অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी (नागरी) वर्णमाला

मराठी (नागरी) वर्णमाला

मराठी भाषा महाराष्ट्रात प्रचलित असल्यामुळे मराठी लेख सामान्यत: महाराष्ट्रात सापडतात. हे मराठी लेख सर्वसामान्यपणे नागरी म्हणजे देवनागरी लिपीतच आढळतात. मराठी भाषेच्या मोडणीनुसार नागरी लिपीमध्ये फरक पडला. या नागरी लिपीची धाटणी ही कालानुक्रमे बदलत गेली. मराठी लेखांची लिपी नागरी असल्यामुळे नागरी लिपीचा विचार करतानाच मराठी वर्णमालेचा विचार करावा लागेल. भारतामध्ये नागरी लिपीचा प्रचार सर्वांत जास्त आहे. इ.स.दहाव्या शतकाच्या प्रारंभापासून आजतागायत भारताच्या अनेक भागांत म्हणजे राजस्थान, गुजरात, काठेवाड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार या विभागांत नागरी लिपी प्रचारात होती. दक्षिणेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात नागरी लिपीचे शिलालेख आणि ताम्रपट सापडतात. विजयानगरच्या दानपत्राची लिपी ‘नंदीनागरी’ म्हणून ओळखली जाते.

नागरी लिपीचे प्राचीन स्वरूप सामानगड लेख (शके ६७५, इ.स. ७५३), राष्ट्रकूटांचा नेसरी ताम्रपट (शके ७२७, इ.स. ८०५) आणि खाकुर्डी येथील दंतिदुर्गाचा ताम्रपट (शके ९७८, इ.स. १०५६) यांत आढळून येते; परंतु या सर्व दानपत्रांची भाषा संस्कृत आहे. मराठी भाषा आणि नागरी वर्णमाला यांचा एकसमयावच्छेदे करून विचार करताना आपल्याला गोमटेश्वराच्या शिलालेखाचा प्रथम विचार करावा लागतो. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली ‘श्री चावुण्डराजें करवियलें’ हा मजकूर आहे आणि त्याचा काल अंदाजे शके ९०५ म्हणजे इ.स. ९८३ आहे. मराठी भाषेतील आद्य शिलालेखाचा मान याच शिलालेखाकडे जातो. परंतु ताम्रपटांमध्ये कालोल्लेख स्पष्ट असलेला प्राचीन मराठी लेख म्हणून ‘दिवे-आगर ताम्रपटा’ चाच (शके ९८२, इ.स. १०६०) निदान आज तरी निर्देश करावा लागेल.

नाण्यांबाबत असे दिसते, की कदंबांच्या नाण्यांवर नागरी लिपी आढळते. त्यानंतर शिलाहारांनी पूर्वी चालत आलेली ‘गधिया’ या रुप्याच्या नाण्यांची मागची बाजू घासून शिलाहार राजा सोमेश्वर याने आपली नाणी म्हणून प्रसारात आणली. यादवांची चांदीची नाणी सापडली आहेत. विशेषतः भिल्लम, सिंघणदेव, रामचंद्र, महादेव यांच्या सोन्याच्या आणि रुप्याच्या नाण्यांवर नागरी लिपी दिसून येते. यादवकालीन लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे पृष्ठमात्रा. तीही सिंघणदेवाच्या नाण्यांवर दिसते. विजयानगरचा राजा दुसरा हरिहर (कार. १३७७-१४०४) याच्या नाण्यांवरही नागरी लिपी आढळते.

मराठी (नागरी) वर्णमालेचा विकासदर्शक तक्ता मराठी (नागरी) वर्णमालेचा विकासदर्शक तक्ता

पोथ्यांबाबत असे म्हणता येईल, की सोळाव्या शतकापूर्वीच्या पोथ्या आजतरी उपलब्ध नाहीत. सर्वात जुनी मराठी पोथी वछाहरणाची. तीसुद्धा शके १४५७ (इ.स. १५३५) मध्ये लिहिलेली; म्हणजे सोळाव्या शतकातील आहे.

भारतात अकराव्या शतकामध्ये नागरी लिपी अतिशय लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. देशपरत्वे, भाषिक फरकामुळे तिच्या लेखनपद्धतीत फरक दिसून येतो. मराठी भाषेतील लेखांमध्येही तिच्या शैलीत वैविध्य दिसून येते; ते पुढीलप्रमाणे :

मराठी कोरीव लेखांतील लेखनशैलीबाबत असे दिसते, की श्रवणबेळगोळच्या शिलालेखात पृष्ठमात्रा नसून शिरोमात्राच दिसून येतात. आद्य स्वर नाही. ‘क’ या अक्षराच्या डावीकडे वर्तुळ असून उजव्या बाजूचे टवळे मिळालेले नाही. ‘ स’ ह्या अक्षराचा डावीकडील खालचा पाय उजवीकडील दंडाला जुळलेला आहे. ‘ण्ड’ हा परसवर्णयुक्त आहे. पहिल्या ओळीत ‘जें’ आणि ‘लें’ या अक्षरांवरील अनुस्वार भरीव आहेत; तर दुसर्‍या ओळीत ‘गं’ वरील अनुस्वार पोकळ आहे.

ताम्रपटातील नागरीच्या वैशिष्ट्याचा विचार करता असे दिसते, का नागरी लिपीचे मूळ सामानगड लेखात दिसते; परंतु हा लेख संस्कृत भाषेत असल्यामुळे मराठी लेखनाचा विचार करताना प्रथम दिवे-आगर ताम्रपटाचाच विचार करावा लागेल. या ताम्रपटात ए’ त्रिकोणाने दाखविला आहे. ‘ए’, ‘च’, ‘ण’, ‘ध’, ‘भ’ या अक्षराचे वळण प्राचीन आहे. रफारयुक्त जोडाक्षरातील ‘र’ च्या पुढील व्यंजन द्वित्त करून लिहिण्याची पद्धत दिसते. उदा., ‘माग्गसिर’, ‘सुवर्ण्ण’ इत्यादी (दिवे-आगर १,५).

यानंतरच्या कालातील म्हणजे विशेषत: यादवकालीन शिलालेखांतील लिपीचा अभ्यास करता असे दिसते, की बर्‍याचशा लेखनातील चुका कोरक्याच्या हस्तदोषामुळे झालेल्या आहेत. ‘ख’ ऐवजी ‘ष’ अक्षराची द्विरुक्ती, अक्षर गाळणे या गोष्टी सर्रास दिसून येतात. विसर्गचिन्हातही संदिग्धता आढळून येते. काही वेळा विसर्गचिन्ह हे विसर्गद्योतक आणि विरामद्योतक अशा दोन्हीही प्रकारे आढळते. उदा., मालवभट्टं पासे: ठवियली’, ‘सुवर्ण्ण: दावोदर: पासि ठवियले’ (दिवे – आगर ५, ६).

बहुतेक सर्व मराठी कोरीव लेखांतील अनुस्वार पोकळ शून्याकृती आहेत. अनुच्चारित अनुस्वार अर्धशून्याकृतींनी दाखविण्याची पद्धत होती. उदा., ‘भटानॅ’ (बांदोडे १४), ‘वॉटॉ’ (बांदोडे १६).

स्वरांचा विचार करता असे दिसते, की खोलेश्वर कन्या लक्ष्मी हिच्या शके ११६२ च्या आंबे शिलालेखात ‘इ’ या अक्षराचे प्राचीन स्वरूप पहावयास मिळते.

मराठी कोरीव लेखांतून र्‍हस्वदीर्घविषयक नियमांची अनियमितता दिसते.उदा., ‘अभीमानु’< सं. ‘अभीमानः’ (भांदक ७), ‘वाचीता ‘अभीमानु’ < सं. ‘वाचयिता’ (उन्हक ८).

प्राचीन मराठी कोरीव लेखांतून पृष्ठमात्रा आढळत असली, तरी पृष्ठमात्रा प्राचीनत्वाचे नेहमीच लक्षण असते असे नाही. आंबेजोगाईच्या चार लेखांपैकी दोन लेखांत पृष्ठमात्रा आढळते, तर दोन लेखांत ती आढळत नाही.

व्यंजनांचा विचार करता काही ठिकाणी अक्षरांचे वळण प्राचीनआहे, तर काही ठिकाणी ते बदललेले आढळते. सिंघणदेवाच्या आंबे शिलालेखात (शके सु. १११०) ‘च’, ‘ध’, ‘भ’, ‘र’, ‘ल’ या अक्षरांचे वळण प्राचीन आहे.

काही वेळेला ‘स’ आणि ‘म’ या अक्षरांत फरक करणे कठीण जाते तसेच ‘श’ आणि ‘स’ या अक्षरांतही भेद दिसून येत नाही. उदा., ‘स्त्री’ (आंबे, सिंघणदेव १, ३), ‘महामंडलेस्वर’ (आंबे ३-४).

काही वेळेला व्यंजनांचे अकारण द्वित्तीकरण दिसते. उदा., ‘मार्ग्गसिर’ ‘सुवर्ण्ण’ (दिवे-आगर १,५); परंतु ही परंपरा संस्कृतवरून आलेली आहे यात शंका नाही. उदा., वाकाटकांचे ताम्रपट.

काही वेळी द्वित्त व्यंजनासाठी एकेरी व्यंजन आढळते. उदा., ‘वृति’ < सं. ‘वृत्तिः’ (चांजे ११), ‘दत’<सं. ‘दत्त’ (वेळापूर ११) इत्यादी.

परसवर्णासाठी अनुस्वाराचाही उपयोग दिसून येतो. उदा., ‘संतु’<सं. ‘सन्तु’ (अक्षी १), ‘तर्स्मिकाले’ <सं. ‘तस्मिकाले’ (लोनाड ६).

कोरीव लेखांत काही अक्षरपर्याय दिसून येतात. उदा.,‘ख’< ‘ष’ = ‘प्रमुष’ < ‘प्रमुख’ (रांजली ८), ‘ल’ < ‘ळ’ = ‘ळग्न’< ‘लग्न’ (भांदक ३).

काही ठिकाणी संक्षेप केलेले आढळतात. उदा., ‘सु. गाठ्ठ’ = ‘सुवर्ण गद्याणकाः’ (दिवे-आगर ६), ‘ए’ = ‘एक’ (पैठण ५,९), ‘ना’ = ‘नारिएल’ < सं. ‘नारिकेल’ (कोपराड ९),

कोरीव लेखांतून संख्या अक्षरी किंवा अंकी अशा दोन्ही पद्धतींनी दाखवितात.वरील दोन्ही पद्धतींनी संख्या दाखविल्याचीही काही उदाहरणे सापडतात. ‘सातवीसे सत १२७’ (दिवे-आगर ५,६), ‘दसमी १०’ (भांदक २) इत्यादी. मठगावच्या लेखात संख्या प्रथम आकड्यांनी दाखवून नंतर ‘आख्यरतोपि’ असे म्हणून पुढे अक्षरांनी दाखविली आहे. काही लेखांत संख्यांचे अंश उभ्या रेघांनी दाखविले आहेत. उदा., ‘१ । ’ (कालवार ११), ‘१ ।। ’ , ‘३।।’ (वेळुस १०).

बहुतेक कोरीव लेखांतून विराम चिन्हासाठी उभा दंड किंवा शून्यद्वय असते. लेखाच्या प्रारंभी व अंती ‘छ’ या आकाराचे चिन्ह असते.

कालानुसार अक्षराच्या धाटणीत फरक झालेला दिसला, तरी काही वेळा लेखनपद्धतीचे जुने वळणही आढळते. उदा., विजयानगरच्या पहिल्या संगमदेवरायाच्या बांदोडे लेखात लिपीचे प्राचीनत्व दिसून येते. या लेखात पृष्ठमात्रा नाही ; परंतु काही उत्तरकालीनत्वाच्या द्योतक ठरणार्‍या गोष्टी या लेखात आढळतात. उदा., ‘ल’ आणि ‘ळ’ यांमधील स्पष्ट भेद तसेच ‘स’ आणि ‘श’ यांमध्येही फरक दिसून येतो.

लेखनसाहित्यात बदल झाला तरी पोथ्यांतून अक्षरवैचित्र्य आले नाही. ‘ऋ’ साठी ‘र’, ‘ख’ साठी ‘ष’, द्वित्त इ. गोष्टी कोरीव लेखांप्रमाणेच पोथ्यांतूनही आढळतात.

मराठी भाषा जशी कालानुक्रमे बदलत गेली त्याप्रमाणे लिपीचे स्वरूपही बदलले असले, तरी सामान्यतः अक्षरांची घडण फारशी बदललेली नाही. कोरक्यांच्या वैयक्तिक हस्तलेखनशैलीमुळे तीत थोडेफार फरक झाले आहेत एवढेच.[टीप: कंसातील नावे ही प्राचीन मराठी कोरीव लेख (१९६३) या शं.गो. तुळपुळे संपादित पुस्तकातील कोरीव लेखांची असून त्यापुढील आकडे लेखांतील ओळींचे आहेत.]

संदर्भ: तुळपुळे, शं.गो. संपा. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे, १९६३.

लेखक : शोभना गोखले ;  वासंती जोशी

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate