यूरोपातील रशियाच्या उत्तरेला आणि पूर्वेला बोलली जाणारी फिनिश भाषा ही उराल-आल्ताइक कुटुंबाच्या उरालिक किंवा फिनो-उग्रिक शाखेची महत्त्वाची भाषा आहे. फिनिशचे दोन वर्ग आहेत. पहिल्यात सुओमी किंवा फिनलंडची फिनिश, एस्त (एस्तोनियन) व लीव या बोली येतात, तर दुसऱ्यात कारेलियन, वेप्स व वोत या येतात. यांपैकी फिनिश बोलणारांची संख्या सर्वांत अधिक असून १९३५ मध्ये ती ३४,००,००० होती. यांतले काही रशिया, नॉर्वे व स्वीडन देशांत होते, तर देशांतर केलेले २,५०,००० अमेरिकेत आणि काही थोडे ऑस्ट्रेलियात होते. याच काळात इतर भाषिकांची संख्या पुढीलप्रमाणे होती : एस्त १०,००,०००; लीव १,५००; कारेलियन ३,००,०००; वेप्स ३०,०००; वोत ५००.
सुओमीचे लिखित रूप सोळाव्या शतकापासून आढळते. ल्यूथर पंथीय बिशप मीकाएल आग्रिकोला याने सु. १५४२ ते १५४८ च्या दरम्यान तयार केलेली अंकलिपी आणि बायबलचे भाषांतर यांच्यामुळे ती रूढ झाली. ही भाषा पुढे फिनलंडची राज्याभाषा बनली व तिने स्वीडिशसारख्या भाषांचे वर्चस्व नाहीसे केले. ती अनेक बोलींच्या संयोगाने बनलेली असून प्रारंभी तिच्यात पश्चिमेकडील बोलींचा वरचष्मा होता; पण पुढे पूर्वेकडील बोलींचा प्रभावही तिच्यावर पडला.
ध्वनिविचार : फिनिश भाषा लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते. मात्र काही स्वरांचे उच्चार दाखविण्यासाठी ती विशिष्ट चिन्हांचा उपयोग करते. ही लिपी याप्रमाणे आहे (अक्षराखाली देवनागरीत उच्चार) :
a |
e |
h |
i |
j |
k |
l |
m |
n |
o |
p |
आ |
ए |
ख |
इ |
य |
क |
ल |
म |
न |
ओ |
प |
r |
s |
t |
u |
v |
y |
ä |
ö |
b |
c |
|
र |
स |
त |
उ |
व |
ई |
ए |
ऍ |
ब |
स,क |
|
d |
f |
g |
q |
x |
z |
|
|
å - |
|
|
द |
फ |
ग |
कू |
क्स |
स,त्स |
|
|
ऑ- |
|
|
b पासून å पर्यंतची अक्षरे फक्त परकीय शब्दांत किंवा नावांतच सापडतात. दीर्घ स्वर हा स्वराचे अक्षर दोनदा वापरून दाखवला जातो : i इ-ii ई, u उ- uu ऊ इत्यादी. आघात सामान्यतः पहिल्या स्वरावर असतो.
व्याकरण : नाम : फिनिशमध्ये लिंगभेद नाही. वचने दोन आहेत. विभक्ती पंधरा आहेत. मराठीतील शब्दयोगी अव्ययाप्रमाणे नामाला विभक्तिप्रत्यय लावून त्याचे वाक्यातले कार्य निश्चित होते. उदा., पू ‘झाड’ याची पुढील रूपे होतात : (एकवचन) (प्रथमा) पू, (अंशवाचक) पूता, (षष्ठी) पून, (आतल्याआत) पूस्सा, (प्रारंभदर्शक) पूस्ता, (बाहेरून आत) पूहुन्, (वर,-ने) पूल्ला, (अपादान) पूल्ता, (-ला) पूल्ले, (शिवाय) पूत्ता, (बाजूने) पूत्से, (परिवर्तन) पुक्सि, (-सारखा) पूना, (-मिळून, बरोबर) पूने, (साधनदर्शक) पून्. अनेकवचनी प्रथमेला त् हा प्रत्यय लागतो. इतर काही प्रत्ययांपूर्वी पू ऐवजी पु हे रूप होते.
विशेषणाची नामाप्रमाणेच विभक्तिरूपे होतात. तुलनादर्शक प्रत्यय म्पा (म्पे) आणि श्रेष्ठत्वदर्शक इम्पा (इम्पे) आहे.
सर्वनाम : पुरूषवाचक : मिने ‘ मी ’-मे ‘आम्ही ’, -सिने ‘तू ’- ते ‘तुम्ही ’, खेन्‘ तो, ती, ते’ - खे ‘ते, त्या, ती’. सर्वनामे नामाप्रमाणेच चालतात. त्यांचे स्वामित्वदर्शक रूप नामाला प्रत्ययासारखे लावले जाते : पूनि ‘माझे झाड ’.
दर्शक : नेमे ‘हा , ही, हे ’- नेमेत् ‘हे, ह्या, ही ’; तुओ ‘तो, ती, ते’ -नुओत् ‘ते, त्या, ती ’. प्रश्नवाचक : कुका, केन् ‘कोण ’, मिके ‘काय ’, कुम्पि ‘कोणता’. संबंधदर्शक : योका ‘जो ...तो ’.
क्रियापद : क्रियापदात तीन पुरूष, दोन प्रयोग (कर्तरि, कर्मणि), दोन रचना (सकर्मक, अकर्मक), चार काळ (वर्तमान, अपूर्णभूत, भूत, पूर्णभूत) आहेत. भविष्यकाळासाठी वर्तमानकाळाचीच रूपे वापरली जातात. रूपावलीत विध्यर्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, क्रियावाचक नाम, क्रियावाचक विशेषण, इच्छार्थ व अनुज्ञार्थ असे सात प्रकार आहेत. क्रियापदापूर्वी एक नकारार्थी क्रियारूप वापरून नकारार्थी क्रियापद मिळते. सा ‘प्राप्त हो ’ या धातूची वर्तमान काळाची रूपे पुढीलप्रमाणे : प्र. पु. सान्-सामे, द्वि.पु. सात्-सात्ते, तृ. पु. सा-सावात्; (नकारार्थी) एन् सा-एम्मे सा, एत् सा-एत्ते सा, एइ सा-एइवेत् सा.
संदर्भ : 1. Cohen, Marcel; Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.
2. Pei, Mario A. The World's Chief Languages, London, 1954.
लेखक : ना. गो. कालेलकर
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020