हा शब्द रूरल (rural) म्हणजे ग्रामीण आणि अर्बन (urban) म्हणजे शहरी यांच्या संयोगातून तयार झाला आहे. या शब्दाचा वापर सर्वात प्रथम सी. जे. गॅलपीन यांनी १९१८ मध्ये आणि त्यानंतर १९२९ मध्ये सोरोकीन या समाजशास्त्रज्ञाने केला. तो अशा वस्तींच्या वर्णनासाठी की जेथे ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांचा मिलाफ आढळतो.
हा मिलाफ कशामुळे घडतो? जेव्हा शहरीकरणाची विस्फोटक वाढ होते आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू होते, तेव्हा ग्रामीण भागांत शहरी जीवनपद्धती शिरकाव करू लागते. ग्रामीण जनतेला शहरांचे रोजगार, स्थैर्य, चांगले राहाणीमान यांसाठी आकर्षण तयार होते.
रूरल आणि अॅग्रिकल्चरल
शेतीचे आयुष्य ग्रामीण असते, पण विशेषत: आधुनिक काळात सर्वच ग्रामीण आयुष्य शेतीचे नसते. म्हणून आपण जेव्हा ग्रामीण समाज म्हणून संबोधतो, तेव्हा त्यातील एक हिस्सा शेतीत असतो, पण सर्वच जण शेती करत नसतात.
शहरीकरणाची क्रांती
विसाव्या आणि एकविसाव्या शतकात जगभरात शहरीकरणाने निश्चितच जोर पकडला आहे. जगातील कानाकोपऱ्यातील सर्वच समाज कमीअधिक प्रमाणात शहरीकरण, यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण या प्रवाहात ओढले जात आहेत. भारतातील ग्रामीण समाजही याला अपवाद नाही.
आजची गावे
या प्रवाहाच्या प्रभावामुळे भारतातील ग्रामीण समाज बदलला आहे, बदलतो आहे. आता ती जुनी गावे, जुनी समाजरचना दिसत नाही. दिसली तर अपवादाने आणि तुकड्यातुकड्याने दिसते. एक तर शहरी आणि ग्रामीण आयुष्य परस्परावलंबी आणि गुंतागुंतीचे झाले आहे. दुसरे म्हणजे रुर्बनायझेशन मुळे ग्रामीण आणि शहरी मुल्ये आणि पद्धती परस्परांत घुसले आहेत. तिसरे म्हणजे असाही सामाजिक स्तर आकाराला आला आहे जो ग्रामीणही नाही आणि शहरीही नाही.
स्थानिक वैशिष्ट्ये
हल्लीच्या काळात ही प्रक्रिया जगभर घडते आहे. पण देशादेशांत वेगळेपणा आहे. भारताची आणि महाराष्ट्राची आपली खास वैशिष्ट्ये आहेत त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भारतात केरळा, गोवा सारख्या भागांत रुर्बन प्रक्रिया ठळक आहे. तर मोठ्या प्रांतांत शहर/खेडी फरक अस्पष्ट, गुंतागुंतीचा आणि पसरट दिसेल.
रुर्बन मिशन
भारत सरकारच्या २०१४-१५ अर्थसंकल्पात 'शामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन' (SPMRM) ची घोषणा करण्यात आली. त्यात गुजरात सरकारने राबवलेली 'ग्रामीण भागाच्या शहरीकरणाची रुर्बन विकास योजना' ही आदर्श मानली गेली. 'शामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन' (SPMRM) साठी 5142.08 कोटी रुपयांचा निधी वार्षिक अर्थसंकल्पात संमत आहे. रुर्बन मिशन मध्ये स्मार्ट ग्रामीण समूहांचा विकास करण्याची योजना आहे. ३०-४० लाख लोकसंख्येच्या १५-२० गावाचे समूह याप्रकारे विकसित केले जाणार आहेत. या ग्रामीण समूहांत आर्थिक चालना, कौशल्य आणि स्थानिक उद्योजकता यांसाठी आवश्यक ती संरचना निर्माण करण्याची योजना आहे.
अंतिम सुधारित : 4/19/2020