उत्तर सेमिटिक लिपीपासून निर्माण झालेल्या लिपींमध्ये अॅरेमाइक लिपी ही एक महत्त्वाची लिपी आहे. १२००–११०० इ.स.पू. या काळात ईजिप्त, अॅसिरिया व हिटाइट संस्कृतींचा हळूहळू ऱ्हास झाला आणि त्यांचे राजकीय वर्चस्वही गेले. अॅरेमाइक सत्ता अस्तित्वात असताना अॅरेमाइक लिपी आणि भाषा यांना फारसे महत्त्व प्राप्त झाले नव्हते. अॅरेमियन लोकांचे राजकीय वर्चस्व गेले; परंतु सांस्कृतिक जीवनावरील त्यांचा प्रभाव तसाच राहिला. इ.स.पू. नवव्या शतकात अॅसिरियन राजा दुसरा टूकुल्टी नीनुर्टा याने आपल्या कारकिर्दीत (८८९–८८४ इ.स.पू.) अॅसिरियन संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले आणि त्याच सुमारास अॅरेमाइक भाषा आणि लिपी यांचा प्रसार केला. प्राचीन इराणी साम्राज्याची ती राजभाषा आणि राजलिपी होती. ईजिप्तपासून भारताच्या वायव्य भागापर्यंत या लिपीचा प्रसार झालेला आढळून येतो.
सर्वांत प्राचीन अॅरेमाइक लेख सिरियातील तेल-हलफ येथील इ.स.पू. ८५० मधील असून त्यात दमास्कसचा राजा बेन-हद्द याचा उल्लेख आहे. इ.स.पू. सहाव्या शतकानंतरचे अॅरेमाइक लेख सिरियामध्ये सापडलेले नाहीत. काही लेख पॅलेस्टाइनमध्ये सापडले आहेत; पण ते त्रुटित आहेत. अत्यंत महत्त्वाचे अॅरेमाइक लेख अॅसिरिया, इराण, कॅपाडोशिया, लिशिया, लिडिया, सायलीशिया, उत्तर अरबस्तान, ईजिप्त, ग्रीस, अफगाणिस्तान येथे सापडलेले आहेत. कंदाहारजवळ शर-इ-कुन येथे सम्राट अशोकाचा अॅरेमाइक व ग्रीक लिपींमध्ये लिहिलेला लेख सापडला आहे. ईजिप्तमधील एलेफंटायनी येथील पपायरसेवर लिहिलेला अॅरेमाइक लेख प्रसिद्ध आहे. ईजिप्तमधील ज्यू लोकांच्या लष्करी वसाहतीची, तसेच त्यांच्या आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीबाबतची माहिती या लेखात मिळते. ईजिप्तमध्ये असे पपायरसेवरील अनेक अॅरेमाइक लेख सापडले आहेत. त्यांतील सर्वांत प्राचीन लेखाचा काळ साधारणपणे इ.स.पु. ५१५ हा आहे.
अॅरेमाइक लिपीमध्ये उत्तर सेमिटिक लिपीमधील बावीस अक्षरे-आहेत. तथापि तिचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांतील काही अक्षरांचे शिरोभाग मोकळे आहेत; तर बेथ् (ब्), दालेथ् (द्), रेश् (र्) आणि अयिन् (अ) या अक्षरांच्या कडेच्या बाजू उघड्या आहेत. काही अक्षरांना गोलाई आहे. अक्षरांच्या डोक्यावरील आडवे दंड नाहीसे झाले इ. फरक तीत आढळून येतात.
एका विशिष्ट वर्गाची मिरासदारी म्हणून ⇨क्यूनिफॉर्म लिपी होती, तर सर्वसामान्य लोकांची लिपी अॅरेमाईक हीच होती. अॅरेमाइक लिपीचे दोन कालखंड पडतात : (१) इ.स.पू. नवव्या शतकापासून इ.स.पू. सातव्या शतकापर्यंतचा काळ आणि (२) इ.स.पू. सातव्या शतकापासून इ.स. पाचव्या शतकापर्यंतचा काळ. अॅरेमाइक लिपीपासून ⇨ हिब्रू, नाबाटियन, पामिरिन, सिरिअॅक नेस्टोरिअन, मॅनडिअन इ. सेमिटिक कुलाच्या लिपी उत्पन्न झाल्या आणि त्यांतूनही अनेक शाखोपशाखा उत्पन्न झाल्या. सेमिटिक कुलाशी संबंध नसलेल्या लिपीही अॅरेमाइक लिपीपासून उत्पन्न झाल्या. उदा., ⇨ खरोष्ठी, पेहलवी, अवेस्ता, सोगडिअन, मांचू, कालमुक इत्यादी.
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, Vols. I, II, London. 1968.
2. Diringer, David, Writing, London, 1962.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/14/2020