অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुनः एकदा बायोगॅस

पुनः एकदा बायोगॅस

परवडण्याजोगे बायोगॅस संयंत्र

विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले चित्तलवाडी खेडे. तिथे आज आपणांस सिंधुताई तायडे त्यांच्याकडील बायोगॅस संयंत्राच्या फीडरमध्ये शेणाची स्लरी ओतताना दिसतील. तर विजय इंगळे बायोगॅस संयंत्राच्या डायजेस्टर टाकीममधली स्लरी ढवळताना आढळतील. चित्तलवाडीतल्या एका डेअरीचे (दुग्धशाळेचे) मालक विजय इंगळे ह्यांनी, गेल्या वर्षी, डेअरीमध्ये बायोगॅस संयंत्र बसवण्याचे ठरवले तेव्हा बहुसंख्य लोकांनी शंका व्यक्त केली. कारण, विदर्भ विभागात बायोगॅस संयंत्र बसवणे आतबट्ट्याचे ठरत होते. खरे तर दुसरे कोणतेही इंधन बायोगॅसइतके स्वच्छ आणि स्वस्त नाही. तरीही, सरकारी अनुदान आणि प्रोत्साहन असूनही, गेली तीस वर्षे परिस्थिती अशी होती. शिवाय बायोगॅस संयंत्र घरापासून इतके लांब म्हणजे 400 मीटर दूर बसवल्याचे कोणी पाहिले नव्हते – साधारणतः हा प्लँट घराच्या मागील अंगणात, स्वयंपाकघराजवळ बसवलेला असतो.
अकोल्याजवळच्या बुलडाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी खेड्यात शिवराम देशमुख हे शेतकरी राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांनाही अशाच तर्‍हेच्या टीकेला आणि शंकांना तोंड द्यावे लागले. देशमुखांच्या एकत्र कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू लागल्यावर, जागेअभावी, त्यांना पूर्वी घरामागे असलेला गोठा दूर म्हणजे अर्धा किलोमीटरवर हलवावा लागला. स्वयंपाकाच्या गॅसवर होणारा खर्च वाचवण्यासाठी देशमुख ह्यांनी नव्या गोठ्यात बायोगॅस संयंत्र बसवण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या ओळखीच्या सर्वांनीच त्यांना हा उद्योग न करण्याचे सुचवले.
परंतु इंगळे आणि देशमुख हे दोन्ही शेतकरी आपल्या निर्णयाला चिकटून राहिले. त्यांनी आपापली बायोगॅस संयंत्रे यशस्वीपणे चालवून दाखवल्यावर त्यांच्या टीकाकारांचा विश्वास बसला. आज चित्तलवाडी खेड्यात आपणांस १५ बायोगॅस संयंत्रे दिसतील तर तांदुळवाडीमध्ये ४. इतरही शेतकर्‍यांनी बायोगॅस संयंत्रे बसवण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार अनुदानासाठी अर्जही केले आहेत. बायोगॅस संयंत्रांसाठी अनुदान देऊनदेखील मुळात ती फायद्यात चालवण्याइतके शेणच विदर्भ भागात मिळत नाही असे संबंधित अधिकार्‍यांचे आत्तापर्यंत म्हणणे होते. परंतु ही संयंत्रे बसवणारे शेतकरी फारशी गाईगुरे बाळगणारे नाहीत, मग संयंत्र फायद्यात कसे पडते? ह्याचे रहस्य त्यांनी वापरलेल्या नवकल्पनांमध्ये दडलेले आहे.
आर्द्रतेची समस्या सोडवण्याची नवकल्पना
वापरलेल्या पाईपची लांबी आणि त्यामध्ये जमणारे पाणी म्हणजेच आर्द्रता ह्यांमुळे बरेचदा बायोगॅस संयंत्रे नीट काम करीत नाहीत. बराच विचार केल्यानंतर देशमुखांना एक कल्पना सुचली. एव्हाना त्यांनी ९००० रुपये खर्च करून २ घनमीटर आकाराची डायजेस्टर टाकी बांधली होतीच. पीव्हीसी पाइप्सऐवजी त्यांनी जलसिंचनासाटी वापरल्या जाणार्‍या रबरी पाइपचा वापर केला. तसेच घरापर्यंत येणारा हा पाइप जमिनीखालून नेण्याऐवजी त्यांनी तो झाडांना बांधून, वरच्यावर, नेला. ह्यासाठी त्यांना १००० रुपये खर्च आला. आता प्रश्न राहिला आर्द्रतेचा. पाइपमधले पाणी पकडण्यासाठी त्यांनी पाइपला फक्त एक वळसा दिला आणि तो त्याच स्थितीत राहील अशी व्यवस्था केली. गॅसपेक्षा पाणी जड असल्याने ते त्या वळशाच्या तळाच्या भागात जमून पुनः डायजेस्टरकडे परतू लागले. “विद्यापीठातील अधिकार्‍यांनी मला आर्द्रतेच्या समस्येबाबत सांगितले होते परंतु गेल्या चार वर्षांत मला एकदाही त्रास झालेला नाही.” देशमुखांनी सांगितले. ह्या बायोगॅस संयंत्रातून मिळणारा गॅस त्याच्या सहा जणांच्या कुटुंबाला स्वयंपाकासाठी वर्षभर पुरतो.

