इथिओपिक लिपीच्या उत्पत्तीसंबंधाने विद्वांनाची निरनिराळी मते आहेत. ही लिपी ग्रीक, सिरिअॅक, कॉप्टीक, सामारिटन किंवा सेबिअन लिपीपासून उत्पन्न झाली असावी; अशा तऱ्हेची मतमतांतरे आहेत. एक मात्र निश्चित, की इ.स.पू. पाचशेनंतर दक्षिणी अरब लोकांनी अॅबिसिनियामध्ये वसाहती केल्या आणि त्यांनी दक्षिणी सेमिटिक लिपी आणि भाषा आपल्याबरोबर नेल्या. तत्पूर्वी इथिओपियाची लिपी व भाषा सेबिअन होती. दक्षिणी अरब लोकांनी वसाहती केल्यानंतरच्या काळातील काही दक्षिणी सेमिटिक लेख अॅबिसिनियामध्ये सापडले आहेत. इ.स. चवथ्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर अॅबिसिनियामध्ये अॅक्सम नावाचा पराक्रमी राजा राज्य करीत होता; त्यावेळी सेबिअन लिपी व भाषा यांऐवजी इथिओपिक लिपी वा भाषा अस्तित्वात आली. या काळातील पुष्कळ लेख उपलब्ध आहेत. काही लेखांतून इथिओपिक भाषेवर दक्षिणी अरबी भाषेचा पगडा दिसून येतो, तसेच दक्षिणी सेमिटिक लिपीचा वापरही आढळून येतो. काही लेखांत इथिओपिक भाषा असली, तरी लिपी दक्षिणी सेमिटिक असल्याचे दिसून येते.
इथिओपिक लिपी दक्षिणी सेमिटिक लिपीपासून हळूहळू विकसित झाली. इथिओपिक अंक ग्रीक लिपीपासून आलेले आहेत. इथिओपिक लिपीमध्ये एकूण सव्वीस अक्षरे आहेत. सेबिअन अठ्ठावीस अक्षरांपैंकी, चार अक्षरे तीत गळलेली आहेत; परंतु त्यांऐवजी ‘पैत’ व ‘प’ ही दोन नवीन अक्षरे तीत आलेली आहेत. सर्व अक्षरांचे वळण गोल असून लिहिण्याची मूळ पद्धत उजवीकडून डावीकडे होती. तथापि ग्रीक लोकांच्या सान्निध्यामुळे ग्रीक लिपीचा प्रभाव या लिपीवर पडून, लोक डावीकडून उजवीकडे लिहू लागले असावेत. शब्द तोडण्यासाठी ते उभ्या दंडाचा उपयोग करीत असत. तथापि पुढे त्यासाठी दोन बिंदूंचा उपयोग करू लागले.
इथिओपिक लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील अक्षरांचे उच्चारण. प्रत्येक व्यंजनानंतर येणारा स्वर अक्षराच्या डाव्या अगर उजव्या अंगाला, अक्षराच्या डोक्यावर अथवा तळाशी खूण करून, अक्षरातील दंड लांबवून अगर आखूड करून किंवा इतर फरक करून दाखविला जातो; म्हणून प्रत्येक अक्षराचे संबंधित व्यंजनानुसारी सात प्रकार आहेत. अ, आ, ई, ऊ, ए, ऐ आणि ओ या स्वरांच्या वेगवेगळ्या खुणा आहेत. सोबतच्या तक्त्यातील उभ्या स्तंभांत सव्वीस इथिओपिक व्यंजनांचे आडव्या स्तंभातील स्वरांनुसार होणारे सात प्रकार दर्शविले आहेत. उदा., ह् ह्या व्यंजनाचे ह् + अ = ह; ह् + ऊ = हू; ह् + ई= ही; ह् + आ= हा; ह् + ऐ = है; ह् + ए = हे आणि ह् + ओ = हो असे सात प्रकार. ए ह्या स्वराच्या स्तंभातील वर्ण शुद्ध व्यंजने म्हणूनही मानली जातात. सर्व व्यंजनांमध्ये भारतीय लिपींमधील अक्षरांप्रमाणे ‘अ’ असतोच. क, ख, क, ग ह्या अक्षरांच्या पुढे स्वर आला असता पुन्हा पाच वेगळे प्रकार होतात.
इथिओपिक लिपीत कालमानानुसार, विशेषतः तेरव्याशतकानंतर, फारसा बदल झाल्याचे आढळून येत नाही. अक्षरांच्या वळणात थोडाफार फरक पडल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या मूळ स्वरूपात मात्र फरक झाल्याचे दिसत नाही. सुलेखनाच्या दृष्टीने सतराव्या शतकातील ठाशीव व मोठी अक्षरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इ.स. चवथ्या शतकात उत्तर इथिओपियातील लोकांनी ख्रिस्ती धर्माचा अंगीकार केल्यावर, ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी त्यावेळी प्रचलित असलेल्या गीझ भाषेत आपले धर्मसाहित्य लिहिले. ह्या भाषेची लिपी इथिओपिकच होती. ही भाषा आज मृत असली, तरी इथिओपिक लिपीत लिहिलेले गीझ साहित्य आजही उपलब्ध आहे. गीझशी संबंधित असलेली आम्हारिक भाषा इथिओपियात तेराव्या शतकात प्रमुख भाषा म्हणून वापरात आली. इथिओपियाची ती आज राजभाषा असून तीही इथिओपिक लिपीतच लिहिली जाते. इथिओपियाच्या उत्तरेकडील भागात आम्हारिकशी संबंधित अशा टिग्रे आणि टिग्राइ अथवा टिग्रिना अशा दोन भाषा प्रचलित असून, त्यांचीही लिपी इथिओपिकच आहे.
संदर्भ : Diringer, David, The Alphabet, Vols. I, II, London, 1968.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/22/2020