तमिळनाडू राज्यातील लोक तमिळ भाषा लिहिण्यासाठी तमिळ लिपीचा उपयोग करतात. देवनागरीप्रमाणे तमिळ लिपीत एकंदर बारा स्वर आहेत; पण देवनागरी लिपीतील अनुस्वार व विसर्ग तमिळ लिपीत नाहीत. तमिळमधील ऱ्हस्व ‘ए’(ॲ) आणि ऱ्हस्व‘ओ’हे स्वर देवनागरी लिपीत नाहीत. तमिळ भाषेत स्वराला‘उयिर् ॲळुतुक्कळ’म्हणतात. व्यंजनाला‘मॅय् ॲळुतुक्कळ’ म्हणतात. ‘क ’ते ‘म’ पर्यंत देवनागरीमध्ये पंचवीस वर्ण आहेत, पण तमिळ लिपीत मात्र फक्त दहाच वर्ण आहेत.‘क’,‘च’,‘ट’,‘त’आणि‘प’याच पाच वर्गांतील फक्त दोन दोन वर्णच तीत आहेत. एक पहिला वर्ण आणि दुसरा अनुनासिक वर्ण. प्रत्येक वर्गातील मधले तीन वर्ण तमिळ लिपीत नाहीत. आवश्यकतेनुसार‘क’,‘ट’,‘त’,‘प’ या वर्णांचा उच्चारच ‘ग’,‘ड’,‘द’ आणि‘ब’ असा करतात. या लिपीत ‘ह’ नाही. ‘श’, ‘ष’ आणि‘स’साठी‘च’हा वर्ण उपयोगात आणतात. तमिळ लिपीत ‘ळ’,‘ऴ’ हे दोन वर्ण आहेत.‘ऱ’चा उच्चार सामान्य‘र’पेक्षा जास्त कठोर आहे. वर्णाखालील टिंब व्यंजनसूचक असून अक्षराच्या डोक्यावरील टिंब हलन्तसूचक असते. तमिळमध्ये जोडाक्षरे नाहीत. उदा., ‘स्त’ हे जोडाक्षर लिहावयाचे असेल तर‘स’च्या डोक्यावर टिंब देतात. त्यामुळे‘स’हे अक्षर हलन्त आहे हे सूचित होते आणि त्या अक्षरासमोरच‘त’हे अक्षर लिहावयाचे, म्हणजे ते जोडाक्षर आहे,असे स्पष्टे होते. या लिपीत एकूण अठरा व्यंजने आहेत. त्यांतील ‘ळ’, ‘ऴ’, ‘ऱ’ आणि‘ण़’ हे चार वर्ण सोडले, तर संस्कृतमधील केवळ चौदाच व्यंजने तीत राहतात. संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिण्यास ही लिपी अपुरी पडल्यामुळे संस्कृत भाषा लिहिण्यासाठी ⇨ग्रंथ लिपीचा अवलंब करण्यात आला.
तमिळ वर्णमालातमिळ वर्णमाला
पल्लव, चोल, पूर्वेकडील चालुक्य तसेच राष्ट्रकूट राजे यांच्या लेखांतून तमिळ लिपीचा आढळ होतो. सातव्या शतकापासून तमिळ लिपीतील लेख आढळतात. पल्लववंशी राजा परमेश्वरवर्मन् याचा कूरम येथे सापडलेला ताम्रपट तसेच नंदिवर्मन् याच्या कशाकूडी आणि उदयेंदिरम् दानपत्रांतील शेवटला मजकूर तमिळ लिपीत लिहिलेला आढळून येतो. कूरम येथील ताम्रपट सातव्या शतकातील असून डॉ. अर्न्स्ट हूल्ट्श याच्याकडे त्याच्या संशोधनाचे श्रेय जाते. या ताम्रपटातील शेवटला बराचसा भाग तमिळ लिपीमध्ये लिहिलेला आहे. या दानपत्रातील तमिळ लिपीची मोडणी तिच्या इतर द्राविडी भगिनींपेक्षा वेगळी आहे. सातव्या शतकातील तमिळ लिपीतील अक्षरांचे ग्रंथ लिपीतील अक्षरांशी साम्य असले, तरी बरीचशी अक्षरे चौथ्या–पाचव्या शतकांतील उत्तरेकडच्या ब्राह्मी लिपीतील अक्षरापासून उत्पन्न झालेली आहेत, असे दिसून येते.
इतर प्रांतांतील लिपींप्रमाणेच तमिळ लिपीत दहाव्या–अकराव्या शतकांत पुष्कळ फरक पडला. या लिपीवर ग्रंथ लिपीचा पुष्कळ प्रभाव पडला. या लिपीतील ‘ट’, ‘प’आणि‘व’या अक्षरांना ग्रंथ लिपीतील अक्षरांचे वळण आहे. अकराव्या शतकापासून‘क’,‘ङ’,‘च’,‘त’आणि‘न’ या अक्षरांच्या डोक्यावरून खाली लंबकासारखे लहान उभे दंड दिसून येऊ लागले. पंधराव्या शतकापासून ‘क’ च्या डाव्या बाजूला पोकळ चौकोन दिसू लागला. पुढे पुढे विरामचिन्ह दुर्मिळ होत गेले; परंतु आता प्रचलित तमिळ लिपीत पुनः त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
संदर्भ : 1. Buhler, G. Indian Palaeography, Calcutta, 1962.
२. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020