অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिकतेची स्त्री संवेदना- सुचिता बर्वे

सामाजिकतेची स्त्री संवेदना- सुचिता बर्वे

जागतिक महिला दिनानिमित्त्‍ा विशेष लेख : अमरावती जिल्ह्याला स्त्री शक्तीची दीर्घ परंपरा आहे. तपोवनात कुष्ठरुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या दाजीसाहेब पटवर्धन यांच्या पत्नी पार्वतीबाई पटवर्धन असो की पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो…. अलीकडेच लेखिका विद्या बाळ यांचे सावित्रीच्या लेकी हे पुस्तक वाचण्यात आले. या पुस्तकात विद्याताईनी अमरावतीतील एका धडपड्या मुलीबद्दल अत्यंत कौतुकाने लिहीलं… उत्सुकता म्हणुन त्या महिलेची भेट घेतली व ओळख झाली ती सुचिता बर्वेशी. युवकांच्या क्षेत्रात हिरीरीने काम करणारी सुचिता बर्वे गेल्या 16 वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात ठामपणे काम करत आहेत.

आज अॅक्वाव (action for children women and agriculture welfare society) संस्थेच्या माध्यमातुन सुचिता सोबत 3 ते 4 हजार महिला जुळल्या आहेत. समाजसेवेचाच पिंड असल्याने अगदी महाविद्यालयात शिकत असल्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात समुपदेशन केले. मुळची अमरावतीकर असलेल्या सुचिताला समाजाप्रती काहीतरी करण्याची धडपड. मात्र तिची हीच धडपड तिला तिच्या जीवनध्येयापर्यत घेऊन गेली. समाजकार्य, व्याख्यान, प्रवास, शैक्षणिक कार्य, अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात तिने गेल्या 16 वर्षापासुन धडाडीने कार्य केले. रजिया सुलताना ताई सेाबत काम करतांना नकळतच समाजकार्याच्या विधायक ओढीने तीचा प्रवास सुरू झाला.

सामाजिक क्षेत्रातील तिच्या उल्लेखनिय कार्यासाठी तिला 2007-2008 चा राष्ट्रीय युवा पुरस्कार तिला मिळाला. पुरस्काराने काम करण्याचा हुरूप वाढतो व पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीही तेवढीच वाढते असे ती म्हणते. प्रसिध्दीच्या झोतापासुन दुर राहुन काम करणे तिला आवडते. ग्राहक संरक्षण मंच, नमो भगवते शिक्षण संस्था, युवा संस्थेसाठी समुपदेशक, नारी प्रबोधन मंचात कार्यक्रम अधिकारी अश्या विविध सामाजिक संस्थातुन काम करत ती घडली आहे. 2007-2009 दरम्यान ती जिल्ह्याच्या सुरक्षा दक्षता समितीवर काम करत होती. महिला व बालकल्याण अनैतिक व्यापार समितीची सदस्य म्हणुन काम केले. महिलांना निर्णयप्रक्रीयेत स्थान मिळावे यासाठी सुचिता सतत कृतीशील मार्गदर्शन करत असते.

घर दोघांचं या शासन निर्णयांतर्गत घरांच्या नेमप्लेटवर पतीच्या नावासोबत पत्नीचंही नाव असावं याबाबत स्थानिक तलाठ्यांमार्फत तिने अमरावती जिल्ह्यातील गावागावात फिरून काम केले. सुचिताच्या कामाची पायाभरणी ग्रामीण भागात आहे. गेल्या तीन वर्षापासुन अमरावती शहरात काम करते आहे. अचलपूर येथे पण तिच्या संस्थेचे समुपदेशन केद्र आहे. सध्या स्त्री संवेदना मंच मार्फत स्नेहा या संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या MAS म्हणजे महिला आरोग्य सेवा अमरावती शहर मनपा अंतर्गत प्रकल्पावर लक्ष केद्रीत करुन काम करत आहे. तिच्या मदतीला चार अन्य महिला सक्षमीकरण समुपदेशन यासोबतच महिलांना मानवतावादी वागणूक देऊन समानतेचा पुरस्कार करणाऱ्या पुरूषांना ती पुरस्कार देते. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात ती चांगल्या कार्यक्रमाद्वारे करते या पुरस्कारामध्ये विजय चव्हाण, बॉक्सर मेरी कोमला घडविणारे तिचे प्रशिक्षक गोपाल देवांग यांना तीने पुरस्कृत केले आहे.

त्यामध्ये महिलांना सन्मानपुर्वक वागणूक देण्याची जबाबदारी या पुरस्काराने वाढली असल्याचे उदगार अभिनेते विजय चव्हाण यांनी काढले. सुचिताने स्त्रीयाविषयी विविधांगाने लिखाण केले आहे व सध्या ही ती करत आहे. 2015 च्या महिला दिनापासून तिने महिलासाठी स्त्री संवेदनामंच नावाचे दर्जेदार मासिक सुरु केले आहे. त्यामध्ये निर्णय या तिच्या पुस्तकाचा आर्वजुन उल्लेख करावा लागेल. सध्या जिल्ह्याच्या बाल न्याय मंडळावर ती सदस्य म्हणुन काम करत आहे.

यापुढे पौंगडावस्थेतील मुलांवर काम करायचे आहे असे सांगून बालकांतील वाढत्या गुन्हेगारीमुळे ती चिंतीत आहे व मोबाईल व भौतिक सुखाच्या मागे लागून गुन्ह्याकडे वळलेल्या व विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी ती काम करते आहे. सुचिताला सारा नावाची एक मुलगी असून पती संदीप यांची खंबीर साथ आहे. संदीप महल्ले निसर्गोपचार क्षेत्रात काम करतात. त्या दोघांच्या पाठींब्यामुळेच आपण आवडत्या क्षेत्रात काम करत असल्याचे ती सांगते…. तिच्या सोबत बोलत असतानांच समस्या घेऊन काही मध्यमवयीन महिला तिथे आल्या…. व सुचिता त्यांच्या समस्यावर बोलू लागली.

सुचिताचा संपर्क : 7385795400

लेखक - शैलजा वाघ दांदळे माहिती अधिकारी, अमरावती

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate