माणसाच्या विचारांच्या देवणघेवाणीचे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम लिपी आहे. या माध्यमाचा इतिहास, त्याचा विकास म्हणजे माणसाच्या प्रगतीचा चढता आलेख, माणसाने आपले विचार चित्ररूपाने प्रथम प्रगट केल्याचे दिसून येते. युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका या देशांत गुंफांमधून प्रागैतिहासिक काळातील चित्रांचे पुरावे सापडले आहेत. भारतातही भीमबेटका (मध्य प्रदेश) या ठिकाणी गुंफांमधून प्रागैतिहासिक काळातील चित्रे आढळली आहेत; परंतु त्या चित्रांना ⇨ चित्रलिपी मात्र म्हणता येणार नाही.
खऱ्या अर्थाने भारतातील चित्रलिपी म्हणजे ⇨ मोहें-जो-दडो लिपि. पाकिस्तानातील लार्कान जिल्ह्यातील मोहें-जो-दडो येथे १९२१-२२ मध्ये सर जॉन मार्शल यांनी उत्खनन केले. या उत्खननात चित्रलिपी असलेल्या शेकडो मुद्रा सापडल्या. या मुद्रा ‘स्टिटाईट फिआन्स’ या प्रकारच्या दगडाच्या आहेत. त्यावर पशु-पक्षी, मानवाकृती इ. नानाविध खुणा आहेत. त्यांचा वाचून अर्थ लावण्याचा निरनिराळ्या संशोधकानी पूर्वी त्यांच्या वाचनाचा प्रयत्न केला; परंतु त्या लिपीचे समाधानकारक वाचन अद्याप झाले नाही. ब्राह्मी व खरोष्ठी लिपिंचे वाचन ज्याप्रमाणे द्वैभाषिक नाण्यामुळे शक्य झाले, त्याप्रमाणे मोहें-जो-दडो लिपीसमवेत कोणतीही ज्ञात लिपी सापडल्याशिवाय त्या लिपीचे वाचन शक्य होणार नाही, असे अभ्यासकांनी प्रतिपादन केले आहे. अलीकडे महादेवन यांनी संगणकाच्या (कॉम्प्यूटर) साहाय्याने मोहें-जो-दडो लिपीचे वर्गीकरण केले आहे. एस्, आर्. राव यांनी या लिपीचा सेमिटिक लिपीशी संबंध जोडून वैदिक नावे वाचली आहेत. त्यांचे डिसायफरमेंट ऑफ इंडस स्क्रिप्ट हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मोहें-जो-दडो संस्कृतीच्या म्हणजेच ⇨सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर भारतात दोन हजार वर्षांनी मौर्य सम्राट अशोकाचे ब्राह्मी लिपीतील विपुल लेख आढळतात. या मधल्या काळातील लेखनाचे फारसे पुरावे अद्याप सापडले नाहीत.
ऋग्वेदामध्ये ‘लेखन’ या शब्दाचा कुठेही उल्लेख नसल्याने सर्व वाङ्मय लिपीच्या शोधापूर्वीच ऋचाबद्ध झाले असावे, असा काही संशोधकांचा कयास होता. गौरीशंकर ओझा यांनी वैदिक वाङ्मयातील छंदःशास्त्राचे तसेच व्याकरणविषयक पुरावे सादर करून दोन्ही शास्त्रांतील प्रगती लेखनविद्येशिवाय शक्य नसल्याचे सांगितले. ऋक्, यजु व अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीय, मैत्रायणी व काठक संहिता यांमध्ये छंद व त्यांच्या पादांच्या वर्णसंख्या दिल्या आहेत. ओझा यांच्या मते छंदःशास्त्रातील प्रगती तसेय आरण्यके, ब्राह्मणे आणि तैत्तिरीय संहिता यांमधील स्वर, व्यंजने, घोष, संधी, एकवचन, बहुवचन, लिंग इ. पारिभाषिक शब्द हे भाषेची उन्नतावस्था दर्शवितात. भाषेची उन्नतावस्था आणि लेखनकला या दोन गोष्टींचा फार निकटचा संबंध आहे, असे गौरीशंकर ओझा यांचे म्हणणे आहे.
लेखनविद्येचा निर्माता साक्षात ब्रह्मदेव होता अशी समजूत रूढ आहे. ही कल्पना जैनांच्या सभवायांगसूत्र (इ. स. पू. सु. ३००) आणि पण्णावणासूत्र (इ. स. पू. सु. १६८) यांमध्ये आढळून येते. जैनांच्या नष्ट झालेल्या दृष्टिवाद या ग्रंथाचा जो थोडा भाग उपलब्ध आहे, त्यामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये ४६ अक्षरे असल्याचे नमूद केले आहे.
पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये ‘लिपी’, ‘लिपीकर’, ‘यवनानी’ हे शब्द आले आहेत. यवनानी म्हणजे ग्रीक लोकांची लिपी. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात लेखनविषयकपुरावे आहेत. उदा., ‘वृत्त-चौलकर्मा लिपि संख्यानं चोपयुञ्जीत’ (१.५.२) म्हणजे मुलाचे चौलकर्म झाल्यावर त्यास लिपी आणि पाढे शिकवावेत.
बौद्ध वाङ्मयातही लिपीविषयक पुरावे आहेत. विनयपिटकामध्ये बौद्ध साधूंचे आचारनियम सांगितले आहेत; त्यामध्ये लेखनकलेचे पुष्कळ पुरावे आहेत. ‘लेखा’ व ‘लेखक’ हे दोन्ही शब्द मिक्सयुपाचित्य (२-२) आणि भिक्खुणिपाचित्य (४९.२) या ग्रंथांत आले आहेत. ललितविस्तर या ग्रंथात गौतम बुद्ध पाठ शाळेमध्ये विश्वामित्र नावाच्या गुरूजवळ चंदनाच्या पाटीवर सोन्याच्या लेखणीने लिहावयास शिकला, असे सांगितले आहे.
वैदिक, जैन आणि बौद्ध वाङ्मयात लेखनविषयक पुरावे असले, तरी ब्राह्मी लिपीचे पुरावे अशोकाच्या पूर्वीचे (इ. स. पू. ३२०) १८८५ पूर्वी सापडले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. ⇨योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते. इ. स. पू. पाचव्या शतकात भारतीयांचा पर्शियन व ग्रीक संस्कृतींशी संबंध आला, त्याच वेळी भारतीयांनी लिपीचे तंत्र आत्मसात केले असावे. ब्यूलर यांच्या मते भारतीय पंडितांनी ⇨सेमिटिक लिपीपासून ब्राह्मी ही अक्षरलिपी घेतली असली, तरी भाषेच्या भारतीय आवश्यकतेनुसार त्या लिपीमध्ये योग्य ते बदल केले आहेत. उदा., (१) अ, आ, इ, ई, उ या स्वरांसाठी वेगळ्या अक्षरखुणा, (२) व्यंजनांतर्गत ‘अ’ चे अस्तित्व आणि अन्य स्वरांसाठी वेगळ्या खुणा, (३) जोडाक्षराची कल्पना.
लेखनतंत्राबाबत असे म्हणता येईल, की भारतीय लोकांनी लेखन ‘चिरस्थित’ कसे होईल याकडे विशेष लक्ष दिले होते. सम्राट अशोकानेही लेख नष्ट होऊ नयेत यासाठी ‘चिरस्थित’ हाच शब्द योजला आहे. लेख शिलास्तंभावर, शिलाफलकावर लिहिले आहेत. शिलाफलकाशिवाय ताम्रपत्र, भूर्जपत्र, ताडपत्र, सुवर्ण, रूपे, कांस्य, पितळ यांचे पत्रे इत्यादींचा लेखनसाहित्य म्हणून वापर केलेला दिसून येतो.
ब्राह्मी लिपीसमवेत भारताच्या वायव्य भागात ⇨खरोष्टी लिपी प्रचलित होती. या लिपीचे नाव अन्वर्थक आहे. ‘जरथुश्त्री’चा अपभ्रंश असलेली ही लिपी नॉर्थ सेमिटिक लिपीपासून निर्माण झालेल्या ⇨अॅरेमाइक लिपीपासून उत्पन्न झाली. ती उजवीकडून डावीकडे लिहीत. वायव्य सरहद्द प्रांतातील अशोकाचे लेख खरोष्ठी लिपीत आहेत. कोणत्याही भाषेतील उच्चारवैचित्र्य अक्षरांकित करण्याचे सामर्थ्य या लिपीमध्ये होते. कुशाणांच्या राजवटीतील खरोष्ठीचे लेख मथुरेला सापडले आहेत. खरोष्ठी लिपी क्षत्रपांच्या नाण्यांवर तसेच क्षहरात, नहपानाच्या नाण्यांवर आढळून येते. हुणांच्या पाडावानंतर खरोष्ठीचा भारतात मागमूस राहिला नाही. स्टेन कॉनॉव्ह यांनी खरोष्ठीतील लेख कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (खंड २, भाग १) या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत.
ब्राह्मी लिपी अशोकाच्या लेखात ठरीव साच्याची असली, तरी देशकालानुरूप तिच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. अक्षरांची उंची, जाडी, वेलांट्या, अर्कुल्या या साऱ्या गोष्टी त्या काळाचे आणि देशविशेषांचे प्रतिनिधित्व करतात. कुशाण-गुप्त काळातील लिपी, वाकाटकांची पेटिकाशीर्षक लिपी, इक्ष्वाकू राजांची लांब आकडा असलेली लिपी इ. लिपी उदाहरणादाखल देता येतील. [⟶ब्राह्मी लिपि].
आठव्या शतकापासून हळूहळू ⇨नागरी लिपि शैली अस्तित्वात येऊ लागली. राष्ट्रकूट राजे दंतिदुर्ग व तृतीय गोविंद यांच्या सामानगड तसेच वणीदिंडोरी व राधनपूर ताम्रपटांत नागरीचे सर्वांत जुने स्वरूप पहावयास सापडते. गुर्जरवंशी राजांच्या ताम्रपटांतून राजांची नावे नागरी लिपीत आहेत. गुर्जरवंशी राजा तिसरा जयभट याच्या ताम्रपटात ‘स्वहस्तो मम श्रीजयभटस्य’ ही शेवटची अक्षरे नागरी लिपीत आहेत. ही लिपी यादव आणि शिलाहार वंशांच्या शिलालेखांतून आणि ताम्रपटांतून आढळते. विजयानगरच्या राजांनीही या लिपीच्या अंगीकार केलेला आढळून येतो. उत्तरेकडील नागरी लिपीतील अक्षरांचे उभे दंड उजवीकडे शेपटासारखे वळलेले असत. त्या मानाने दक्षिणेकडील नागरी लिपीचे स्वरूप खडबडीत होते.
शिलालेख आणि ताम्रपट यांमधून मिळणारी माहिती सर्वांत विश्वसनीय ऐतिहासिक पुरावा म्हणून गणली जाते. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी फाहियान आणि यूआन च्वांग यांची प्रवासवर्णने डोळ्यापुढे ठेवून सबंध उत्तर हिंदुस्थान पालथा घातला. ‘ऑर्किऑलॉजिकल सर्व्हे रिपोर्टस्’मध्ये शिलालेखांची आणि ताम्रपटांची त्यांनी माहिती दिली. १८७७ मध्ये कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (भाग १) या ग्रंथात अशोकाच्या सर्व ब्राह्मी आणि खरोष्ठी लेखांच्या यथादृष्ट प्रती दिल्या. १९०२ मध्ये सर जॉन मार्शल पुरातत्त्वविभागाचे महासंचालक झाल्यावर भारताचे पाच विभाग पाडण्यात आले. प्रत्येक विभागात पुरातत्त्वविभागाचे स्वतंत्र कार्यालय असल्यामुळे देशाच्या निरनिराळ्या भागांत शिलालेखांची आणि ताम्रपटांची कसोशीने पाहणी व नोदणी होऊ लागली. संशोधनाला वाहिलेली निरनिराळी नियतकालिके प्रसिद्ध झाली. एशियाटिक रिसर्चेस (१७८४), इंडियन अॅटिक्वेरी (१८७२) याशिवाय जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी लंडन, बाँबे ब्रँच रॉयल एशियाटिक सोसायटी ही नियतकालिके निघाली. त्यामध्ये ब्यूलर, जेम्स बर्जेस, अर्न्स्ट हूल्टश, कीलहोर्न, भाऊ दाजी, भगवानलाल इंद्रजी इ. संशोधकांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले.
लिपिशास्त्रज्ञ म्हणून १८८३ मध्ये ⇨जॉन फेथफुल फ्लीट यांची तीन वर्षांसाठी नेमणूक झाली. त्यांनी गुप्त आणि गुप्तकालीन राजांच्या ताम्रपटांचे आणि शिलालेखांचे संकलन कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (भाग ३) या ग्रंथात केले आहे. त्यानंतर जेम्स बर्जेस यांची नेमणूक झाली. त्यांनी राष्ट्रकूट, पल्लव, होयसळ राजांचे लेख गोळा केले. १८८८ मध्ये एपिग्राफिया इंडिका हे नियतकालिक काढून दोन वर्षांत आठ भाग प्रसिद्ध केले. १८८६ ते १९०३ या कालखंडात ⇨अर्न्स्ट हूल्ट्श हे मद्रासला लिपिशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. त्यांनी १८९० मध्ये साऊथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९२५ मध्ये कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (भाग १) हा ग्रंथ पुन्हा संपादित केला. 1874 मध्ये ए.सी. बर्नेल यांनी साऊथ इंडीयन पॉलिओग्राफी हा ग्रंथ प्रसिद्ध केला.१८८५ मध्ये ब्यूलर यांचा इंडियन पॅलिओग्राफी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. शिवराममूर्ती यांनी इंडियन एपिग्राफी अँड इंडियन स्क्रिप्ट हा ग्रंथ १९५२ मध्ये प्रसिद्ध केला. अहमद हसन दानी यांनी इंडियन पॅलिओग्राफी हा ग्रंथ १९६३ मध्ये प्रसिद्ध केला. अक्षरांचे वळण, वेलांट्या, लेखनपद्धती संस्कृतिनिदर्शक आणि कालनिदर्शक आहेत, हे त्यांनी नव्याने, साधार दाखवून दिले. कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (भाग ४ आणि ५) या ग्रंथाचे संपादन वा. वि. मिराशी यांनी केले. चौथ्या भागात कलचुरी संवतामध्ये लिहिलेल्या शिलालेखांचे आणि ताम्रपटांचे तसेच पाचव्या भागात वाकाटक राजांच्या लेखांचे संपादन त्यांनी केले आहे. भारहुत येथील ब्राह्मी लेखांचे ल्यूड्यर्स यांनी संपादन केले. परंतु दुसऱ्या महायुद्धात त्यांचे निधन झाले आणि बाँबहल्ल्यात त्यांच्या कागदपत्रांची वाताहत झाली. ल्यूड्यर्स यांचे विद्यार्थी वाल्डश्मिट् यांनी म. अ. मेहेंदळे यांच्या मदतीने ते पुन्हा ग्रथित केले. तो ग्रंथ कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् (खंड २, भाग २) नावाने १९६६ साली प्रसिद्ध झाला. दिनेशचंद्र सरकार यांनी इंडियन एपिग्राफी हा ग्रंथ १९६५ मध्ये प्रसिद्ध केला. ताम्रशिलाशासनांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास हा एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून महत्त्वाचा आहे.
लिपींच्या संशोधनासाठी लेखांची सूची अतिशय महत्त्वाची असते. कीलहोर्न यांनी दक्षिण भारतातील पाचव्या शतकापासून उपलब्ध असलेल्या लेखांची यादी एपिग्राफिया इंडिका या नियतकालिकात प्रसिद्ध केली. १९१० मध्ये ल्यूड्यर्स यांनी सर्व ब्राह्मी लेखांची यादी एपिग्राफिया इंडिका (भाग १०) मध्ये प्रसिद्ध केली. देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांनी उत्तर हिंदुस्थानातील इ. स. २०० पासून ज्ञात असलेल्या लेखांची सूची १९३५ मध्ये प्रसिद्ध केली.
ब्राह्मी लिपी आणि तिच्यामधून उत्पन्न होणाऱ्या लिपींचा आणि त्यांच्या अभ्यासाचा हा संक्षिप्त आढावा आहे. प्रादेशिक लिपींचा उगम आणि त्यांचा अभ्यास हा एक वेगळाच विषय आहे. छापण्याची कला येईतो लिपीचे शास्त्र वळणावर अवलंबून होते. उ. भारतात देवनागरी, गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बंगाली लिपी लोकप्रिय झाल्या, तर दक्षिण भारतात कन्नड, तमिळ, तुळू इ. लिपी अस्तित्वात आल्या. देवनागरी लिपी उत्तर भारतात लोकप्रिय आहे; परंतु दाक्षिणात्य लिपी तिच्याहून बऱ्याच निराळ्या आहेत. त्यामुळे सर्व भारतासाठी एक लिपी तत्त्वतः योग्य वाटत असली, तरी भारतासारख्या खंडप्राय देशात तिचे स्वागत व रुजवण कशी होईल, हे सांगणे अवघड आहे.
संदर्भ : 1. Buhler, Georg, Indian Paleography, Calcutta, 1962.
2. Dani, A. H. Indian Paleography, Oxford, 1963.
3. Diringer, David, Writing, London, 1962.
4. Jensen, Hans, Sign, Symbol and Script, London, 1970.
5. Sarkar, Dinesh Chandra, Indian Epigaphy, Delhi, 1965.
६. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
लेखक : शोभना ल.गोखले
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/4/2020