द्विभाजनामुळे यश मिळाले

देशमुखांना आलेली आर्द्रतेची समस्या इंगळे ह्यांच्यापुढेही होतीच. तीवर त्यांनी वेगळाच उपाय केला. इंगळ्यांनीही ठिबक सिंचनासाठीचाच पाइप वापरला. त्यांनी ह्या पाइपच्या सुरूवातीलाच एक टी-जंक्शन बसवून त्याच्या तोंडाचे दोन भाग (द्विभाजन) केले. अशा रीतीने पाइपच्या दोन शाखा झाल्यावर एका शाखेतून त्यांनी बायोगॅस घरापर्यंत नेला तर दुसर्‍या शाखेचे तोंड जमिनीच्या दिशेने वळवून तिला एक तोटी बसवली. ह्या शाखेमध्ये जमलेले पाणी, आठवड्यातून एकदा तोटी उघडून, सरळ बाहेर सोडून देता येते असे त्यांनी सांगितले.
इंगळे ह्यांच्या ह्या बायोगॅस संयंत्रातून निघणारा गॅस स्वयंपाकासाठी तर पुरतोच शिवाय २२ लोकांच्या अंघोळीसाठी गरम पाणीदेखील त्यावर करता येते. ह्या गॅसवर सणासुदीच्या दिवसांत, वर्षातून तीन-चार वेळा, सुमारे १०० लोकांसाठीचे जेवण बनवता येते. ह्याखेरीज दररोज १०० लिटर दुग्धोत्पादने बनवण्यासाटी आणि गोठ्यातील दिवे लावण्यासाठीदेखील त्यांना हा गॅस वापरता येतो. फक्त तीन गाईंच्या शेणापासून मिळणारा बायोगॅस दोन कुटुंबांना पुरून उरतो असे हर्षा इंगळे ह्यांचे म्हणणे आहे. “एवढ्या वापरानंतरही आमच्याकडे गॅस शिल्लक असतो. आता त्याच्यावर एक जनरेटर चालवून घराला वीज पुरवण्याचा आमचा बेत आहे.” असे इंगळे ह्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबाचा स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) होणारा दरवर्षींचा रु. ८०,०००  खर्च बायोगॅसमुळे वाचतो. चित्तलवाडीतल्या १५ शेतकर्‍यांपैकी बहुतेकांनी इंगळे ह्यांनी घालून दिलेला धडा गिरवला असून प्रत्येकाकडे तीन-चार पेक्षा जास्त गाई नाहीत.
चित्तलवाडीतले आणखी एक शेतकरी मिलिंद इंगळे ह्यांना जेव्हा आढळले की त्याचेकडील फक्त तीन गाईंच्या शेणापासून मिळणारा बायोगॅस त्यांच्या तीन व्यक्तींच्या कुटुंबाच्या गरजांना पुरून उरतो आहे तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.”स्वयंपाक आणि अंघोळीसाठी गरम पाणी ह्या मुख्य गरजा भागवल्यानंतर देखील आमच्याकडे गॅस शिल्लक असतो” असे मिलिंदच्या आई हर्षा इंगळे म्हणतात. आता ह्या गॅस संयंत्राची  एक जोडणी शेतावर राहणार्‍या मदतनिसालाही देण्याचा त्यांचा बेत आहे. ह्या नवकल्पनांचा प्रसार आसपासच्या खेड्यांमध्येही झपाट्याने होत असून त्यामुळे लोकांना बायोगॅसच्या उपयुक्ततेचा नव्याने शोध लागतो आहे असेच म्हणता येईल.
परंतु डेअरीपेक्षा बायोगॅस संयंत्रे बसवण्याबाबत आणि त्यासंबंधीच्या नवकल्पनांबाबत अधिक मार्गदर्शनाची गरज आहे असे शेतकर्‍यांना वाटत आहे. दूर अंतरावरूनदेखील गॅसचा पुरवठा व्यवस्थित रीतीने होण्याबाबत सुधारणा करण्यास वाव आहे. कारण सगळ्याच खेड्यांमधील वस्ती वाढत असल्यामुळे गोठे घरांपासून दूर बांधले जात आहेत.
अंतर, भौगोलिक परिस्थिती, पाइपला असलेल्या वळणांची संख्या ह्या बाबींचा परिणाम गॅसच्या पुरवठ्यावर होतो असे इंगळे ह्यांचे म्हणणे आहे. तसेच एकाच्या संयंत्रावर मिळणारे परिणाम दुसरीकडे मिळतीलच असे नाही. गॅसचा दाब एकसमान राखण्यासाठी संयंत्रामध्ये किती वेळा तसेच किती प्रमाणात शेण भरावे लागते हे निश्चित करण्यासाठी इंगळे ह्यांना दोन महिने प्रयत्न करावे लागले. शिवाय पाइपच्या प्रकाराबाबतही मार्गदर्शन मिळत नाही. दातूचे आणि पीव्हीसीचे पाइप महाग असतात आणि ते जमिनीखालून बसवावे लागतात. ठिबक सिंचनासाठीचे पाइप वापरले जातात परंतु तसे करणे धोक्याचे आहे. सरकारने अनुदानाची मर्यादा वाढवावी असेही इंगळे यांना वाटते. सध्या २ घनमीटरच्या संयंत्रासाठी ८००० रुपयांचे अनुदान मिळते परंतु तेवढ्या आकारच्या संयंत्रामधून जेमतेम स्वयंपाकाला पुरेल इतकाच गॅस मिळतो. पाच ते सात सदस्यांच्या कुटुंबाच्या सर्व घरगुती गरजा भागवण्यासाठी ६ घनमीटरची टाकी हवी असे इंगळे म्हणतात.
जळणासाठी लाकडे मिळवणे अवघड होत चालले असताना आणि एलपीजी सिलिंडर्सच्या वाढत्या किंमती पाहता विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने बायोगॅस संयंत्रे बसवण्यास तयार आहेत. इंधनाच्या ह्या स्वस्त आणि चिरंतन स्रोताच्या वापरासाठी त्यांना फक्त हवे आहे योग्य वेळी थोडेसे मार्गदर्शन.
स्रोत : Down to Earth

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate