অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तिबेटी लिपि

तिबेटी लिपि

तिबेटी भाषा लिहिण्यासाठी तिबेटी लिपीचा उपयोग केला जातो. तिबेटी लिपीच्या उत्पत्तीबाबत दोन मते रूढ आहेत. मध्य तिबेटातील मताप्रमाणे स्रोंग्–चन्–गम्पो या तिबेटच्या राजाने थोन्–मि–संभोत (सु. ६००–सु. ६५०) नावाच्या प्रधानाला लेखनविद्या शिकण्यासाठी भारतात पाठविले. त्याने मगधदेशात लि ब्यिन याच्याकडून लान्त्सा आणि वर्तुल अशा दोन लिपी आत्मसात केल्या. लान्त्सा लिपीपासून द्‌बु–चन (शीर्ष असलेली) व वर्तुल लिपीपासून द्‌बु–मेद (शीर्षहीन) या दोन तिबटी लिपी त्याने शोधून काढल्या (६३९). भारतीय चोवीस व्यंजनांमध्ये सहा तिबेटी व्यंजनांची आणि चार स्वरांची त्याने भर घातली. ए. एच्. फ्रांके आणि होर्न्ले यांना हे मत मान्य नाही. त्यांच्या मते ह्या लिपीचा उगम भारतीय लिपीतून झाला नाही.

पश्चिम तिबेटातील प्रचलित मताप्रमाणे स्रोंग्–चन्–गम्पो या राजाने थोन्–मि–संभोत या प्रधानाला सोळा विद्यार्थी बरोबर देऊन लेखनविद्या शिकण्यासाठी काश्मीरमध्ये पाठविले. लि ब्यिन या ब्राह्मणाने त्यांना लेखनविद्या शिकविली आणि पंडित सेंगे याने त्यांना संस्कृत शिकविले. थोन् मि–संभोत याने तिबेटी भाषेतील उच्चारणासाठी योग्य अशी चोवीस व्यंजने आणि सहा स्वर यांनी युक्त अशी लिपी निर्माण केली.

च्सोम द कोरो याने आपल्या नेस्टर ऑफ तिबेटन स्टडीज या व्याकरणाच्या पुस्तकात लिहिले आहे, की तिबेटी लिपी सातव्या शतकात प्रचलित असलेल्या उत्तर भारतातील गुप्त लिपीपासून निर्माण झाली. या लिपीचा चिनी तुर्कस्तानमध्ये संस्कृत भाषा लिहिण्यासाठी उपयोग करीत. तेथील मठांतच या लिपीमध्ये सुधारणा होत गेल्या. तिला मध्य आशियाई ब्राह्मी म्हणत असत. लडाखमध्ये सहाव्या ते आठव्या शतकांत संस्कृत लिहिण्यासाठी हीच लिपी प्रचलित होती.

तिबेटी लोक दोन तऱ्हेची अक्षरवटिका मानतात. एक भारतीय लिपीपासून उत्पन्न झालेली आणि दुसरी थोन्–मि–संभोत याने शोधून काढलेली. पहिलीचे नाव ‘ग्सल ब्येद’ आणि दुसरीचे नाव ‘रिंस’. तिबेटी लिपीमध्ये अक्षरांचा अनुक्रम भारतीय आहे. फक्त ‘अ’ हे अक्षर तिबेटी लिपीमध्ये शेवटी आहे. तिबेटमधील प्राचीन लिपीला ‘लान्त्सा’ हे नाव आहे. ही लिपी भारतातील दहाव्या शतकातील लिपीशी मिळतीजुळती आहे. या लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षरांतील शिरोमात्रा. याशिवाय अक्षरांतील उभा दंड शेवटी शेपटीप्रमाणे तीत वळलेला असतो. ए. एच्. फ्रांके यांच्या मते तिबेटात १००० मध्ये लान्त्सा ही लिपी प्रचलित होती. तिचे पूर्व भारतातील अक्षरवटिकांशी विशेषतत्वाने साम्य आढळून येते. लान्त्सा लिपीचे नागरी अक्षरांशी जेवढे साम्य आढळून येते, तेवढे शारदा लिपीशी आढळून येत नाही. लान्त्सा लिपी पवित्र मानली जात होती. तीपासून प्रचलित तिबेटी लिपी उत्पन्न झाली. आठव्या शतकानंतर तिबेटी लिपीमध्ये फारसा फरक आढळून येत नाही. प्रचलित द्‌बु–चन या लिपीमध्ये स्वरचिन्ह व्यंजनाला जोडले जाते; परंतु द्‌बु–मेद या लिपीमध्ये ‘उ’ हा स्वरच व्यंजनाला जोडला जातो. कधीकधी व्यंजनांनाही स्वर जोडलेले आढळून येतात.

संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1964.

2. Jansen, Hans, Sign, Symbol and Script, London, 1970.

3. Konow, Sten, Ed. Epigraphia Indica, Vol. XI, Part 6, Calcutta, 1912.

लेखक : शोभना ल. गोखले

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate