पाश्चिमात्य लेखनपद्धतीच्या इतिहासात इतर क्षेत्रांप्रमाणेच ग्रीकांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे. ग्रीक लोकांनी सेमाइट लोकांची लिपी आत्मसात केली. तिचा विकासही केला. नंतर इट्रुस्कन, लॅटिन, सिरिलिक या लिपींची ग्रीक लिपी ही जननी तर ठरलीच; परंतु यूरोपमधील सर्व लिपींची सुरुवात प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ग्रीक लिपीपासूनच झाली. ग्रीकांनी नवीन लिपी शोधून काढली नाही, तर सेमिटिक लिपी आत्मसात करून ती अधिक रेखीव व देखणी केली. मूळ सेमिटिक लिपीमध्ये त्यांनी इतकी सुधारणा व विकास केला, की आज तीन हजार वर्षे तिचे तेच स्वरूप कायम राहिले. निरनिराळ्या राष्ट्रांतील लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी ग्रीक लिपी साधनीभूत ठरली. उच्च प्रकारचे साहित्य, विज्ञान व तत्त्वज्ञान यांचे ती दीर्घकाळ संवाहन करीत होती. टायरचा राजा एजिनॉर यांचा पुत्र कॅडमॉस याने ग्रीक लिपीचा शोध लावला किंवा त्याने ती लिपी ग्रीसमध्ये सर्वप्रथम आणली, अशा ग्रीक व रोमन परंपरागत समजुती आहेत. दुसऱ्या एका मताप्रमाणे त्याने फक्त सोळाच अक्षरे ग्रीसमध्ये आणली (इ. स. पू. १३१३). ट्रोजन युद्धाच्या वेळी (इ. स. पू. सु. ११८३) पॉलमिडिसने थीटा, झाय, फाय आणि काय ह्या चार वर्णांची तीत भर घातली, असे ग्रीक परंपरेनुसार मानले जाते.
ग्रीक वर्णमालाग्रीक वर्णमाला
ग्रीक लिपी नेमकी कोणत्या काळात प्रत्यक्ष अस्तित्वात आली, हा विवाद्य प्रश्न आहे. एका मताप्रमाणे ग्रीकांनी इ.स.पू. सातव्या-आठव्या शतकांत ती अस्तित्वात आणली. ग्रीक लिपी सेमिटिक लिपीपासून निर्माण झाली, याबद्दल मात्र अभ्यासकांचे आता दुमत नाही. इ.स.पू. दहाव्या शतकात ग्रीक लोक सेमिटिक लिपी शिकले असावेत, हेच आजमितीस बहुतेक अभ्यासक ग्राह्य मानतात. असे असले तरी ग्रीकांनी सेमिटिक लिपी आंधळेपणाने स्वीकारली नाही, तर तीत अनेक सुधारणा केल्या व तिचा विकासही केला. प्राचीन ग्रीक वर्णांचे सेमिटिक वर्णांशी बरेच साम्य आहे. काही अपवाद सोडले, तर ग्रीक वर्णांचा क्रमही सेमिटिक वर्णांप्रमाणेच आहे. ग्रीक वर्णांची मूळ नावे सेमिटिक असल्यामुळे, त्यांना भाषेत तसा काहीही अर्थ नाही. ग्रीक लोकांनी ‘बेथ, जिमेल, दलेथ, झयिन, काफ, लामेद, मेम, नून, पे, रेश’ आणि ‘ताव’ हे वर्ण सेमिटिक लिपीतून त्यांच्या उच्चारणमूल्यासहित जसेच्या तसे उचलले.
‘अलेफ, हे, वाव्, योध, अयिन्’ या सेमिटिक वर्णांचे ग्रीकांनी ‘आल्फा, एप्सायलॉन, उप्सायलॉन, आयोटा’ व ‘ओमिक्रॉन’ या स्वरांत रूपांतर केले. सेमिटिक लिपी केवळ बावीस व्यंजनांची होती. त्यांमध्ये स्वरांचा उपयोग करून ग्रीकांनी भाषेत मार्दव आणले. सेमिटिक ‘झयिन’चा ग्रीक लिपीत ‘झ’ झाला. सेमिटिक ‘सामेख’चे ‘सिग्मा’ झाले; परंतु त्याची उपपत्ती सेमिटिक ‘शिन्’ या वर्णाशी त्यांनी जोडली.
‘ब्, ग्, द् (ड्), झ्, क्, ल्, म्, न्, प्, र्, त्’ या वर्णांनी व्यक्त होणारे उच्चारण सेमिटिक व ग्रीक भाषेत सारखे आहे; परंतु सेमिटिक ‘वाव्’ हा वर्ण मात्र ग्रीक ‘डिगम्मा’ हे उच्चारण लिहिण्यासाठी ग्रीकांनी सुरुवातीच्या काळात उचलला. नंतर तो प्रचारातून गेला.
ग्रीक लिपीच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन प्रमुख शाखा असून त्यांच्या परत अनेक उपशाखा आहेत. काही अभ्यासकांच्या मते पूर्वेकडील लिपी म्हणजे आयोनिक प्रकारची लिपी ही सर्वांत प्राचीन होती आणि ती आशिया मायनर व लगतही सिक्लाडीझ, ॲटिका, मेगारा, कॉरिंथ, सिसीअन, आर्गॉस ही बेटे आणि मॅग्ना ग्रीश येथील आयोनियन वसाहतींत प्रचलित होती. इतर काही अभ्यासकांच्या मते पश्चिमेकडील लिपी पूर्वेकडील लिपीपेक्षा जास्त प्राचीन होती. पश्चिमेकडील लिपी यूबीआ, बीओशा, फोसिस, लॉक्री, थेसाली, पेलोपनीससचा काही भाग आणि मॅग्ना ग्रीशमधील आयोनियन वसाहती सोडून इतर भाग यांत प्रचलित होती.
सेमिटिक लिपीप्रमाणेच ग्रीक लिपी आरंभी उजवीकडून डावीकडे लिहीत. त्यानंतर इ.स.पू. सहाव्या शतकात नांगरटी पद्धतीने म्हणजे पहिली ओळ उजवीकडून डावीकडे व दुसरी ओळ डावीकडून उजवीकडे व तिसरी ओळ पुन्हा उजवीकडून डावीकडे या क्रमाने लिहीत. कधी कधी ही लिपी खालून वर व वरून खाली अशा पद्धतीनेही लिहीत. इ.स.पू. पाचशेनंतर मात्र डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली अशाच पद्धतीने ग्रीक लोक तिचे लेखन करीत.
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.
2. Gelb, I. J. A Study of Writing, Chicago, 1958.
3. Van Groningen, B. A. Short Manual of Greek Palaeography, Leyden, 1946.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020