चित्रलिपीची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. ज्या चित्रांमधून अर्थाभिव्यक्ती होते, अशा चित्रांचे स्वरूप केवळ चित्र म्हणून राहत नाही; त्यांतून माणसाच्या कल्पना आणि विचार प्रकट होतात; परंतु त्यांस लिपी म्हणता येणार नाही. आदिमानवाच्या गुहांतून रंगविलेली चित्रे सापडली आहेत. या गुहांतील चित्रांवरून संशोधक अर्थ काढतात व तत्कालीन जीवनाचा मागोवा घेतात; तथापि तत्कालीन लोकांचे त्यांमागील नेमके विचार कोणते असावेत, याबाबत संशोधकांना खात्री नसते. मध्य आफ्रिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी ज्या प्रकारची प्राचीन चित्रे मिळाली आहेत, त्यांना कल्पनाचित्रे म्हणता येईल. या कल्पनाचित्रांचा आणि चीन, जपान व ईजिप्तमधील चित्रलिपींचा संबंध जोडता येणार नाही. चित्रलिपीतून नेमके शब्द ध्वनित होतात. विचारांची देवाणघेवाण आणि भावना-विचारांची अभिव्यक्ती ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या लिपीचा विचार केलेला असतो. या लिपीतील चित्रे आणि भाषा यांचा समन्वय नियमांनी साधलेला असतो. कल्पनाचित्रांमध्ये विचार सूचित होतात; परंतु त्या कल्पनाचित्रांचे शब्दांकन मात्र व्यक्तिपरत्वे निरनिराळे होते. यामुळे कल्पनाचित्रे आणि चित्रलिपी यांमध्ये बाह्यतः साधर्म्य दिसत असले, तरी अंतर्यामी या दोन गोष्टी संपूर्णतया भिन्न आहेत. भारतामध्ये गिरिकंदरांत अनेक चित्रे आढळून येत असली, तरी ती कल्पनाचित्रे नाहीत. भारतात चित्रलिपीचे नमुने उत्खननामध्ये सापडलेल्या सिंधुसंस्कृतीच्या मुद्रांवर आहेत; परंतु त्यांचे वाचन अद्याप होऊ शकले नाही. या लिपीतील चित्रे व भाषा यांचा समन्वय साधण्यासाठी या चित्रांकित मुद्रांवर एकसमयावच्छेदेकरून दुसऱ्या ज्ञात भाषेचे नमुने सापडणे आवश्यक आहे. अशा द्वैभाषिक मुद्रा सापडल्या, तरच भारतातील चित्रलिपीचे वाचन होईल. सिंधुसंस्कृतीतील चित्रलिपीचा आणि अक्षरयुक्त ब्राह्मी लिपीचाही संबंध समाधानकारकपणे जोडण्यात संशोधक आजवर तरी यशस्वी झाले नाहीत.
आपले विचार आणि कल्पना दुसऱ्यास कळविण्यासाठी मनुष्याला भाषा आणि भाषेच्या खालोखाल लिपी अशी दोन्ही माध्यमे उपलब्ध आहेत. आद्य अवस्थेत मनुष्य जेव्हा भाषा शिकला, तेव्हा त्याने काही वस्तू पाहिल्या व त्यांतील काही त्यास आवडल्या. त्या वस्तू रंगीत दगडांच्या किंवा मातीच्या साहाय्याने त्याने गुहेमध्ये चित्रांकित करून ठेवल्या. त्याने सूर्यचंद्र पाहिले आणि त्याला ते जसे भासमान झाले, तसे त्याने त्यांचे चित्रांकन केले. पुढे माणूस शिकार करू लागल्यावर त्याने रानरेड्याच्या, रानबैलाच्या शिकारीची चित्रे काढली. या चित्रांमागे अर्थातच त्याचा काहीतरी हेतू होताच; परंतु पुढेपुढे आपल्या सहकाऱ्यांना आपल्या कल्पना, हेतू आणि विचार कळावेत, यासाठी त्याने दगड, काटक्या, कवड्या यांचा उपयोग केला. या खुणांतून काही अर्थबोध होई, तसा या चित्रांतूनही निश्चित काही अर्थ सूचित होई.
