অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘भरोसा सेल’...पिडीतांचा आधार

‘भरोसा सेल’...पिडीतांचा आधार

एखादा गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडू नये, यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येतात. याच उद्देशाने नागपूर शहरात पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या कल्पनेतून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. नववर्षाच्या ‘प्रथमस्य दिनी’ ‘भरोसा सेल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले. या ‘सेल’च्या माध्यमातून महिलांना आणि बालकांना सुरक्षितता पुरवितांनाच गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. हैद्राबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘भरोसा सेल’चा प्रयोग प्रथम नागपूर शहरात राबविण्यात आला आहे. महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरूद्ध लढण्यासाठी शारिरीक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला ‘भरोसा सेल’ राज्य पोलिसांसाठी विश्वासपात्र ठरला आहे. त्यामुळे महिला-मुलींचा ‘भरोसा’ जिंकण्याचा नागपूर पॅटर्न लवकरच राज्यातील अन्य काही शहरात राबविला जाणार आहे.

‘भरोसा सेल’ : काळाची गरज

W.E.C.A.R.E.(Women Effulgence Center for Aid and Empowerment ), ‘भरोसा सेल’ व ‘दामिनी पथक’ यांच्या माध्यमातून पीडित महिला व मुले यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून संकटात सापडलेल्या महिला व मुलांकरिता पोलिस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, विधी तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसन या सेवा तात्काळ पुरवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतनीस ठरत आहे. हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

‘भरोसा सेल’ कुठे आहे व येथे तक्रार कशी नोंदवावी ?

नागपूर येथे सुभाषनगर टी पॉईंट, बी.एस.एन.एल. ऑफिसच्या बाजुला ‘भरोसा सेल’ स्थापन करण्यात आला आहे. पिडीत महिलांना येथे तक्रार नोंदवितांना संपूर्ण माहिती असलेला अर्ज भरुन द्यावा लागतो. तक्रारीच्या स्वरुपावरुन महिलेला मोफत मार्गदर्शन करण्यात येतो.

संपर्क कुठे साधावा ?

‘भरोसा सेल’ मधील संपर्क क्रमांक

दूरध्वनी क्रमांक – 0712 – 2233638, 2561222, 100

भ्रमणध्वनी क्रमांक – 8055472422 , 8055876773 ,

भरोसा सेलच्या केंद्रीय प्रशासक श्रीमती शुभदा संखे – 8308827343

‘भरोसा सेल’ची कार्यपध्दती :-

‘भरोसा सेल’ हे पीडित महिला व मुले यांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी चोवीस तासही सुरु असते. तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरु असतो. रात्री बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. तसेच 1091 व 100 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारुन त्या संबधित तज्ज्ञांकडे तात्काळ पाठविण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे वर्गीकरण करुन त्यांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. संबंधीत तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करुन आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था देखील करण्यात येते. भरोसा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींमधील पीडित व्यक्तीस न्याय मिळत नाही, तोपर्यंत तक्रार बंद करुन कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही.

भरोसा सेल अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायद्यातंर्गत संरक्षण तसेच विधी विषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाईन, महिला हेल्पलाईन महिला हेल्पलाईन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पिडीत महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश आहे.

समुपदेशनाद्वारे तक्रारीचे निवारण -

लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पिडीत महिला अथवा मुलीला न्यायासाठी काहीवेळा दारोदार फिरावे लागते. बलात्कार पिडीत महिला अथवा मुलींला समाजासोबतच अनेकदा कुटुंबियांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारिरीक व मानसिकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा आणि घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात.

हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करुनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास निश्चित मदत होत आहे.

आठ महिन्यात 2 हजार 078 तक्रारी

वकिल, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांसोबतच स्थानिक भरोसा सेलमध्ये एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकांसह 17 कर्मचारी सुद्धा नियुक्त आहे. त्यांना गेल्या 8 महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या 2078 तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यातील 1182 तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करून वाद मिटविण्यात आले. 442 प्रकरणात महिला- मुली अथवा अन्य तक्रारकर्त्यांचा विरुद्ध पक्षातील मंडळीसोबतचा समेट घडवून आणण्यात आला आहे. तर, वेगवेगळ्या पद्धतीने 454 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरूषांनी देखील मदतनीस ठरत आहे. या सेलमध्ये न्यायासाठी फिर्याद मागणाऱ्या पिडीतांची संख्या वाढत आहे. येथे दर दिवसाला 10 ते 20 नवीन तक्रारी दाखल होतात.

दामिनी पथक

महिलांच्या सुरक्षेकरिता दामिनी पथक असून त्यांच्या माध्यमातून महिला छेडछाड व महिलाविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध केला जातो. दामिनी पथकातील प्रशिक्षीत महिला पोलिस अंमलदारांना छेडछाड, विनयभंग तसेच इतर गुन्ह्यांच्या ठिकाणी पाठविण्यात येते. आरोपींविरुध्द भक्कम पुरावा गोळा करुन कायदेशीर कारवाई करता येईल. दामिनी पथकाची दुचाकी तसेच चारचाकी वाहनातून विविध परिसरात नियमित गस्त सुरु असते.दामिनी पथकाव्दारे शहरातील शाळा, महाविद्यालये, यांना भेटी देवून विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देखील आयोजित केल्या जाते.

व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र, स्वयंसिद्ध कराटे प्रशिक्षण

भरोसा सेलमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये लैंगिक शोषण ( Good Touch, Bad Touch ) याबाबतची माहिती देवून जनजागृती केली जाते. बऱ्याचशा महिला येथे राहण्याचा प्रश्न घेऊन देखील येतात. त्यांच्या वयोगटानुसार त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. यामुळेच पीडित महिला व बालकांना ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून मोठा आधार प्राप्त झाला आहे. भरोसा सेलमध्ये प्राप्त तक्रारींच्या विश्लेषण आणि निपटाऱ्यासोबतच नव्याने व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र, स्वयंसिद्ध कराटे प्रशिक्षण तसेच योगासन वर्ग देखील सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भरोसा सेलच्या केंद्रीय प्रशासक श्रीमती शुभदा संखे यांनी दिली.

लेखिका: अपर्णा यावलकर-डांगोरे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate