অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हम सभी सबला!

हम सभी सबला!

‘वंचित विकास’ संस्थेच्या माध्यमातून लातूर येथे परित्यक्ता स्त्रियांकरता ‘सबला महिला केंद्र’ नावाने एक केंद्र चालवललं जातं. स्त्रियांना सन्मानाने जगता यावं या ध्यासाने कार्यरत असलेल्या या संस्थेच्या कार्याविषयीचा हा लेख.

स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विशेषत. लहान मुलांच्या शाळांमध्ये ध्वजवंदनाच्या वेळी मुलांना घोषणा द्यायला सांगतात तेव्हा नेहमी ऐकू येणारी एक घोषणा म्हणजे, ‘हम भारत की नारी है, फूल नही चिंगारी है’. या घोषणेप्रमाणेच सगळ्या स्त्रियांनी खरोखर चिंगारी बनण्याची वेळ आता आली आहे.

आपल्या देशामध्ये स्त्रियांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी असली तरी स्त्रीचा दर्जा मात्र दुय्यम आहे. स्वत.च्या घरात तिला किंमत दिली जात नाही. काही मूठभर सुधारक/पुरोगामी पुरुष मंडळी वगळता बहुसंख्य जनता स्त्रियांना हीन-दीन,दुबळी समजते/मानते. आणि त्यानुसारच त्यांना घरात, समाजात वागणूक दिली जाते. मुळात तिचं माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्वच मान्य केले जात नाही. यासाठी शहरी, ग्रामीण दोन्ही भागांमध्ये जागृती करुन समाजाचं मन परिवर्तन करण्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्था त्यासाठी प्रयत्नशील आहेत. हळूहळू का होईना थोडे बदल होताना दिसत आहेत. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी ‘जाणीव’ व ‘वंचित विकास’ संस्थेच्या माध्यमातून चाफेकर सरांनी १९८२ पासून कामाला सुरुवात केली. प्रामुख्याने स्त्रियांसाठीचे कामही सुरु झाले. आजही आपल्या समाजातील स्त्रीचा दर्जा तिच्या वैवाहिक स्थानावर अवलंबून आहे. लग्न झालेल्या आणि जिचा नवरा जिवंत आहे व तिला सांभाळतो तिलाच धार्मिक विधींमध्ये, सणांमध्ये तसेच अन्य ठिकाणी मानाचे स्थान असते. कुमारिका, विधवा, परित्यक्ता स्त्रियांना घरात, समाजात कुठेच मानाचे स्थान नाही.

परित्यक्ता म्हणजे जिला नवर्‍याने सोडून दिलेले आहे अशी स्त्री. कालपर्यंत आवडत होती पण आता आवडत नाही अशी. हुंड्यामध्ये चेन/गाडी/टी.व्ही. इ. वस्तू किंवा पैसा आला नाही या वा कल्पनाही करु शकणार नाही अशा अन्य कारणांसाठी नवरा व इतर सासरची माणसे छळ करतात. नवरा सांभाळत नाही, घराबाहेर काढतो. बर्‍याचदा नवर्‍याचे दुसर्‍या स्त्रीबरोबर (अगदी घरातसुद्धा) संबंध असतात. सासरा, दीर इ. पुरुष नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचारामुळे स्त्रिया सासरी नांदत नाहीत. माहेरी परत येतात. माहेरीही तिला अगतिकतेपोटी रहावे लागते. धड शिक्षण नाही. घरात कष्ट करावे लागतात. भाऊ-भावजयीचे टोमणे ऐकावे लागतात. अशा परत आलेल्या स्त्रीला घरातल्या केरसुणीइतकीही किंमत नसते. मुळात ती जिवंत माणूस आहे याचा विचार सासर- माहेरची माणसे करतच नाहीत. त्यामुळे इतर समाजाबद्दल तर काही बोलायलाच नको.

बाईला या अशा जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात. एकूणच सर्व परिस्थितीमुळे या मुलींचा आत्मविश्वासच नाहीसा होतो. वंचित विकास ही संस्था शरीरविक्रय करणार्‍या स्त्रियांसाठी, त्यांच्या मुलांसाठीही काम करते. हा घटक समाजातील आणि स्त्रियांमधील दुर्बल घटक आहे. त्यांच्यामध्ये काम करताना असे लक्षात आले की या धंद्यात ६६% स्त्रिया या परित्यक्ता आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने या व्यवसायात यावे लागते कारण हातात फारसे शिक्षण नाही, इतर व्यावसायिक कौशल्य नाही. एकूणच परित्यक्ता स्त्रियांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची, त्यांना आधार देण्याची गरज संस्थेला वाटली आणि त्यातूनच परित्यक्ता, विधवा आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रियांसाठी अल्पमुदत निवासी प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. त्याचे नाव आहे ‘सबला महिला केंद्र’. हे नावही प्रशिक्षणार्थींनी दिलयं. केंद्रात प्रशिक्षणासाठी येणार्‍या मुलींचा वयोगट १५ वर्षे ते ३०-३५ वर्षे असा आहे. बर्‍याचदा एखाद-दुसर्‍या मुलीची जबाबदारीही त्यांच्यावर असते. ५ वर्षाच्या आतील मुलाला बरोबर घेऊन प्रशिक्षणासाठी राहण्याची परवानगी केंद्रात आहे. आपलं मूल जवळ आहे म्हटलं की या मुलींचेही प्रशिक्षणात लक्ष लागते.

केंद्राची सुरुवातीपासूनची सर्व जबाबदारी माझी मैत्रीण आणि सहकारी संध्या पाटील हिच्याकडे होती. तुमचं कामच तुमची भूमिका सिद्ध करते असा ठाम विश्वास असणार्‍या संध्याने चाफेकर सरांचा तिच्याबद्दलचा विश्वास सार्थ ठरविला. तारा, पंचशीला, रंजना सारख्या मुलींना केवळ प्रशिक्षितच केले नाही तर उत्तम कार्यकर्त्या म्हणून तयार केले. पाच ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन हळूहळू स्त्रिया खंबीरपणे बाहेर पडायला लागल्या आणि लातूरकरांचाही विश्वास वाढला.

चाफेकर सरांच्या मराठवाड्यातील कामाच्या अनुभवातून असे लक्षात आले की महाराष्ट्रात मराठवाड्यात अशा परित्यक्ता स्त्रियांचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत प्रचंड आहे. मराठवाडा हा दुष्काळी कोरडवाहू भाग आहे. औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्याही मागासलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेने मराठवाड्यात काम करायचे ठरवले. सुरुवातीला १९९३ मध्ये कळंब (जि. उस्मानाबाद) येथे अशा स्त्रियांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र सुरु केले. परंतू काही स्थानिक अडचणींमुळे संस्थेस लातूर येथे केंद्र सुरु करावे लागले. सुरूवातीला काही वर्षे भाडेतत्वाच्या जागेवर केंद्राचे काम सुरु होते. विलास जावडेकर, आशामाई जावडेकर, दत्तात्रय आलेगावकर यांच्यासारख्या दानशूर देणगीदारांच्या सहकार्यातून संस्थेने केंद्रासाठी स्वतंत्र वास्तू उभी केली. आत्तापर्यंत केंद्रातून ४५० स्त्रिया प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत व सन्मानाने जगू लागल्या आहेत.

मुळात स्त्रीवर परित्यक्ता होण्याची वेळ का येते? आपला एकूण समाज हा पुरुषप्रधान आहे. मुलीला लहानाचे मोठे करताना फक्त लग्नासाठी तयार केले जाते. लग्न हा मुलीच्या जीवनातील अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच मुलीला अशी शिकवण दिले जाते की ती जणू फक्त लग्नासाठीच जन्माला आली आहे. नवरा हेच तिच्या आयुष्याचे सर्वस्व. तिने सर्वांचे ऐकले पाहिजे. नवर्‍याने आपल्या बायकोला मारणे व बायकोने निमुटपणे मार खाणे हे जणू तिच कर्तव्य. सासरच्यांनी कितीही त्रास दिला तरी तो सहन करायचा. एकदा लग्न होऊन मुलगी सासरी गेली की तिने मरेपर्यंत तिथेच रहायचे. नवराही तिला स्वत.च्या मालकी हक्काची वस्तू समाजतो. तिचा कंटाळा आला की टाकून देतो.

