অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जपानी लिपी

जपानी लिपी

सांस्कृतिक दृष्ट्या जपान चीनचीच एक वसाहत आहे. इ. स. पू. १००० च्या सुमारास या दोन देशांत सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. या सांस्कृतिक संबंधात लिपीचे स्थान विशेष महत्त्वाचे होते. ख्रिस्तोत्तर तिसऱ्या-चौथ्या शतकांच्या सुमारास जपानने ⇨ चिनी लिपीचा अंगीकार केला; परंतु त्यामुळे जपानमध्ये अनेक समस्याही निर्माण झाल्या. चिनी भाषा एकावयवी असल्यामुळे तीत व्याकरणामुळे निर्माण झालेले शब्द नाहीत. उलटपक्षी जपानी भाषेत शब्दांचे अनेक अवयव असल्यामुळे भाषा आणि खुणा यांची सांगड घालणे अवघड होऊन बसले. जपानी लोकांनी चिनी खुणा चीनमधील निरनिराळ्या भागांतून उचलल्या. चिनी उच्चार प्रांतपरत्वे भिन्न असल्यामुळे जपानमध्ये त्या खुणांचे उच्चार निराळेच झाले. उदा., ‘पर्वत’ या कल्पनेला जपानी भाषेत ‘यम’ म्हणत. पर्वताचे रेखाचित्र म्हणजे चिनी अक्षरांची खूण; त्याचे उच्चारण म्हणजे ‘शन्’ किंवा ‘सन्’. लिपीतील ही खूण व उच्चारण या दोन्हींचा जपानने अंगीकार केला. सुशिक्षित जपानी मनुष्य पर्वताला ‘सन्’ किंवा ‘शन्’ म्हणू लागला. मुळातील ‘यम’ हा शब्द जपानमधील लिपीच्या माध्यमात कधी आलाच नाही. पाचव्या शतकानंतर जपानी लोकांनी चिनी लिपीचा कल्पना आणि उच्चारण ह्या दोन्हींसाठी  स्वीकार केला.

कतकन : आठव्या-नवव्या शतकांत जपानी लिपीची पूर्णावस्था दिसून येते. या वर्णलिपीस ‘कन’ वा ‘कतकन’ असे म्हणत. ग्रंथलेखन, सरकारी लेखनव्यवहार, परदेशी व्यक्तिनामे या प्रकारातील लिपीत लिहीत असत. आठव्या शतकातील किबी नावाच्या विद्वान प्रधानाने ही शोधली. या लिपीस ‘यमतो गाना’ असेही नाव आहे.

हिरगन : साहित्यलेखन आणि व्याकरणातील पदे या लिपीमध्ये लिहिलेली आहेत. नवव्या शतकातील कोबोदीशी (सु. ७७४–सु.८३५) या बौद्ध भिक्षूने या लिपीचा शोध लावला.

कतकन व हिरगन या दोन्ही लिपींमध्ये काही चिनी खुणा त्यांच्या उच्चारांसह आल्या, तर काही वेळा जपानी उच्चार चिनी उच्चारांपेक्षा वेगळे झाले.

आज जपानमध्ये प्रचलित असलेल्या प्रमाणभूत लिपीस ‘कन-मजिरी’ म्हणतात. मूळ चिनी चित्रखूण व जपानी उच्चार दर्शविणारी हिरगन लिपीतील खूण तीत जोडलेली असते. कतकन आणि हिरगन या दोन्ही लिपींत एकूण सत्तेचाळीस खुणा आहेत. त्यांस ‘इरोब’ म्हणतात. ‘न’ या अक्षराची खूण जपानी लिपीत आहे; परंतु तिचा उच्चार करीत नाहीत. आणखीही अशा दोन खुणा जपानीत आहेत. एकूण पन्नास खुणा जपानीत आहेत. ह्या पन्नास खुणांचाच क्रम सर्वसामान्यपणे जपानी शब्दकोशांतून आढळतो. हा क्रम संस्कृत व्याकरणावर आधारित आहे.

हिरगन लिपीमध्ये मात्र एकूण तीनशे खुणा आहेत; तथापि प्रत्यक्ष व्यवहारात आणि छपाईत एकूण शंभरच खुणा प्रचलित आहेत. जपानी लिपीमध्ये कल्पनाचित्रांच्या एकूण चाळीस हजार खुणा आहेत. सुशिक्षित जपानी माणूस सर्वसाधारणपणे दोन हजार खुणा शिकतो. त्यांपैकी बाराशे खुणा तो शाळेत शिकतो. पदवीधर व्यक्तीस सर्वसाधारणपणे सात-आठ हजार खुणा अवगत असतात. केवळ तज्ञ व्यक्तीच जपानीतील अभिजात साहित्य वाचू शकते. आधुनिक युगात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही लिपी बरीच गैरसोयीची आहे. जपानी भाषेतील वाङ्‌मय लॅटिन लिपीत आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन शिक्षणमंडळाने जपानी भाषा लॅटिन लिपीमध्ये आणण्याचे प्रयत्न केले.

जपानी (कतकन व हिरगन) चित्रखुणाजपानी (कतकन व हिरगन) चित्रखुणा

संदर्भ : 1. Chamberlain, B. H. A Practical Introduction to the Study of Japanese Writing, London. 1905.

2. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.

3. Diringer, David, Writing, 1962.

4. Isemonger, N. E. The  Elements of Japanese Writing, London, 1943.

लेखक : शोभना ल. गोखले

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate