मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) महाराष्ट्र राज्यातील एक महानगरीय क्षेत्र आहे, ज्यामध्ये मुंबई आणि त्यातील उपनगरीय शहरांचा समावेश आहे. त्यात नऊ महापालिका आणि 15 नगरपालिका आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ 4,355 वर्ग कि.मी आहे आणि 20,748,395 लोकसंख्या आहे.
महाकाय महानगर क्षेत्र
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगरीय क्षेत्रांपैकी एक आहे. संपूर्ण क्षेत्राच्या नियंत्रणाची सूत्र 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (MMRDA) कडे आहेत.
'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'कडे सर्व सूत्रे
महाराष्ट्र राज्य सरकारची ही प्रभारी संघटना या प्रदेशामध्ये टाउन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट, वाहतूक व गृहनिर्माण हे सर्व विषय बघते. या महाकाय मेट्रोपॉलिटन प्रांतासाठी एकीकृत पायाभूत सुविधांच्या नियोजन आणि विकासातील आव्हानांना तोंड देण्यासाठीच मुळात एमएमआरडीएची स्थापना करण्यात आली.
'मुंबई महानगर प्रदेश' स्थापनेमागील पार्श्वभूमी
बृहन्मुंबई आणि नवी मुंबईच्या बाहेरील भागात संघटित विकासाचा अभाव होता. बृहन्मुंबई खेरीज अपवाद होता नवी मुंबईला महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापित केलेल्या 'सिटी अॅण्ड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (सिडको) एक नियोजित शहरांपैकी म्हणून विकसित केले. पण हा अपवाद झाला. हे सोडता, आणि अर्थातच मूळ मुंबईचा अपवाद सोडता या एवढ्या महाकाय प्रदेशात नियोजनाचा पूर्ण अभाव होता. त्याचवेळी वेगवान नागरीकरणामुळे या भागात अनैतिक आणि अनिर्बंध विकासामुळे तयार होणाऱ्या सर्व समस्या तयार झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश (MMR) चा जन्म झाला. अर्थात यापुढील वाटचाल काय झाली आणि कोणत्या नव्या समस्या आणि आव्हाने उभी राहिली तो स्वतंत्र विषय आहे.
'मुंबई महानगर प्रदेश' मध्ये नेमकी कोणती शहरे, गावे येतात?
पुढील महापालिका आहेत:
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, वसई-विरार
पुढील नगरपालिका आहेत:
कुळगाव-बदलापूर, उरण, अलिबाग, पेन, माथेरान, कर्जत, खोपोली, पालघर, अंबरनाथ
पुढील जिल्हे आहेत:
मुंबई शहर (पूर्ण), मुंबई उपनगर (पूर्ण), ठाणे (संपूर्ण), पालघर (अंशिक), रायगड (अंशिक)
अंतिम सुधारित : 6/27/2020