केंद्रातील घरगुती प्रेमळ वातावरण प्रशिक्षणासाठी येणार्‍या स्त्रियांना दिलासा देतं. त्याचा स्त्रियांवर सकारात्मक परिणाम होतो. वर्षभरात २५ ते ३० स्त्रियांच प्रशिक्षण पूर्ण होतं. इथे त्यांना शिवणकाम, विणकाम, दाई प्रशिक्षण, बकरीपालन इ. प्रशिक्षण दिलं जात. या स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही विविध कृती कार्यक्रम घेतले जातात. आहार, कायदा, बँक, पोस्ट इ. विषयी माहिती दिली जाते. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित स्त्रियांसाठी साक्षरता वर्गही घेतला जातो. केंद्रात त्यांना मोकळेपणाने बोलायला मिळते. खेळ खेळायला मिळतात. गाणी म्हणता येतात. एरवी एवढा मोकळेपणा, प्रेम आणि आपुलकी त्यांना कधी अनुभवायलाच मिळालेली नसते. त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकटीने काही करायला घाबरणार्‍या या मुली पण प्रशिक्षणानंतर धीट होतात. यातील रमा, माया, विजू यांनी तर आपलं पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केलं. तेही आपला नोकरी व मूल सांभाळून. काहीजणी आपापल्या गावात शिवणकामाचा व्यवसाय करतात. हे करत असतानाच त्या स्वत:सारख्या समदु:खी मुलींसाठी काम करतात. त्यांना केंद्राची माहिती देतात. केंद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. काहीजणी गावात अंगणवाडी, बचतगट, महिला मंडळ चालववतात. स्वत.च्या हिंमतीवर व पैशाने कुणी प्लॉट घेऊन घरं बांधली आहेत.

काहीजणी सामाजिक संस्था, हॉस्पिटल, ऑफिसेसमध्ये काम करतात. प्रशिक्षण झाल्यावर काहीजणींच्या नवर्‍यांनी केंद्राच्या प्रयत्नांमुळे त्यांना परत घरी नांदायला नेले आहे. कुणालाही न घाबरता ठामपणे यांच्यामध्येही आत्मनिर्भरता येण्याचे सारे श्रेय विलास चाफेकर, केंद्रातील वातावरण, कार्यकर्ते आणि केंद्राचे लातूरमधील सल्लागार मंडळाचे आहे.

पुनर्वसन म्हणजे नेमकं काय? स्त्री आर्थिकदृष्ट्या तिच्या पायावर उभी राहिली, तिच्या मिळकतीची कायमस्वरुपी हमी निर्माण झाली की तिचे पुनर्वसन झाले असे मानायचे. नवर्‍याकडे कायमचे नांदायला जाणे हेही पुनर्वसनच आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे हे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. म्हणूनच स्त्रिया कमावत्या झाल्या व नवर्‍याकडे जाणे त्यांना शक्य नसेल तर घटस्फोट घेऊन पुर्नविवाह झाला तर तेही पुनर्वसनच असं संस्था मानते.

विवाहितेला परित्यक्ता करणे, विधवेला हीन वागणूक देणे यासाठी कुणालाही वेळ लागत नाही. पण अशा स्त्रियांना आधार देणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे यासाठी लागणारी मानसिकताच पालक व समाजात नाही. आत्तापर्यंत केंद्रातून ४५० स्त्रियांचे प्रशिक्षण होऊन त्यांची आयुषष्ये उभी राहिली आहेत.

समाजात कुणी परित्यक्ता होणारच नाही अशी मानसिकता निर्माण करण्याचा संस्थेचा खरा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच बीड, उस्मानाबाद, वाशी, कळंब - एकूणच सार्‍या मराठवाड्यातील गावागावात जाऊन स्त्री-पुरुष समता या विषयावर विविध माध्यमातून जागृती करण्याचे काम प्रशिक्षित स्त्रियांच्या आणि संवेदनशील सुहृदांच्या मदतीने अखंड सुरु आहे. एक ना एक दिवस निश्चितच असा येईल की सबला महिला केंद्राची किंवा अशा प्रकारच्या कामाची समाजात गरजच उरणार नाही.

मूल्य जाणणारा आणि आचरणात आणण्याची ताकद असणारा सुंदर समाज नक्कीच निर्माण होईल तो आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून. यासाठीच आपणही प्रार्थना करु या -
संस्कृती स्त्री पराशक्ती, स्वर हमारा है |
विश्व है परिवार, भारत घर हमारा है ॥
हम नही है हीन, कहता कौन हमें अबला |
है सबल संस्कृती हमारी हम सभी सबला ॥
ज्योती से झगमग हुआ अंतर हमारा है |
विश्व है परिवार, भारत घर हमारा है ॥
----
सुनीता जोगळेकर
चलभाष : ९४२१९०५०८६

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate