प्राचीन संस्कृतींमध्ये इट्रुस्कन संस्कृती अतिशय महत्त्वाची होती. तथापि इट्रुस्कन लोकांचे मूलस्थान, वंश, भाषा, यांबद्दल निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे, की इट्रुस्कन लोकांचे इ. स. पू. सातव्या-सहाव्या शतकांमध्ये रोमवर राज्य होते.
इट्रुस्कन लिपीच्या उत्पत्तीसंबंधी विविध प्रकारची मतमतांतरे आहेत. काहींच्या मते इट्रुस्कन लिपी हेलेनिकपूर्वकाळातील कॅडमिक लिपीपासून उत्पन्न झाली. या लिपीचे मूळ ⇨ ग्रीक लिपीमध्ये आहे, याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. सर्वसामान्यपणे चाल्सिडियन या पश्चिमेकडील ग्रीक लिपिप्रकारापासून इट्रुस्कन लिपी उत्पन्न झाली, असे मानले जाते. ज्या संशोधकांच्या मते इट्रुस्कन लोक प्रागैतिहासिक काळात उत्तरेकडून इटलीमध्ये आले, त्यांच्या मते या लिपीचा उगम चाल्सिडियन लिपिप्रकारामध्ये आहे.
फ्रांन्समधील मार्सिलिना द अल्बेना येथे एक हस्तिदंती पट्ट सापडला होता. तो फ्लॉरेन्स येथील पुरावस्तुसंग्रहालयात आहे. या पट्टावर सर्व इट्रुस्कन लिपी आहे. तीमध्ये एकूण सव्वीस अक्षरे असून ती उजवीकडून डावीकडे लिहिलेली आहेत. या पट्टाचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. पू. ८००–७०० हा असावा. इट्रुस्कन लिपीचा काळ इ. स. पू. सु. आठवे शतक हा असावा. इ. स. पू. पाचव्या शतकात इट्रुस्कन लिपीमध्ये तेवीस अक्षरे होती. इ. स. पू. चवथ्या शतकात इट्रुस्कन लिपीचे संपूर्ण स्वरूप दिसून येते. सोळा व्यंजने व चार स्वर या लिपीमध्ये होते. इट्रुस्कन भाषेमध्ये ‘ब’ आणि ‘प’; ‘द’ आणि ‘त’; ‘क’ आणि ‘ग’ यांच्या उच्चारांत अजिबात फरक आढळून येत नाही. ‘ब’ आणि ‘द’ ही अक्षरे मूळ इट्रुस्कन लेखांमध्ये कधी आली नाहीत. इस्ट्रुन लिपीमध्ये उच्चारणाबरहुकूम शब्दाचे रूढ लेखन (स्पेलिंग) असल्याचे दिसून येत नाही. उदा., ‘त' उच्चारणाबद्दल ‘थ’, ‘क’ बद्दल ‘ख’ लिहिलेला आढळून येतो. लेखनाच्या पद्धतीबद्दल पाहता इट्रुस्कन लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असली, तरी लॅटिन भाषेच्या प्रभावामुळे ती डावीकडून उजवीकडे व कित्येक वेळा नांगरटीप्रमाणे (म्हणजे एक ओळ डावीकडून उजवीकडे तर दुसरी उजवीकडून डावीकडे) लिहिली जाऊ लागली.
कालांतराने लॅटिन आणि इट्रुस्कन असे द्वैभाषिक लेख लिहिलेले आढळून येतात. कधीकधी इट्रुस्कन भाषेतील लेख लॅटिन लिपीमध्ये लिहिलेले आढळून येतात, तर काही वेळा लॅटिन भाषेतील लेख इट्रुस्कन लिपीमध्ये लिहिलेले आढळून येतात. इट्रुस्कन लोकांचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व कमी होऊ लागल्यामुळे इ. स. पहिल्या शतकानंतर या लिपीतील लेख आढळून येत नाहीत. इट्रुस्कन भाषेतील सु. दहा हजार लेख उपलब्ध आहेत. त्यांतील बरेचसे लेख इट्रुरिया म्हणजे सध्याच्या तस्कनीमध्ये सापडलेले आहेत. काही लेख इटलीमधील सिसिली-सार्डिनिया भागांत सापडले आहेत, तर काही ईजिप्तमध्ये आणि ग्रीसमध्ये सापडले आहेत. ईजिप्तमधील एका शवपेटिकेपध्ये रेशमी कापडावर लिहिलेला पंधराशे शब्दांचे लेश सापडला आहे. गाईच्या यकृताचा आकार असलेल्या शिलालेखामध्ये इट्रुस्कन पौराणिक देव-देवांची नावे आहेत. काही लेखांतून मृत व्यक्तींची नावे आढळून येतात. या लिपीमध्ये लिहिलेले लेख सुवर्णपात्रावर, शिशाच्या पट्टीवर, आरशावर, भांड्यांवर आढळून येतात. या लिपीतील कितीतरी साहित्य उपलब्ध आहे. इट्रुस्कन लिपी नष्ट झाली, परंतु तिच्यापासून ⇨ रोमन लिपीची उत्पत्ती झाली.
संदर्भ : Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020