दक्षिण भारतातील एक प्राचीन लिपी. ‘ग्रंथ’ हे लिपीचे नाव अर्थपूर्ण आहे. संस्कृत ग्रंथ लिहिण्यासाठी ज्या लिपीचा उपयोग करीत, त्या लिपीचे नाव ग्रंथ लिपी. संस्कृत लेख व्याकरणशुद्ध
ग्रंथ लिपी : वर्णमालाग्रंथ लिपी : वर्णमाला
लिहिण्यास तमिळ लिपी अपुरी असल्यामुळे संस्कृत लेख या लिपीत लिहीत. असे लेख तमिळनाडूत आढळून येतात. पल्लव, चोल, पांड्य, पूर्वेकडील चालुक्य, गंग, बाण या वंशांचे राजे व विजयानगरचे राजे यांच्या लेखांतही ही लिपी आढळते. ग्रंथ लिपीच्या विकासात पुढील तीन अवस्था दिसून येतात : प्राचीन अवस्था, द्वितीयावस्था आणि तृतीयावस्था. प्राचीन अवस्थेचे प्राचीन कन्नड व तेलुगू लिपींशी साम्य दिसते. सातव्या शतकाच्या प्रथमार्धातील लेखांत या अवस्थेतील लिपीचा आढळ होतो. द्वितीयावस्था पल्लव राजा पहिला परमेश्वरवर्मन् याच्या ‘कूरम ताम्रपटा’त आढळते. या अवस्थेत ‘अ’, ‘आ’, ‘क’, ‘र’ या वर्णांचे अंगभूत दंड दुहेरी व उभे आहेत. अनुस्वार वर्णाच्या डोक्यावर नसून उजव्या बाजूस काढलेले दिसतात. अक्षराच्या उभ्या दंडावर लहान कोनही कधीकधी दिसतात. या लिपीत आठव्या, नवव्या व दहाव्या शतकांत टप्प्याटप्प्याने बदल होत गेला. बाराव्या शतकातील बाणवंशीय राजा विक्रमादित्य व आणि तेराव्या शतकातील सुंदर पांड्य यांच्या लेखांत ह्या लिपीची तिसरी अवस्था दिसून येते. काही वर्ण प्राचीन काळापासून काहीही फरक न होता तसेच टिकून राहिले, तर काही वर्णांत मात्र वेळोवेळी फरक पडत गेला. ‘इ’, ‘ए’, ‘क’, ‘प’, ‘म’, ‘व’ या वर्णांत हा फरक दिसून येतो. सध्या तंजावरकडे ही लिपी थोड्याफार प्रमाणात प्रचारात असून तिचे गोल व चौकोनी अक्षरवाटिका असे दोन भेद आहेत.
संदर्भ : 1. Buhler, G.; Trans. Fleet. J. F. Indian Palaeography, Calcutta, 1962.
2. Burnell, A. C. Elements of South-Indian Palaeography, London. 1878.
३. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020