लॅटिन लिपीच्या म्हणजे रोमन लिपीच्या खालोखाल जास्तीत जास्त प्रसार झालेली लिपी म्हणजे अरबी लिपी होय. सातव्या-आठव्या शतकांमध्ये इस्लाम धर्मप्रसाराबरोबरच अरबी भाषा आणि लिपी यांचा प्रसार झाला. कुराणरचनेच्या पूर्वी अरबी लिपीचे स्वरूप कसे होते,याविषयी माहिती उपलब्ध नाही. इस्लाम धर्मप्रसाराआधी ही लिपी अस्तित्वामध्ये होती हे मात्र निश्चित. काही संशोधकांच्या मते या लिपीचा उगम मेसोपोटेमियामधील अल्-हिरा येथे झाला आणि उत्पत्ती नाबातियन लोकांच्या निओ-सिनिअॅटिक लिपीपासून झाली. मक्का, मदीना, बसरा,कूफा या ठिकाणी अरेबिक लिपीच्या निरनिराळ्या धाटणी दिसून येतात. दहाव्या शतकात बगदाद येथील नदीम या लेखकाने मक्का आणि मदीना येथील लेखनपद्धती आणि बसरा व कूफा येथील लेखनपद्धती असे दोन महत्त्वाचे भेद केले. मक्का आणि मदीना येथील लिपीचे तीन प्रकार आहेत. कूफा आणि बसरा येथील लिपीचे सहा प्रकार आहेत. सातव्या शतकाच्या अखेरीस नक्शी आणि कूफिक या दोन लिपी प्रामुख्याने अस्तित्वात होत्या. इस्लाम धर्माला चित्रकला संमत नसल्यामुळे अरबी लोकांनी लेखनविद्येत आपले कसब पणाला लावलेले दिसून येते. कूफिक लिपी ठाशीव, उभट आणि देखणी होती. या लिपीचा धातूवर, दगडावर, मशिदीच्या भिंतींवर रंगाने लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे. या लिपीमध्ये लिहिलेली कितीतरी कुराणाची हस्तलिखिते उपलब्ध आहेत.नक्शी लिपीमध्ये गोलाईची आणि लपेटीची अक्षरे आढळून येतात. या लिपीपासून पुष्कळ लिपी उत्पन्न झाल्या. आधुनिक अरबी लिपी नक्शी लिपीपासूनच उत्पन्न झाली.
अरबी लिपी सेमिटीक लिपीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहितात. या लिपीमध्ये एकूण अठ्ठावीस व्यंजने आहेत. सर्व अक्षरे व्यंजने असली,तरी ‘अलिफ्’, ‘वाव्’ आणि ‘या’ या अक्षरांचा स्वरांसारखाही उपयोग करतात. सेमिटिक लिपीमधील बावीस अक्षरे या लिपीत असून या लिपीने शेवटल्या सहा व्यंजनांची त्यांत भर घातली आहे. बहुतेक अक्षरांना, ती अक्षरे शब्दांच्या सुरूवातीस, मध्यभागी, शेवटी आणि जोडाक्षरात असल्यास, वेगवेगळे आकार आहेत. अरबी लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तीमधील उच्चारणदर्शक चिन्हे. या चिन्हांमुळे व्यंजनांचे आणि स्वरांचे उच्चारण कळते. या चिन्हांच्या उत्पत्तीविषयी संशोधकांची निरनिराळी मतमतांतरे आहेत. सातव्या-आठव्या शतकांच्या सुमारास सिरियॅक लिपीपासून ही चिन्हे अरबी लिपीमध्ये आली असावीत.
हस्तलिखित आणि छापील लिपी यांत फार तफावत पडते. एकमेकांत गुंतलेली अक्षरे दिसावयास सुंदर दिसली, तरी ती वाचणे अवघड होऊन बसते.
अरबी भाषेपेक्षाही अरबी लिपीचा प्रसार जास्त झालेला दिसतो. इराण, रशियाचा आग्नेय भाग, बाल्कन राष्ट्रे, आशियाचा पश्चिम भाग,तसेच मध्य आणि आग्नेय भाग आणि आफ्रिकेच्या बऱ्याच भागांत ही लिपी प्रचलित असल्याचे आढळते. केवळ सेमिटिक भाषांसाठी या लिपीचा उपयोग केलेला नसून इंडो-आर्यन भाषांनीही या लिपीचा अंगीकार केलेला दिसून येतो. स्लाव्होनिक, स्पॅनिश, पर्शियन (फार्सी), हिंदुस्थानी (उर्दू), टर्किश, हिब्रू, बर्बर, स्वाहिली, सूदानी इ. भाषांनी या लिपीचा स्वीकार केला. अरबी लिपीने सिरियन लिपीची अॅनातोलिया व सिरियामधून आणि ग्रीक लिपीची ईजिप्तमधून हकालपट्टी केली.
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, Vols. I and II, London, 1962.
2. Diringer, David, Writing, London, 1962.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020