অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माया लिपि

माया लिपि

कोलंबसने अमेरिका शोधून काढली; तत्पूर्वी तेथे माया नावाचे सुसंस्कृत लोक रहात होते. या लोकांची लिपी ती माया लिपीतील काही मूळ वर्ण आणि त्यांचे सदृश रोमन मराठी वर्ण माया लिपी. ही लिपी केव्हा आणि कुणी प्रवर्तित केली हे अद्याप गूढ आहे. ही चित्रलिपी असून मेक्सिकन लोकांनी माया लोकांकडून लेखनविद्या आत्मसात केली, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे.

आजवर माया लिपीतील एकूण तीन हस्तलिखिते (कोडेक्स) उपलब्ध झाली आहेत; ती अशी : (१) माद्रिद हस्तलिखित : २ भागांत, माया चित्रवर्ण आणि त्यांचे सदृश रोमन व मराठी वर्ण माद्रिद संग्रहालय; (२) ड्रेझ्‌डेन हस्तलिखित : ड्रेझ्‌डेन संग्रहालय आणि (३) पॅरिस हस्तलिखित : पॅरिस संग्रहालय. ह्या तिन्ही हस्तलिखितांची कालनिश्चिती होऊ शकली नाही; त्यांच्या कालासंबंधी अभ्यासकांत खूपच मतभेद आहेत. एवढे निश्चित, की यांतील ड्रेझ्‌डेन हस्तलिखित सर्वांत प्रचीन असून त्याचा काल साधारणपणे इ. स. दहावे ते बारावे शतक असा मानला जातो. हे हस्तलिखित उत्तम स्थितीत असून त्यात खगोलीय, ग्रहज्योतिषविषयक व गणितीय माहिती आली आहे. माद्रिद हस्तलिखितामध्ये कर्मकांड, यातू आणि कुंडलीवरून भविष्य यांबाबतची माहिती आहे. पॅरिस हस्तलिखितामध्ये विषयांचीच माहिती आली आहे; तथापि ह्या हस्तलिखिताची फारच दुर्दशा झाली असून ते आज वापरण्यायोग्य राहिले नाही.

माया चित्रलिपीयुक्त अनेक दगडी स्तंभ मात्र आज उपलब्घ असून त्यांचा काल सर्वसाधारणपणे इ. स. तिसऱ्या शतकाचा उत्तरार्ध किंवा चवथ्या शतकाचा पूर्वार्ध मानला जातो. हे स्तंभ कालनिश्चितीस अत्यंत उपयुक्त ठरले असून त्यांची संख्या जवळजवळ एक हजार एवढी आहे. त्यांवर उठावाच्या चित्राकृती आहेत. याशिवाय यज्ञवेदी, इमारतीच्या भिंती, दरवाज्यांवरील गणेशपट्ट्या, पायऱ्या, चौकटी, दगडी व लाकडी छत, चुनेगच्‍ची बांधकाम, मातीची भांडी, शंख, हाडे, धातूची भांडी, दागिने यांवर माया लिपीतील चित्राकृती आढळून येतात.

या स्तंभांवर दर ५, १०, १५ वर्षांच्या अवधीनंतर गावातील ठळक घटना लिहिलेल्या आढळतात. या लिपीचे स्वरूप ठरीव साच्याचे असून काही वेळा ईजिप्तमधील चित्रलिपीचे व या लिपीचे बाह्यत: साम्य असल्याचे दिसून येते.