उत्तर यूरोप, उत्तर आफ्रिका येथील गुहांमधून आदिमानवाची काही चित्रे सापडलेली आहेत. मध्य भारतात भोपाळजवळ आणि कर्नाटक राज्यात टेक्कलकोटे (जि. बेल्लारी) येथे गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आढळली आहेत. सायबीरियातही अशा तऱ्हेची प्राणिचित्रे आणि काही भौमितिक आकृती सापडतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, ईजिप्त, मेसोपोटेमिया, फिनिशिया, क्रीट, स्पेन येथील गुहांत चित्रांचे निरनिराळे प्रकार आढळून येतात. यांशिवाय कॅलिफोर्निया, ब्राझील येथे जी चित्रे आढळतात, त्यांमध्ये मासा, खेकडा, कांगारू, शहामृग, माणूस, चंद्र, सूर्य, झाडे, फुले, पाने, किडे, वर्तुळ, त्रिकोण, हाताचा पंजा यांचा अंतर्भाव आहे. यांशिवाय ऑस्ट्रेलिया तसेच उत्तर अमेरिका येथील काही जमातींमध्ये एकमेकांना संदेश देण्यासाठी सुताच्या गाठींचाही उपयोग करीत. भारतात कोटमसर येथे व कुर्नूल जिल्ह्यात एका ठिकाणी अश्मयुगीन फार मोठ्या चित्रयुक्त गुहा आढळल्या आहेत; पण त्यांचे संशोधन अजून व्हावयाचे आहे. नंतरच्या काळात खवले काढलेल्या काठ्यांचाही उपयोग ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, प. आफ्रिका, चीन, मंगोलिया, आग्नेय आशिया आणि स्कँडिनेव्हिया या देशांमध्ये दिसून येतो. यांशिवाय इंग्लंड, इटली, रशिया या देशांतही अशाच तऱ्हेच्या खवल्यांच्या लाकडी पट्ट्यांचा उपयोग मनुष्य आपल्या सहकाऱ्याला निरोप देण्यासाठी करीत असे. यातूनच पुढे प्रतीकात्मक लिपीचाही मानवाने अवलंब केलेला दिसतो. उत्तर अमेरिकेतील लोकांनी ही पद्धत अनुसरली होती. बांबूची नळी हे शांततेचे प्रतीक असून कुऱ्हाड ही युद्धनिदर्शक होती. त्यानंतर दोऱ्यांनी विणलेली नवार व तीमध्ये काढलेली चित्रे यांचाही उत्तर अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील लोक उपयोग करीत. उत्तर अमेरिकेतील काही जमातींत दोऱ्यांमध्ये कवड्या विणून त्यांद्वारे आपला आशय सूचित करीत. अशा तऱ्हेचे कवड्या विणलेले पट्टे दागिने म्हणूनही ते लोक वापरीत.
आ. १ आ. १
ईजिप्त, क्रीट, पॅलेस्टाइन, सायप्रस या देशांत मातीच्या भांड्यांवर लोक चित्रलिपी काढू लागले वा कल्पनालेखन करू लागले. मध्य आफ्रिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलीया या देशांत आदिमानवाने झाडांच्या साली, लाकडाच्या फळ्या, प्राण्यांची कातडी, हाडे, हस्तिदंत यांवर चित्रे काढली आहेत. चित्रलिपीनंतर कल्पनाचित्रांचा विकास झालेला दिसून येतो. या पद्धतीमध्ये चित्रांवरून त्यामागची कल्पना प्रतीत होते. अशा तऱ्हेची कल्पनाचित्रे उत्तर अमेरिकेमध्ये रेड-इंडियन लोकांनी काढली आहेत. उत्तर अमेरिकेतील सात जमातींच्या लोकांनी आपला एक म्होरक्या निवडून अमेरिकेच्या काँग्रेसकडे काही तलावांतून मासेमारी करण्याच्या आपल्या हक्कांची मागणी अशाच कल्पनाचित्राद्वारे केली होती. त्या चित्रामध्ये त्यांची मने व डोळे ही त्यांच्या म्होरक्याच्या मनाला व डोळ्यांना जोडलेली होती (आ. १)
आ.२ आ.२
अशा तऱ्हेची चित्रे उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व सायबीरियामध्ये सापडली आहेत. युकगिर जमातीतील एका मुलीच्या प्रेमाची शोककथा छत्र्यांच्या चित्रांनी मोठ्या कौशल्याने सूचित केली आहे. त्या चित्रांत छत्र्यांनी माणसे निर्देशिली आहेत. क्रमांक १ व २ ह्या छत्र्यांच्या टोकांवरील ठिपक्यांच्या रेषा वेण्या दर्शवितात. त्यावरून त्या मुली आहेत. त्यांनी रुंद स्कर्ट परिधान केले असून क्र. २ मुलगी रशियन आहे. क्रमांक १ ही मुलगी घरात असून ‘अ’ व ‘आ’ या रेषांनी घर रेखाटले आहे. क्रमांक २ ही मुलगी रशियामध्ये राहते आणि तिचे घर ‘इ’, ‘ई’ या रेषांनी दर्शविले आहे. क्रमांक ३ हा त्याच घरात राहणारा मुलीचा नवरा आहे. त्या घरामध्ये फुल्या आहेत. त्यावरून ते सुखी नाहीत, हे दिसून येते. क्रमांक ५ आणि ६ ही त्यांची मुले आहेत. क्रमांक १ ही मुलगी क्र. ३ ह्या माणसावर प्रेम करते; परंतु ते प्रेम त्याच्या बायकोमुळे असफल आहे, हे ‘उ’ आणि ‘ऊ’ या रेषा ‘ए’ या रेषेमुळे मध्ये तुटल्या आहेत, त्यावरून सूचित होते. तरीसुद्धा ती त्याच्यावर प्रेम करेल, हे ‘य’ या रेषेमुळे दिसून येते. तिच्यावर क्र. ४ ह्या दुसऱ्या युकगिर माणसाचे प्रेम आहे (रेषा ‘ऐ’). तिचे दुःख ‘ओ’ ‘ओ’ या फुल्यांनी दर्शविले आहे (आ. २).
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.
2. Gelb, I. J. A Study of Writing, Chicago, 1958.
3. Mallery, G. Picture Writing of the American Indians,
Washington, 1893.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020