अभित्याग म्हणजे सोडून देणे. लष्करी अगर आरमारी नोकरीतून परवानगी न घेता पळून जाणे, असा त्या शब्दाचा वापर आहे. अशा व्यक्तीला अभित्याजक म्हणतात व तो शिक्षेस पात्र होतो.विवाहविषयक कायद्यातूनही अभित्याग या शब्दाचा उपयोग केलेला आढळून येतो. पतिपत्नीपैकी कोणी एकाने कायमचे सोडून देण्याच्या भावनेने, कारणाशिवाय व परस्परांच्या संमतीशिवाय, दुसऱ्याचा त्याग करणे अभित्याग. असा अभित्याग तीन वर्षांहून जास्त मुदतीचा असल्यास इंग्लंडमधील १९५० चा मॅट्रिमोनियल कॉझेस अॅक्ट, मुंबई राज्यातील १९३७ चा हिंदू डायव्होर्स अॅक्ट, १९५४ चा स्पेशल मॅरेज अॅक्ट, १९३६ चा पार्सी मॅरेज अँड डायव्होर्स अॅक्ट व १८६९ चा इंडियान डायव्होर्स अॅक्ट या सर्व अधिनियमांन्वये घटस्फोट मिळण्याची तरतूद आहे. इंडियन डायव्होर्स अॅक्टप्रमाणे मात्र घटस्फोटासाठी असा अभित्याग व्यभिचारयुक्त असावयास पाहिजे.परंतु १९५५ च्या हिंदू-विवाह-अधिनियमान्वये अभित्यागाने घटस्फोट मिळत नाही, तर फक्त कायदेशीर ताटातूट मिळू शकते. तथापि अशा ताटातुटीनंतर दोन वर्षांनी मात्र त्या अधिनियमान्वये घटस्फोट मिळू शकतो. १९५४ चा स्पेशल मॅरेज अॅक्ट व १८६९ चा इंडियन डायव्होर्स अॅक्ट या अधिनियमांन्वये अभित्याग हे घटस्फोट वा कायदेशीर ताटातूट या दोहोंचेही कारण होऊ शकते. इंडियन डायव्होर्स अॅक्टप्रमाणे मिळालेल्या कायदेशीर ताटातुटीनंतर पत्नीस स्वतः अविवाहित आहे असे समजून स्वकष्टार्जित मिळकत संपादन करता येते व अशा मिळकतीवर नवऱ्याचा हक्क चालत नाही.बोधायन धर्मसूत्रामध्ये अभित्याग सांगितला आहे, तो बायकोला सोडण्याबाबत आहे. त्यात असे म्हटले आहे, की संतती नसलेल्या स्त्रीचा त्याग दहाव्या वर्षी, मुली होणार्या स्त्रीचा बाराव्या वर्षी, जिची संतती वाचत नाही तिचा पंधराव्या वर्षी व जी प्रिय बोलत नाही तिचा ताबडतोब त्याग करावा. मुसलमानी कायद्यात कोणत्याच प्रकारच्या अभित्यागाची कल्पना दिसत नाही.
लेखक : श्री. वि.गाडगीळ
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020