ही लिपी अद्याप संपूर्णपणे वाचता आलेली नाही. फक्त काही फालगणनेच्या खुणा आणि काही स्वरचिन्हांचेच वाचन झाले आहे. ही लिपी सु. २५० वर्षांपूर्वी नष्ट झाली; म्हणजे ती सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात होती हे स्पॅनिश पुराव्यावरून दिसून येते. काही स्पॅनिआर्ड लोकांना ती अवगतही होती; परंतु सतराव्या शतकातील माया लिपीचे प्राचीन माया लिपीशी साम्य होते किंवा नाही, हे कळण्यास मार्ग नाही. जे. ई. एस्. टॉमसन यांनी धार्मिक कर्मकांडाविषयी असलेल्या काही लेखांतील कालगणना व बरीचशी अक्षरे वाचता येण्यासारखी असल्याचे दाखवून दिले; परंतु एकूण वाचता येत असलेल्या अक्षरांचे प्रमाण अत्यल्पच आहे. माया लिपी व भाषेचा अभ्यास १८५० मध्ये व्हान पीओ पेरेथ (मृ. १८५९) यांनी सुरू केला. नंतर द्येगो-दे-लंदा, डॅनिएल गॅरिसन ब्रिंटन, जे. टॉमनस गुडमन, एडूआर्ट झेलर, एस्. जी मॉर्ली, एच्. जे. स्पिंडेन, टॉमस जॉइस, जे. ई. एस्. टॉमसन प्रभृतींनी तिचा विविध अंगांनी अभ्यास करून तिच्या वाचनाचे प्रयत्न केले. अलीकडील तिच्या वाचनाचे उल्लेखनीय प्रयत्न अभ्यासकांचे होत. त्यांत १९५२ व १९५५ मधील जे. व्ही. नोरोझोव्ह यांचे प्रयत्न तसेच १९६१ मध्ये नोव्होसिविर्क यांनी संक्रांतिविज्ञानाचा (सायबरर्नेटिक्स) व संगणकाचा वापर करून केलेल्या यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ह्या सर्व प्रयत्नांतूनही आजपर्यंत माया लिपिचे संपूर्ण व सर्वसमंत असे वाचन होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

द्येगो-दे-लंदा हा अमेरिकेतील यूकातानचा धर्मगुरू. माया लिपीतील हस्तलिखितांच्या विनाशास हाच धर्मगुरू कारणाभूत झाला. या धर्मगुरूने Relacion de las cosas de Yucatan हा ग्रंथ १५६५ मध्ये लिहिला. या ग्रंथाचा बराच भाग नष्ट झाला असून त्याचा अवशिष्ट भाग ए. एम्. टोझर यांनी संपादून भाष्य व सूचीसह प्रसिद्ध केला. यामध्ये माया लोकांविषयी सर्व उपलब्ध माहिती दिली आहे. जे. ई. एस्. टॉमसन यांच्या मते माया लिपी ही चित्रलिपी, कल्पना लेखन, उच्‍चारणखुणा, संकेत लिपी या सर्वांचे मिश्रण आहे. माया लोकांनी शून्याचे महत्त्व केव्हाच ओळखले होते आणि १ ते ४ आकडे त्यांनी टिंबांनी दर्शविले होते. हे लोक ५, १०, १५ हे आकडे काठ्या, आडव्या रेषा यांनी, तर २० हा आकडा चंद्राने दर्शवित असत. निश्चित करण्यात आलेला सर्वांत प्राचीन असा माया लिपीतील कालोल्लेख इ. स. ३२० चा, तर सर्वांत नंतरचा कालोल्लेख इ. स. ८८९ चा हे. या दोहोंमधील विविध ठिकाणचे कालोल्लेखही आढळले आहेत.

अॅझेटेकांची लिपी ही माया लिपीचेच अवनत स्वरूप असल्याचे लिपीतज्ञ डिरींजर यांनी म्हटले आहे. माया लिपी ही धर्मगुरू, त्यांचे पुत्र आणि सरदार यांचीच मिरास होती. सृष्टिकर्त्या ईश्वराचा पुत्र इत्झम्‍न याने ही लिपी शोधून काढली अशी माया लोकांची समजूत होती.

संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Volts., London, 1968.

2. Jensen, Hans; Trans. Unwin, George. Sign. Symbol and Script, London, 1970.

3. Thompson, J. E. S. Maya Hieroglyphic Writing, Washington, 1960.

लेखक :  शोभना गोखले

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate