एक प्रसिद्ध भारतीय लिपी. ‘देवनागरी लिपी’ असेही तिचे नाव महाराष्ट्रात विशेष रूढ आहे. दहाव्या शतकाच्या आरंभी अखिल भारतात थोड्याफार फरकाने या लिपीचा अंगीकार केलेला आढळून येतो. आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ‘सिद्धमातृका लिपी’ किंवा ‘कालीकशीर्षक लिपी’ चे हळूहळू नागरी लिपीत रूपांतर होऊ लागले.
उत्तर भारतात अक्षराच्या उभ्या दंडावरील कीलक जाऊन त्या जागी आडवा दंड आला. कधीकधी एकाच वेळी नव्याजुन्या अक्षरांचा मेळही घातलेला आढळून येई. राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद याच्या वणीदिंडोरी (जि. नासिक) आणि राधनपूर (जि. बनासकांठा) येथील ताम्रपटांत अशा तऱ्हेचे मिश्रण आढळून येते. वणीदिंडोरी आणि राधनपूर येथील ताम्रपटांत नागरीचे सर्वांत जुने स्वरूप पहावयास मिळते. परमारवंशीय राजा दुसरा वाक्पतिराजताम्रपटात नागरी लिपी आढळून येते. गुर्जरवंशीय राजताम्रपटांवरील राज्यांच्या सह्या नागरी लिपीत आहेत. संपूर्ण ताम्रपट दाक्षिणात्य ब्राह्मी लिपीत असले, तरीही सही मात्र नागरीत, असे वैशिष्ट्य दिसून येते. गुर्जरवंशीय राजा तिसरा जयभट याच्या ताम्रपटांत ‘स्वहस्तो मम श्रीजयभटस्य’ ही शेवटली अक्षरे नागरी लिपीत आहेत. आठव्या शतकातील राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्या सामानगढ-दानपत्रात तसेच शिलाहार राजे पुल्लशक्ती व दुसरा कपर्दिन यांच्या लेखांतून नागरीचे जुने दाक्षिणात्य स्वरूप दिसून येते. इ. स. आठशे ते अकराशे या दरम्यानच्या काळातील उत्तरेकडील नागरी लिपी दक्षिणेकडील नागरीपेक्षा भिन्न होती. उत्तरेकडील नागरी लिपीतील अक्षरांचे उभे दंड उडवीकडे शेपटीसारखे वळलेले असत. दक्षिणेतील अक्षरांचे स्वरूप खडबडीत होते. ही लिपी यादवांच्या आणि शिलाहारांच्या शिलालेखांतून व ताम्रपटांतून आढळते. नागरी लिपींतील लेख मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि बेळगावपर्यंत सापडतात. विजयानगरच्या राजांनीही या लिपीचा अंगीकार केलेला आढळून येतो. महाराष्ट्रात या लिपीला ‘देवनागरी’ किंवा ‘बाळबोध लिपी’ हे नाव पडले आणि दक्षिणेकडे याच लिपीला ‘नंदिनागरी’ हे नामाभिधान प्राप्त झाले.
महोदयचा राजा विनायकपाल याच्या ७९४ मधील ताम्रपटात नागरी लिपी आढळून येते. अकराव्या शतकात मध्य भारतात सर्वत्र नागरी लिपीचाच प्रसार झाल्याचे आढळून येते. मध्य भारतातील ९६८ मधील सियाडोनी येथील लेखांत हीच लिपी दिसून येते. दहाव्या शतकाच्या अखेरीच्या गुजरातमधील पहिल्या चालुक्य राजाच्या ताम्रपटांतून उत्तरेकडील नागरी लिपी आढळून येते. गढवालचा राष्ट्रकूटराजा मदनपाल, माळव्याचे परमार, चंदेरीचे चंदेल्ल, त्रिपुरीचे कलचुरी ह्या राजांच्या ताम्रपटांतून आणि शिलालेखांतून उत्तरेकडील नागरी लिपीच्या विविध प्रकारच्या धाटण्या आढळून येतात. आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात या लिपीमध्ये पुष्कळ स्थित्यंतरे झाली. ए, घ, च, थ, ध, प, ब, म, य, ल, व, श, स या अक्षरांत पुष्कळ बदल घडून आला. अक्षरांना लहानमोठ्या शेपट्या आल्या, अक्षरातील उजवीकडील झुकलेले दंड उभे झाले. अ, आ, घ, प, फ, म, य इ. अक्षरांच्या डोक्यावर रेघा आल्या. ब्यूलर याने आपल्या लिपिशास्त्राच्या पुस्तकात प्रत्येक अक्षर दशकालमानाप्रमाणे कसकसे बदलत गेले, याचे मोठ्या बारकाव्याने विवेचन केले आहे.
गुजरात, राजपुताना आणि नेपाळमध्ये ताडपत्रांवर लिहिलेल्या पोथ्या सापडल्या आहेत. त्यांचा काळ साधारणपणे दहावे ते अकरावे शतक आहे. या पोथ्यांतून उत्तरेकडील नागरी लिपी आढळून येते. नेपाळी हस्तलिखितांतील नागरी लिपी जास्त जुनी वाटते. सध्या नागरी लिपीचा अवलंब मराठी आणि हिंदी भाषांनी केलेला आहे. हिंदीतील नुक्ता मात्रा मराठीत नाही.
संदर्भ : 1. Buhler, Georg, Indian Paleography, Calcutta, 1962.
2. Shaneasastri, R. The Origin of the Devanagari Alphabets, Banaras, 1973.
३. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
लेखक : शोभना ल. गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/4/2020