एक दक्षिण भारतीय लिपी. तुळू लिपीची उत्पत्ती ⇨ ग्रंथ लिपीपासून उत्पन्न झालेल्या मलयाळम् लिपीपासून झाली. या लिपीचा संस्कृत ग्रंथलेखनासाठी उपयोग करीत असत. द. कॅनरा आणि मलबार या भागांत या लिपीचा प्रसार झाला. भारताचे हे नैर्ऋत्य टोक राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहिल्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रमाणही अर्थातच तेथे कमी होते. आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास या लिपीचा प्रसार या भागात झाला असावा, असा ए. सी. बर्नेलचा तर्क आहे. पश्चिमेकडील ग्रंथ लिपीला ‘चोळग्रंथ’ लिपी म्हणत. या लिपीतच कालमानाने फरक पडत गेला आणि तिचे तुळू लिपीमध्ये रूपांतर झाले. सोळाव्या शतकापर्यंत तुळू आणि मलयाळम् लिपी एकच होत्या. प्रचलित तुळू लिपीत आणि प्राचीन तुळू लिपीत फारसा फरक आढळत नाही. पंधराव्या–सोळाव्या शतकांपासून तुळू लिपीतील हस्तलिखिते सापडतात. मलबारमधील हस्तलिखिते निष्काळजीपणाने वेडीवाकडी लिहिलेली आहेत; या हस्तलिखितांच्या लिपीला ‘आर्य एलुत्तु’ असे नाव होते. द. कॅनरामधील हस्तलिखिते मात्र अधिक सुबक आहेत. तुळू ही बोली आहे; त्यामुळे तिचे स्वतंत्र वाङ्मय नाही. पंधराव्या शतकातील अळूप राजा कुलशेखर चौथा आळुपेंद्र याचे शिलालेख तुळू भाषेत व मलयाळम् लिपीत आहेत.
संदर्भ : Burnell, A. C. Elements of South–Indian Palaeography, London, 1878.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/10/2020