অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)

सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)

बीडच्या केमिकल इंजिनिअरचे संशोधन

हंगामी भाज्या व फळांचं हेच असतं. त्या त्या हंगामात त्यांचे  उत्पन्न इतकं जास्त येते  की, अत्यंत अल्प दरात शेतकर्‍यांना त्यांचा माल विकावा लागतो. आणि हंगाम सरल्यावर खाणार्‍यांना त्यांची आठवण येऊनही काहीच फायदा नसतो कारण ती उपलब्धच होऊ शकत नाही आणि हंगामाच्या काळात तर बर्‍याचदा यांचे  वाया जाण्याचे  प्रमाण खूपच जास्त असते. हंगाम सरल्यानंतर दुर्मीळ होणार्‍या भाज्या, फळं वाया गेलीच नाही तर..? याच भाज्या व फळे हंगाम सरल्यानंतरही खाता आल्या असत्या तर किती छान झाले असते असे  वाटून मनातल्या मनात सुखावून काय होणार असे  अनेकांना वाटते . शीतगृहासारखे पर्याय यासाठी उपलब्ध आहे; पण हा पर्याय सर्वसामान्यांना परवडणारा नाही आणि घरगुती पातळीवर वापरण्याजोगा तर निश्‍चितच नाही. शेतकर्‍यांनी मेहनतीने  पिकवलेल्या भाज्या आणि फळे टिकवण्याची केवळ व्यवस्था नसल्यामुळे वाया जातात, मातीमोल होतात. यावर काहीतरी चांगला उपाय शोधावा म्हणून वैभव तिडके या हुशार व हरहुन्नरी तरुणाने  ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ची निर्मिती केली. आपल्याकडे सूर्याचे  ऊन मुबलक आहे. त्याचा काहीतरी चांगला उपयोग व्हावा व त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळावा या एकाच उद्देशाने  या तरुणानं प्रयोग करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर शीतल सोमाणी, स्वप्नील कोकाटे, अश्‍विन पावडे व तुषार गवारे या त्याच्या सहकार्‍यांनीही  चंगच बांधला की, सूर्याच्या उष्णतेवर भाज्या वाळवण्याचे उपकरण तयार करायचे. त्यातून आकाराला आला हा 'सोलर कंडक्शन ड्रायर'. यामध्ये एका वेळी १० ते १२ किलो भाज्या वाळवल्या जाऊ शकतात भाज्यांत ७० ते ८० टक्के पाणी असते. पण ड्रायरनं भाजी वाळवून एक वर्षापर्यंत भाजी साठवता येत असल्याचे  वैभव तिडके यांनी सांगितलं आहे.  सोलर कंडक्शन ड्रायरचा आकार ६ बाय ६ फूट आहे.  बांधणी अशी की कोणालाही वापरताना त्रास होणार नाही. यासाठी ४० स्वेअर फूट जागा लागते.

फक्त सूर्य प्रकाश पोचेल, अशा ठिकाणी म्हणजेच छतावर, गच्चीत उपकरण ठेवले की झाले. या ड्रायरमध्ये रोज १२ ते १६ किलो म्हणजेच वर्षाला ३ टन भाजीपाला वाळवता येऊ शकतो. ढगाळ वातावरणातही हा ड्रायर आपलं काम चोख बजावतो असे वैभव तिडके सांगतात.  या सोलर कंडक्शन ड्रायरची किंमत सध्या १४ हजार रुपये आहे. किमान दहा वर्षापर्यंत हे उपकरण व्यवस्थित चालते . विजेशिवाय हे उपकरण वापरता येतं असल्यानं खर्चातही मोठी बचत होते. शिवाय देखभाल खर्चही कमी असल्याचं वैभव तिडके सांगतात. सध्या पैसे देऊनही ताजा, दर्जेदार भाजीपाला मिळत नाही अशी ग्राहकांची तक्रार असते. ही समस्या वैभव तिडकेंच्या ड्रायरमुळे सुटू शकते.या ड्रायरमध्ये वाळवलेला भाजीपाला १ वर्षापर्यंत टिकवता येतो.  वाळवल्यानंतरही भाजीपाल्याची चव, रंग,  गुणधर्म बदलत नाही असं वैभव तिडके सांगतात. या ड्रायरमुळे भाजीपाला वाळवून विक्रीचा चांगला पर्याय शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकरी, ग्राहकांबरोबरच स्वंयरोजगारासाठीही सोलर ड्रायर फायद्याचं आहे.

'डेल सोशल इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे'त या ड्रायरला प्रथक क्रमांक आणि 'पब्लिक चॉइस अवार्ड' मिळाला.  ट्रॉफी आणि ३६ लाख ६० हजार रुपये असे  पुरस्काराचे   स्वरुप होते . ड्रायरचे  सहसंशोधक शितल सोमाणी यांनी अमेरिकेत प्रोजेक्टचे  सादरीकरण केले. या स्पर्धेत ११० देशांतल्या सुमारे २६०० संशोधकांनी आपआपले  प्रोजेक्ट सादर केले होते. गेल्या सात वर्षापासून ही स्पर्धा सुरु आहे. पण पहिल्यांदाच आशिया खंडातील उपकरणाला दोन्ही पारितोषीके  मिळाली आहेत.

सोलर कंडक्शन ड्रायरला राज्यात आणि परदेशातही मागणी वाढतीय. आफ्रिका, केनिया आणि इतर १९ देशांत हा प्रकल्प राबवण्याबाबत चर्चा सुरु आहे. सोलर वॉटर हिटर प्रमाणे  ड्रायरला ३० टक्के अनुदान मिळाले , तर ८ ते १० हजार रुपयांत ड्रायर विकणे शक्य असल्याचं वैभव तिडके यांनी सांगितलं.सोलर कंडक्शन ड्रायरनंतर वैभव तिडके यांचा आत्मविश्वास आणखीच दुणावला आहे. आपलं तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी २००८ मध्ये 'सायन्स फॉर सोसायटी'ची स्थापनाही केली.  पुढील काळात शेतकऱ्यांसाठी धान्य वाळवण्याचे  तंत्रज्ञान विकसीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशात दरवर्षी साधारण २३ कोटी टन फळ आणि भाज्याचं उत्पादन होतं. पण यातील ३० टक्के शेतमालाची नासाडी होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी वैभवच्या या संशोधनाचा फायदा होऊ शकतो.

संबधित व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत :ABP माझा

लोकमत

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate