला बसवण्याचा खर्च साधारण साडेचार ते पाच लाख रुपये आहे.
याचे भाग- फिडिंग पाइप, टाकी, डिलिव्हरी पाइपलाइन (व्हॉल्वसह),
जोराने येणा-या पाण्याच्या प्रवाहापासून संरक्षण व्हावं यासाठी फ्लडकेस

कुठे बसवता येऊ शकतो?

पाण्याचा वाहता प्रवाह असेल तिथं.
पाण्याची गरज असेल तिथं.
उंचावरून पाणी येत असेल त्या ठिकाणी.
पाण्याची गरज असणा-या जागेपासून जास्तीत जास्त ४-५ कि.मी. अंतरावर.
पाण्याची सर्वात जास्त उपलब्धता असेल तिथं

 

लेखक : विशाखा शिर्के

स्त्रोत : प्रहार, २५ फेब्रुवारी २०१४

माहिती संकलक : छाया निक्रड .

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate